रोहित पवार यांच्या वाटेतील एक काटा निघाला!

रोहित पवार यांच्या वाटेतील एक काटा निघाला!

नगर : कर्जत-जामखेड विधानसभा मतदारसंघातून लढण्यास इच्छुक असलेल्या राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा मंजुषा गुंड यांची तलवार अखेर म्यान झाली आहे. त्यांचे पती राजेंद्र गुंड यांनी स्वतःच रोहित पवार यांचीच उमेदवारी असेल, असे भर सभेत जाहीर केल्याने राष्ट्रवादी काॅंग्रेसचे युवा नेते रोहित पवार यांच्या वाटेतील एक मोठा काटा निघाल्याची भावना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची झाली आहे.

कर्जत-जामखेड या मतदारसंघाकडे राज्याचे लक्ष लागले आहे. कारण या मतदारसंघातून राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू रोहित पवार लढणार आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांची उमेदवारी निश्चित आहे. शिंदे हे मुख्यमंत्र्यांचे विश्वासू मानले जातात. त्यामुळे दोन्ही पक्षाच्या वतीने ही लढत प्रतिष्ठेची होणार आहे.

या दुरंगी लढतीत राष्ट्रवादीच्या मंजुषा गुंड याही राष्ट्रवादीकडून उमेदवारी मागत होत्या. रोहित पवार उमेदवारी करणार असल्याने त्यांना कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळणार नसल्याचे यापूर्वीच स्पष्ट झाले होते. तरीही त्यांचा हट्ट कायम होता. दरम्यानच्या काळात त्या भाजपमध्ये जातात की काय, अशीही चर्चा सुरू झाली होती. तथापि, काल कर्जत येथे झालेल्या मेळाव्यात राजेंद्र गुंड यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला. रोहित पवार हेच या मतदारसंघातील उमेदवार असतील, असे त्यांनी भर सभेत जाहीर केले. गुंड यांची तलवार अखेर म्यान झाल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आता गट-तट विसरून एका झेंड्याखाली येणार आहेत.

अजित पवारांची भावनिक हाक
रोहित पवार यांना निवडून देण्याबाबत अजित पवार यांनी भावनिक हाक देत मतदारसंघाला बारामतीप्रमाणे करण्याचे आश्वासन दिले. जामखेडमधील विरोधकांचे काही नेते फोडून राष्ट्रवादीत आणले. नाराज कार्यकर्त्यांची मोट बांधून सर्वजण रोहित यांच्या प्रचारासाठी सज्ज केले. आगामी काळात ही वज्रमुठ सुटू न देण्यासाठी आता राष्ट्रवादीला प्रयत्न करावे लागणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com