"घड्याळ्या'च्या मैदानात पहिल्यांदाच पाच थेट आयपीएस पाच जिल्ह्यांचे SP - first time all direct IPS commanding five districts of Western Maharashtra | Politics Marathi News - Sarkarnama

"घड्याळ्या'च्या मैदानात पहिल्यांदाच पाच थेट आयपीएस पाच जिल्ह्यांचे SP

मंगेश कोळपकर
बुधवार, 14 ऑक्टोबर 2020

पाचही जिल्ह्यांत एकाचवेळी पाच थेट "आयपीएस' असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

पुणे : राजकीयदृष्ट्या आणि कायदा - सुव्यवस्थेच्या दृष्टिनेही संवेदनशील असलेल्या कोल्हापूर परिक्षेत्रात म्हणजेच पुण्यालगतच्या पाचही जिल्ह्यांत थेट भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकाऱ्यांची पोलिस अधीक्षकपदी नियुक्ती झाली आहे. पाचही जिल्ह्यांना डायरेक्‍ट "आयपीएस' ही पहिलीच वेळ असून ते सर्वजण युवा आहेत.

पुणे जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदी अभिनव देशमुख, कोल्हापूरच्या अधीक्षकपदी शैलेश बलकवडे, सांगलीच्या अधीक्षकपदी दीक्षित गेडाम, साताऱ्याच्या अधीक्षकपदी अजयुकमार बन्सल तर, सोलापूर ग्रामीणच्या अधीक्षकपदी तेजस्वी सातपुते यांची नुकतीच नियुक्ती झाली आहे. पाचही अधिक्षकांनी आपआपल्या पदांची सूत्रे स्वीकारली असून कामकाजाला सुरवात केली आहे.

पुणे जिल्ह्याच्या अधीक्षकपदी या पूर्वी राज्य पोलिस सेवेतून बढती झालेल्या आयपीएस अधिकाऱ्यांनाही (प्रमोटी) अधीक्षकपदाची संधी मिळाली आहे. परंतु, गेल्या पाच वर्षांत थेट "आयपीएस' अधिकारीच पुण्याच्या एसपीपदी आले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा आणि सोलापूर ग्रामीणमध्येही या पूर्वी डायरेक्‍ट आयपीएस अधीक्षक होते. परंतु, पाचही जिल्ह्यांत एकाचवेळी पाच "आयपीएस' असण्याची ही पहिलीच वेळ आहे.

देशमुख हे कोल्हापूरवरून पुण्यात आले आहेत तर, बलकवडे हे गडचिरोलीहून कोल्हापूरला पोचले आहेत. गेडाम रत्नागिरीवरून सांगलीत तर, बन्सल गडचिरोलीत अतिरिक्त पोलिस अधीक्षक होते. त्यांना बढती मिळाली आहे. सातपुते या साताऱ्यातून सोलापूर ग्रामीणमध्ये गेल्या आहेत. तर, पुण्याचे एसपी संदीप पाटील हे आता गडचिरोलीमध्ये उपमहानिरीक्षकपदावर बढतीवर पोचले आहेत. गडचिरोली परिक्षेत्रात कार्यकाळ पूर्ण केल्यावर संबंधित अधिकाऱ्यांना त्यांच्या चॉईसनुसार पोस्टिंग देण्याचा पोलिस खात्यात अलिखित संकेत आहे. त्याची अंमलबजावणी याही वेळेला झाली आहे. त्यामुळे बलकवडे आणि बन्सल अनुक्रमे कोल्हापूर आणि साताऱ्यात आले आहेत.

येत्या दोन वर्षांत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. या कालावधीत पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांत कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने राहण्यासाठी तरुण, तडफदार अधिकारी असावेत, असा राष्ट्रवादी कॉंग्रेसचा आग्रह होता. विशेषतः उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यासाठी आग्रही होते, असे समजते. या पाचही जिल्ह्यांत राष्ट्रवादी कॉंग्रेसची ताकद चांगली आहे. त्यामुळे येथे सक्षम अधिकारी असावेत, अशी त्यांची भमिका होती. त्यानुसार हे बदल झालेले दिसतात.

युवा "आयपीएस' अधिकाऱ्यांची कामाची पद्धत वेगळी असते. त्याची तडफ ही पोलिस दलाला प्रेरणा देणारी असते, असे या पूर्वीही अनेक उदाहरणांतून दिसून आले आहे. त्यामुळे आगामी काळात पाचही जिल्ह्यांतील कायदा -सुव्यवस्था कशी राखली जाते, यावर राज्य सरकारचे बारकाईने लक्ष असेल, अशी चिन्हे आहेत.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख