सचिन वाझेविरुद्ध बेनामी संपत्तीच्या आणखी दोन तक्रारी
sachin waze

सचिन वाझेविरुद्ध बेनामी संपत्तीच्या आणखी दोन तक्रारी

अद्याप गुन्हा दाखल नाही...

मुंबई : उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली मोटार ठेवल्याप्रकरणी अटक केलेले निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांच्याविरोधात भ्रष्टाचाराच्या दोन तक्रारी आतापर्यंत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (एसीबी) दाखल झाल्या आहेत. दोन्ही तक्रारी या उत्पन्नापेक्षा अधिक संपत्ती असल्याच्या (बेहिशेबी संपत्ती) आहेत. त्यातील एक तक्रार निनावी होती.

‘टीआरपी’ प्रकरणात तत्कालीन तपास अधिकारी सचिन वाझे याने ३० लाख रुपयांची लाच घेतल्याचा तपास सक्तवसुली संचालनालय (ईडी) करत आहेत. वाझेला लाच दिल्याचा जबाब ‘बार्क’च्या अधिकाऱ्यांनी ‘ईडी’ला दिला आहे. या प्रकरणापूर्वी ‘एसीबी’कडे वाझेच्या विरोधात बेहिशेबी संपत्ती जमवल्याच्या दोन तक्रारी आल्या होत्या. यात वाझे निलंबित झाल्यानंतर पहिली तक्रार ख्वाजा युनूसप्रकरणी आली, तर दुसरी तक्रार ही निनावी असून, ती वाझे याने पुन्हा पोलिस दलात सामील झाल्यानंतर मिळाली होती.

तक्रारींबाबत गुन्हा दाखल नाही
यापूर्वी निनावी तक्रारींची एवढी दखल घेतली जात नव्हती; पण २०१५ मधील परिपत्रकानुसार अशा प्रकरणांची नोंद करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार वाझेविरोधात आलेल्या निनावी तक्रारीची नोंद करण्यात आली आहे; पण दोन्ही तक्रारींमध्ये अद्याप कोणताही गुन्हा दाखल झाला नसल्याचे सूत्रांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in