मुंबई : उच्च न्यायालयात मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणीपूर्वी जानेवारी 2019 मध्ये मराठा संघटनांनी सोलापुरात बैठक घेऊन महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात बाजू मांडू नये, अशी मागणी केली होती. त्याचमुळे तत्कालीन सरकारच्या सांगण्यावरून मी न्यायालयात बाजू मांडली नाही. पण तरीही कार्यालयात राहून कागदोपत्री सरकारची बाजू भक्कम करण्याचे महत्त्वाचे काम मी केले, असे राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी सांगितले आहे.
कुंभकोणी यांनी न्यायालयात बाजू न मांडल्याने मराठा आरक्षण प्रकरणी सरकारचा पराभव झाला, असा आरोप होत आहे. यासंदर्भात कुंभकोणी यांनी स्पष्टीकरण दिले आहे. आपण न्यायालयात न जाता पडद्यामागेच राहून सरकारची बाजू न्यायालयात भक्कम करण्याचे जे प्रयत्न केले, त्याबद्दल तेव्हाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळातही आपले आभार मानले होते, असेही कुंभकोणी म्हणाले.
सोलापुरात मराठा संघटनांनी बैठक घेऊन मराठा आरक्षण प्रकरणी न्यायालयात ज्येष्ठ वकील माजी महाधिवक्ता व्ही. ए. थोरात यांनीच सरकारची बाजू मांडावी, असा ठराव संमत केला होता. त्यामुळे या प्रकरणात विशेष वकील म्हणून व्ही. ए. थोरात यांना नेमण्याचा निर्णय तत्कालीन सरकारने घेतला. त्यांच्या निर्णयाचा मान ठेऊन मी न्यायालयात बाजू न मांडण्याचा निर्णय घेतला. तरीही मराठा आरक्षण कायद्याचा मसुदा बनवणे, न्यायालयात लेखी युक्तिवाद तयार करणे, प्रतिज्ञापत्रे तयार करणे, सरकारची बाजू मांडण्यासाठी न्यायालयाचे या विषयावरील निकाल शोधणे, बैठकांचे आयोजन करणे ही कामे मी केली होती. नंतर थोरात यांनीही माझ्या कामाची प्रशंसा केली होती, असेही कुंभकोणी यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयातील प्रतिज्ञापत्रात शिक्षणाचे मुद्दे माझ्यामुळे समाविष्ट केले नाहीत, असा आरोप आहे. मात्र, हे प्रतिज्ञापत्र मुकुल रोहतगी तसेच वरिष्ठ वकील पटवालिया यांच्या स्तरावर मंजूर झाले होते. त्यामुळे त्यात मी हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच येत नाही, असेही कुंभकोणी यांनी स्पष्ट केले आहे.
या सर्वांपेक्षा कुंभकोणी मोठे?
उच्च न्यायालयात तसेच सर्वोच्च न्यायालयातही मुकुल रोहतगी, कपिल सिब्बल, अभिषेक मनू सिंघवी, व्ही. ए. थोरात अशी नामवंत कायदेपंडितांची फौज सरकारने उभी केली होती. तरीही फक्त कुंभकोणी न्यायालयात हजर न राहिल्याने राज्य सरकारचा पराभव झाला, अशी टीका कोणी करीत असेल तर याचा अर्थ वरील सर्व मातब्बर वकिलांच्या एकत्रित बुद्धीपेक्षाही कुंभकोणी यांची बुद्धी वरचढ आहे, असा अर्थ होतो, असेही काही वकिलांनी सांगितले.

