सभापतीपदाचा सत्कार स्वीकारुन मनीषा महाले तान्हुल्यासह दुचाकीवरुन घरी

अतीशय सामान्य स्थिती असलेल्या मनिषा यांनी जनतेत राहून, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या नावाला पसंती दिली.
Manisha-Mahale
Manisha-Mahale

सुरगाणा :  पंचायत समिती सभापती म्हणजे सबंध तालुक्‍याचा कारभार हाकण्याचे सत्ताकेंद्र. करकरीत कपडे, गॉगल्स अन्‌ महागड्या गाडीतून सभापती फिरतात. गराड्यात वावरतात. असा अनेकांचा समज असतो. तो अनेकदा खराही असतो. मनीषा महाले काल सुरगाणा समितीच्या सभापती झाल्या. त्यांच्या गावात आजही एसटी देखील पोहोचलेली नाही. सभापतीच्या सत्काराचे हार, गुच्छ, कार्यकर्त्यांचा आनंदोत्सव झाल्यावर त्या आपल्या तान्हुल्यासह पतीच्या मोटारसायकलने घराकडे निघून गेल्या. महिला आरक्षणातून एका सामान्य महिला सत्तेत सहभागी झाल्याचे हे दुर्मिळ अन्‌ वास्तव उदाहरण म्हणावे लागेल.

मनिषा महाले भवाडा गणातून मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षातर्फे निवडून आल्या आहेत. त्यांचे माहेर गहाने हे अतिदुर्गम व गुजरात सीमेवरील गाव आहे. आजही तेथे एसटी बस देखील येत नाही. त्यांचे वडील शासकीय आश्रमशाळेत स्वयंपाकी आहेत. अतिशय लांब पायपीट करुन त्यांनी शिक्षण घेतले. या गावात असंख्य समस्या आहेत. त्याविरुद्ध संघ,र्करुन त्याचे निराकरण करण्याचा त्यांचा ध्यास आहे. या भागात महिला बचत गट, महिला संघटन या माध्यमातून सतत लोकसंपर्क ठेवत त्यांनी आपले काम सुरु ठेवले आहे. विवाहानंतर जवळच्या ठाणगाव येथे त्या कुुटंबासह राहतात.

युवक, युवतींना संघटित करून अनेकवेळा रस्त्यावर उतरत संघर्ष करून प्रश्न सोडविले आहेत, तालुक्‍यातील तळागाळातील गरीब, कष्टकरी, शेतकरी, शेतमजूर, कामगारांच्या प्रश्नांवर त्यात सक्रीय असतात. माजी आदार जे. पी. गावीत यांच्यांशी संपर्क आल्यावर त्यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाची संघटनात्मक शक्ती वाढविण्यावर त्यांनी भर दिला. पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या त्या कार्यकर्त्या आहेत. किसानसभा, एस.एफ.आय,डी, वाय. एफ.आय., जनवादी महिला संघटनेतही त्या सक्रिय आहेत.

अतीशय सामान्य स्थिती असलेल्या मनिषा यांनी जनतेत राहून, त्यांच्या सुखदुःखात सहभागी झालेल्या आहेत. त्यामुळे सर्वांनी त्यांच्या नावाला पसंती दिली. आगामी काळात आपल्या पदाचा उपयोग तालुक्‍यातील युवक, युवती, सामान्य व आदिवासी जनतेच्या विविध प्रश्‍नांच्या निराकरणासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगीतले. यानिमित्ताने एक अतिशय सामान्य महिला सभापती झाल्याने महिला आरक्षणाचा मुळ हेतू साध्य झाल्याची प्रतिक्रीया व्यक्त होत आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com