माजी आमदाराने एसटीसाठी सात एकर जमीन दिली.. पण त्यांच्या तीन पिढ्यांचे घरासाठी अजूनही हेलपाटे!

घर मिळण्यासाठी त्यांच्या पत्नी शांताबाई पाटसकर यांनी प्रयत्न केले मात्र सरकारी यंत्रणेला घाम फुटला नाही. अखेर शांताबाईंनी सुद्धा १९९७ मध्ये भाड्याच्या घरात डोळे मिटले. मुलगा हरिभाऊ प्रयत्न करून थकले आहेत. पाटसकरांचा नातू सागर प्रयत्न करत आहे
माजी आमदाराने एसटीसाठी सात एकर जमीन दिली.. पण त्यांच्या तीन पिढ्यांचे घरासाठी अजूनही हेलपाटे!
JAGNNATH PATASKAR

केडगाव (जि.पुणे) : कोणाचा विश्वास बसणार नाही परंतु दौंडमधील काँग्रेसच्या दिवंगत आमदारांचे कुटुंब अजूनही भाड्याच्या घरात रहात आहे. दिवंगत आमदारांनी दौंडच्या विकासकामांसाठी स्वतःची सात एकर जमीन कवडीमोल ( २५ हजार रूपये) सरकारी भावात दिली. सरकारने या जमिनीच्या मोबदल्यात आमदारांना दौंड शहरात घर बांधून द्यायचे होते. आमदारांनी स्वतःच्या घरासाठी सरकार दरबारी हेलपाटे मारले पण त्यांच्या हयातीत घर झाले नाही. अखेर त्यांनी भाड्याच्या घरात शेवटचा श्वास घेतला.

या अवलिया आमदारांचे नाव आहे जगन्नाथ तात्याबा पाटसकर. ((Former MLA Jagnanath Tatyaba Pataskar) स्वातंत्र चळवळीत पाटसकर यांना चार वेळा तुरूंगवास भोगावा लागला. यशवंतराव चव्हाण व पाटसकर हे जीवलग मित्र. ते एकाच तुरूंगात होते. ज्येष्ठ नेते  शरद पवार व पाटसकर एकाच वर्षी आमदार झाले. यशवंतराव चव्हाण यांनी दौंड विधानसभेसाठी पाटसकर यांना १९६७ मध्ये काँग्रेसची उमेदवारी दिली. त्यावेळी पाटसकर यांनी जनता पक्षाचे राजाराम ताकवणे यांचा पराभव केला होता. साधे राहणीमान असणारे पाटसकर आमदार झाले. पण ना त्यांची वृत्ती बदलली ना स्वभाव. झोळी लटकवूनच ते तालुकाभर फिरायचे व लोकांचे प्रश्न सोडवायचे. पण स्वतःच्या बाबतीत आडवाटेने नव्हे तर रीतसर होऊ शकणारी कामंही त्यांनी मागेच ठेवली. त्यांनी ना पेट्रोल पंप घेऊन ठेवला, ना फोन, ना दारूचे लायसन्स. स्वतःच्या कुटुंबासाठी एखादं छोटखानी घर तरी बांधून घेणं त्यांना सहज जमण्याजोग होतं.    

दौंडमधील ग्रामीण रूग्णालय व एसटी स्थानकाचा प्रश्न जागेअभावी १५ वर्ष रेंगाळला होता. जागा मिळत नव्हती. १९९१ च्या दरम्यान पाटसकर यांनी जागा दिल्यानंतर हे प्रश्न मार्गी लागले. पाटसकर यांच्या हयातीत सरकारी यंत्रणा त्यांना पैसे देऊ शकली नाही. १९९२ मध्ये पाटसकर यांचे निधन झाले. निधनानंतर जमीन मोबदल्याचे २५ हजार रूपये हे राज्याच्या आरोग्य खात्याने देणे योग्य की नगर परिषदेने हा वाद पुढे अनंतकाळ चालू राहिला. हे पैसे पुढे अनेक वर्षे अथकपणे पाठपुरवठा करीत आणि अनेक अवमान पचवित त्यांच्या कुटुंबीयांनी आपल्या पदरात पाडून घेतले. ते ती जागा संपादन केल्याचा ५ वर्षानंतर म्हणजे ९६ साली !

घर मिळण्यासाठी त्यांच्या पत्नी शांताबाई पाटसकर यांनी प्रयत्न केले मात्र सरकारी यंत्रणेला घाम फुटला नाही. अखेर शांताबाईंनी सुद्धा १९९७ मध्ये भाड्याच्या घरात डोळे मिटले. मुलगा हरिभाऊ प्रयत्न करून थकले आहेत. पाटसकरांचा नातू सागर प्रयत्न करत आहे. परंतु मंत्रालयाच्या आगीत कागदपत्रे जळाल्याचे त्यांना सांगण्यात येत आहे. रेशनिंगचे धान्य दुकान एवढेच काय ते पाटसकर कुटुंबियांचे जगण्याचे साधन आहे. गेली ३० वर्ष पाटसकर यांच्या घराच्या जागेचा प्रश्न लालफितीत अडकला आहे.  

एसटी स्टँड झाल्यानंतर माजी आमदार पाटसकर यांनी वृत्तपत्र विक्रीसाठी एसटी स्टँडमध्ये एक गाळा मागितला तेव्हा सरकारी यंत्रणेने असे सांगितले की, मोफत गाळा देता येत नाही. त्यासाठी सरकारी रक्कम भरा आणि लिलावात सहभागी व्हा. पाटसकर गाळा मिळाला नाही पंरतू त्यांनी कधीही तक्रार केली नाही. २४ ऑक्टोबर १९९२ रोजी संरक्षणमंत्री शरद पवार यांच्या हस्ते घराचे भूमिपूजन झाले होते. भूमीपुजनानंतर ही जागा पाटसकर यांना देता येत नाही असा जावईशोध नगरपरिषदेने लावला. त्यानंतर ३ नोव्हेंबर १९९२ रोजी पाटसकरांचे निधन झाले. गेल्या ३० वर्षात काँग्रेसचे अनेक नेते मुख्यमंत्री झाले, खासदार झाले, आमदार झाले पण एकानेही हा प्रश्न धसास लावला नाही.

मुंबईसारख्या ठिकाणी सरकारी मदतीने आमदारांच्या टोलेजंग गृहयोजना जुहू, वरळीसारख्या परिसरात उभ्या राहू शकल्या, पण नि:स्वार्थी समाजसेवा आणि बिनघोटाळ्याचे राजकारण करणा-या आमदार पाटसकरांच्या नशिबी मात्र शेवट पर्यंत भाड्याची अंधारी खोलीच राहीली.  नातेवाईकांसाठी किंवा स्वतःच्या संस्थांसाठी भूखंड गिळंकृत करताना या राज्याने राज्यकर्त्यांच्या नाना त-हा पाहिल्या आहेत. त्या राज्यात स्वातंत्र सैनिक असणा-या काँग्रेसच्या आमदाराला एक घर मिळू शकत नाही. केवढी मोठी शोकांतिका आहे. थोर राष्ट्रपुरूषांची उंच स्मारके बांधण्याची ज्या देशात जणू स्पर्धा लागली आहे. त्या देशात एक स्वातंत्र सैनिक हक्काचे घर मागताना सरकारी यंत्रणेपुढे दम तोडतो. ही किती लाजीरवाणी गोष्ट आहे.

ज्यांच्या साम्राज्यावरील सूर्य मावळत नव्हता त्या ब्रिटिश सत्तेविरूद्ध पुकारलेला लढा पाटसकरांनी जरूर जिंकला असेल, पण त्यांनी स्वप्नात पाहिलेल्या आपल्या स्वतंत्र देशातील राजकारणाच्या बजबजपुरीत आणि नोकरशाहीच्या अंधेर नगरीत मात्र स्वकियांकडूनच ते पुरते पराभूत झाले!  

पाटसकर यांची जातच माहीत नाही.

सध्याच्या राजकारणात जातींना फार महत्व आले आहे. पाटसकर यांची जात अनेकांना माहीत नाही. त्यांच्या जातवाल्यांनी, समाज संघटनांनी कधी सरकार दरबारी प्रयत्न केल्याचे एेकीवात नाही.  त्यांच्या समाजाने आमदार, खासदारांना कधी जाब विचारला नाही. समाजाचे उपद्रव मुल्य नाही, जनमताचा रेटा नाही, की मतांचा गठ्ठा नाही. परिणामी हे भिजत घोंगडे पडले आहे. आता पाटसकर विस्मरणात गेले आहेत. त्याचंही कोणाला सोयरसुतक नाही.

`सकाळ`शी संबंधित एक आठवण....  

आमदार पाटसकर हे दौंडमध्ये वृत्तपत्र एजन्सी चालवत होते. तेच त्यांच्या चरितार्थाचे साधन होते.  स्वातंत्र लढ्यात त्यांना तुरूंगात जावे लागले. त्यांची मुले शाळा शिकत पेपर विकत होते. मात्र वसुली थांबली. सकाळ पेपरची उधारी खूप थकली. वितरण विभागाने पाटसकर यांचे पार्सल बंद केले. पाटसकर यांना तुरूंगात पार्सल बंद झाल्याचे समजले. पाटसकर यांनी तुरूंगातून सकाळचे संस्थापक नानासाहेब परूळेकर यांना याबाबत पत्र लिहिले. परूळेकर यांनी ताबोडतोब पेपर चालू केले.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवात तरी मुहुर्त लागावा.

भारताच्या स्वातंत्र दिनाचा अमृतमहोत्सव वर्षाची सुरवात २०२२ मध्ये आहे. अमृतमहोत्सव धुमधडाक्यात साजरा होणार आहे. त्याची आतापासूनच तयारी सुरू झाली आहे.  त्यावेळी भारताच्या स्वातंत्र्यासाठी ज्यांनी आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवले त्यांचा विसर न पडावा. ही अपेक्षा.  खरं तर पाटसकर यांचे स्मारक होणे गरजेचे आहे.  किमान हक्काचे घर तरी मिळावे. अर्थात हा सर्व राजकीय इच्छाशक्तीचा भाग आहे. पाटसकरांना घर मिळवून देण्याची कोणात धमक आहे. याची दौंडकरांना उत्सुकता आहे. एक सत्य सर्वांनीच स्वीकारले पाहिजे. हा प्रश्न सुटला नाही तर मिरवण्याचा किंवा विकासाच्या गप्पा मारण्याच्या कोणालाच अधिकार नाही.

Related Stories

No stories found.