Mantralay 125 officers waiting for promotion | Sarkarnama

मंत्रालयातील 125 जणांची कक्षाधिकारी पदाची पदोन्नती रखडली

सिद्धेश्‍वर डुकरे
मंगळवार, 18 डिसेंबर 2018

मंत्रालयात सहायक कक्षाधिकारी, कक्षाधिकारी हे नस्ती तयार करण्याची महत्वाची जबाबदारी पार पाडत असतात. या 125 सहायकांची पदोन्नती रखडल्याने प्रशासनाच्या गतीमानतेवर परिणाम पडत आहे. अनेक विभागात नस्त्या तयार करण्यासाठी सहायक अथवा कक्षाधिकारी यांची वानवा असल्याने सहसचिव, उपसचिव पदावरील अधिका-यांना त्यांच्याकडे असलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना यासाठी विनवणी करावी लागत असल्याचे मंत्रालयात चित्र आहे.

मुंबई :  सहायक कक्षाधिकारी ते कक्षाधिकारी या पदाची पदोन्नती रखडल्यामुळे मंत्रालयातील 125 जणांची कक्षाधिकारी पदाची स्वप्ने टांगणीवर आहेत. परिणामी प्रशासकीय कामकाजावर परिणाम होत आहे.

मंत्रालयात सहायक हे वर्ग तीन श्रेणीचे पद आहे. अलिकडेच या पदाचे नामांतर सहायक कक्षाधिकारी असे केले आहे. सहायक कक्षाधिकारी, त्यानंतर कक्षाधिकारी, त्यानंतर अवर सचिव, उपसचिव, सहसचिव अशी वरच्या श्रेणीत जाणारी मंत्रालय संवर्गातील पदनामावली आहे. 

यामधील सहायक कक्षाधिकारी, कक्षाधिकारी ही मंत्रालय संवर्गातील पदे आहेत. या सर्व पदासाठी विभागीय पदोन्नती समिती(डीपीसी) बैठक बोलावून प्रशासकीय प्रक्रीया पूर्ण करत असते. दरवर्षी डीपीसी सप्टेंबर-आक्‍टोंबर महिन्यांत बोलावण्याचा संकेत आहे. त्यापुर्वी पदोन्नतीसाठीच्या एकूण जागा, आरक्षणाच्या जागा, बिंदुनामावली आदी निश्‍चित केले जाते.

 सध्या सहायक कक्षाधिकारी ते कक्षाधिकारी या पदोन्नतीसाठी 125 जण पात्र असून कक्षाधिकारी पदाच्या 39 जागा पदोन्नतीसाठी पात्र आहेत. कक्षाधिकारी पदाच्या पदोन्नतीसाठी किमान सहकाय कक्षाधिकारी म्हणून सुमारे 9 वर्षे सेवा बजावणे गरजेचे आहे. त्यानुसार हे 125 जण पात्र आहेत.

 मात्र अद्याप या पदोन्नतीसाठी डिसेंबर महिना संपत आला तरीही डीपीसी झाली नाही. यामागे सामान्य प्रशासन विभागाची अनास्था असल्याचे बोलले जाते. सामान्य प्रशासन विभागाकडे चौकशी केली असता 'मेगा भरती'ची कामे आहेत. "वेळ नाही' अशी थातुरमातुर उत्तरे दिली जात असल्याचा कटु अनुभव या अधिका-यांना आला आहे. 

काही दिवसांपूर्वीच कक्षाधिकारी ते अवर सचिव या पदाची पदोन्नती झाली आहे. त्यामुळे '"बळी तो कान पिळी' या म्हणीप्रमाणे सहायक कक्षाधिका-यांच्या पदोन्नतीकडे जाणुबुजून कानाडोळा केला जात असल्याचा अरोप केला जात आहे.

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख