मुंबई : राज्य सरकारने चार आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज जारी केले. गेले अनेक दिवस नियुक्ती न मिळालेले तुकाराम मुंढे यांना राज्य मानवी हक्क आयोगाच्या सचिवपदी नेमण्यात आले आहे. अरविंदकुमार यांना सहकार सचिव म्हणून नियुक्ती देण्यात आली आहे.
दिलीप गावडे यांची नियुक्ती आरोग्य खात्यात सहसचिव म्हणून झाली आहे. उदय जाधव यांना बालहक्क आयोगाच्या सचिवपदी नेमणूक देेण्यात आली.
मुंडे हे तब्बल नऊ महिने हे पदाविना होते. त्यांच्यासह आणखी सहा आयएएस अधिकाऱ्यांना आतापर्यंत नियुक्ती मिळालेली नव्हती. मे महिन्यात नागपूर महापालिका आयुक्त पदावरून त्यांची बदली करण्यात आली होती. त्यांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सचिव म्हणून नेमण्यात आले होते. पण त्यांनी पदभार घेण्याच्या आधीच इतर अधिकाऱ्याची तेथे नियुक्ती करून मुंडे यांना रिकामे ठेवण्यात आले.
मानवी हक्क आयोगातील नियुक्ती ही तशी साइड पोस्टिंग मानली जाते. त्यामुळे मुंडेंना अशाच पोस्टला महाआघाडी सरकारने नेमले आहे. फडणवीस सरकारच्या काळात त्यांना सोलापूरचे जिल्हाधिकारी, नवी मुंबई, नाशिक अशा शहरांचे आयुक्त म्हणून नेमण्यात आले होते. महाआघाडी सरकारने नागपूरचे आय़ुक्त म्हणून त्यांची निवड केली. मात्र तेथील सत्तााधारी भाजपच्या पदाधिकाऱ्यांशी त्यांचे खटके उडाल्याने पाच महिन्यांतच त्यांना बदलण्यात आले. कोरोना संकटाच्या काळात मुंडे यांनी नागपूरमध्ये चांगले काम केले होते. तरी त्यांची बदली झाल्याने तेथील नागरिकांनी रोष व्यक्त केला होता. त्यांच्याशी पंगा घेणारे नागपूरचे तत्कालीन महापौर संदीप जोशी यांना त्याचा फटका बसला. गेल्या महिन्यात झालेल्या विधान परिषद निवडणुकीत जोशी यांचा पराभव झाला. यातील अनेक कारणांपैकी मुंडे यांची विनाकारण झालेली बदली हे देखील होते, असे विश्लेषण तेव्हा करण्यात आले होते.
भंडारा येथील सरकारी रुग्णालयात लागलेल्या आगीत दहा बालकांचा मृत्य झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. त्याच वेळी राज्यातील बाल हक्क आयोगातील जागा रिक्त असल्याचा साक्षात्कार सरकारला झाला. त्यानंतर आता तेथे उदय जाधव यांची नियुक्ती करण्यात आली.

