'आमचं ठरलंय' च्या मेळाव्यात आमदार गोरे हटावचा नारा

या व्यासपीठावरील कुणीतरी एकजणच 'आमचं ठरलंय'चा उमेदवार असेल असं म्हणत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी माजी आमदार हटावचा नारा अलोट गर्दीच्या साक्षीने दिला. माण-खटावमधील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी येथील बाजार पटांगणावर कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर मेळाव्यात प्रत्येक वक्त्याने माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या कारकीर्दीवर जोरदार हल्ला चढवला.
Melava Against MLA Jaykumar Gore
Melava Against MLA Jaykumar Gore

दहिवडी : या व्यासपीठावरील कुणीतरी एकजणच 'आमचं ठरलंय'चा उमेदवार असेल असं म्हणत सर्वपक्षीय नेतेमंडळींनी माजी आमदार हटावचा नारा अलोट गर्दीच्या साक्षीने दिला. माण-खटावमधील सर्वपक्षीय नेतेमंडळींनी येथील बाजार पटांगणावर कार्यकर्ता निर्धार मेळाव्याचे आयोजन केले होते. सदर मेळाव्यात प्रत्येक वक्त्याने माजी आमदार जयकुमार गोरे यांच्या कारकीर्दीवर जोरदार हल्ला चढवला. 

यावेळी माजी आमदार डाॅ. दिलीप येळगावकर, माजी आमदार प्रभाकर घार्गे, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल देसाई, शिवसेनेचे नेते रणजितसिंह देशमुख, राष्ट्रवादीचे नेते डाॅ. संदीप पोळ, मनोज पोळ, सभापती रमेश पाटोळे, जिल्हा परिषद सदस्या सुवर्णा देसाई, माजी सभापती संदीप मांडवे, पंचायत समिती सदस्य तानाजी कट्टे, तानाजी काटकर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुभाष नरळे, माजी सभापती श्रीराम पाटील, वडूजचे नगराध्यक्ष सुनिल गोडसे, मायणीचे सरपंच सचिन गुदगे, डाॅ. महादेव कापसे, डाॅ. जे. टी. पोळ, अर्जुन खाडे, सुरेश शिंदे, बाळासाहेब सावंत, बाळासाहेब मासाळ, विकल्प शहा,  जयवंतराव पाटील, सचिन माळी, तानाजी मगर, तानाजी बागल, योगेश भोसले, महेंद्र जाधव, संदीप शिंदे यांच्यासह माण-खटावमधील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

डाॅ. दिलीप येळगावकर यांनी माजी आमदार गोरेंवर जोरदार टिका केली. ते म्हणाले, "या घाणेरड्या प्रवृत्तीला तिकीट देवू नका असं आम्ही पक्षनेतृत्वाला सांगतोय. आंधळीत पाणी यायला अजून वर्ष लागंल अन यानं पुढचं उद्घाटन केलंय. अजून विहीर नाही अन हे पाईप लाईनचं काम करायला चाललंय. उरमोडीचं पाणी पुढं जाणारंच की यात यांचं कर्तृत्व काय? 2004 ते 2009 दरम्यान कोंबडवाडीत तीन पंप बसले अन त्यानंतरच्या दहा वर्षात फक्त एक पंप बसला. आम्ही घाणेरडं राजकारण करणार नाही अन यांना साथ देणार नाही. मारामाऱ्या करुन, खंडणी गोळा करुन मतदारसंघाचं वाटोळे करुन आयत्या पिठावर रेघोट्या मारणारा हा माणूस आहे. आमचं ठरलंय हाच उमेदवार. कोणीही वावड्या उठवंल कमिटी निर्णय घेईल तोच उमेदवार असेल. चिन्ह घेऊन हिंडणाऱ्यांना चिन्ह बदलावे लागेल.''

प्रभाकर देशमुख म्हणाले, ''स्वर्गीय तात्यांना पातळी सोडून अरेतुरे बोलणाऱ्याला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. माण तालुक्याची संस्कृती संपवणारांना परत पाठवण्याची वेळ आली आहे. खोट्या आरोपांना मी भिक घालत नाही. इच्छा असेल तेव्हा उभा राहिल, वाटेल तेव्हा थांबेल. मात्र दादागिरी दहशतवाद संपवण्यासाठी मी जनते बरोबर आहे. पळून कोण जातो ज्याच्यामागे पोलिस लागतात ते पळून जातात. मी पळून जाणाऱ्यातला नाही. तरुणांचे आयुष्य, अनेक कुटुंबं उध्वस्थ करुन संपवणाऱ्यांना संपवण्याची वेळ आली आहे.'' १८ हजार हेक्टरवर उरमोडीच्या पाण्याचा लाभ होणे गरजेचे असताना प्रत्यक्षात ३ हजार हेक्टरवर पाणी पोहचल आहे. २००५ पासून लोधवडे गाव पाण्यासाठी स्वयंपूर्ण आहे, तुमच्या बोराटवाडीचा टँकर बंद कधी करणार, असा सवालही त्यांनी केला.

प्रभाकर घार्गे म्हणाले, ''माण-खटावला लागलेला कलंक व माणची संस्कृती नष्ट करणारी प्रवृत्ती घालवण्याची वेळ आली आहे. राजकारण करत असताना विकास झाला पाहिजे विकार झाला नाही पाहिजे. आमचं पक्कं ठरलंय. आमच्यातील कुणीही बाजूला जाणार नाही अन जो जाईल त्याच्या तोंडाला काळं फासा.''

रणजित देशमुख म्हणाले, ''पाण्यात बोट फिरवता, नव्हे ती आमच्या ह्रदयावर फिरवता, कुठाय ते पाणी. दहा वर्षांपूर्वी उद्योगधंदे सुरु करायची भाषा करणार्याने साधं ऊसाचं गुऱ्हाळ, पिठाची गिरणी सुरु केली नाही. मात्र षडयंत्र रचून माझ्या उसाच्या कारखान्याला सहा वर्षे मंजूरी मिळू दिली नाही. पण कितीही अडवलं तरी मी मागे हटणार नाही.'' जो आता माजी आमदार आहे त्याला माजी म्हणून ठेवणं महत्त्वाचं आहे, असे अनिल देसाई म्हणाले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com