Maneka Gandhi takes government officers to task over a dead dog | Sarkarnama

आले मनेका गांधींच्या मनाला , तेथे मृत कुत्र्यासाठी सरकारी यंत्रणा लागली कामाला 

सुजीत गायकवाड 
शनिवार, 10 नोव्हेंबर 2018

अपघातप्रकरणी न्याय मिळवून देण्याची वेळ येते, तेव्हा तो मनुष्य आहे की प्राणी असा भेदभाव करणे चुकीचे आहे. पोलिस आणि महापालिका यंत्रणांनी त्यांचे कर्तव्य योग्यरितीने पार पाडले असते, तर श्‍वानप्रेमींना यंत्रणेला कामाला लावण्याची वेळ आली नसती.
- आरती चौहान, श्‍वानप्रेमी


जेएनपीटी रस्त्यांवर ट्रेलर खाली चिरडून मृत्यू झालेल्या व्यक्तींना न्याय मिळावा, जखमींवर तातडीने उपचार व्हावेत याकरीता मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. ट्रेलर खाली चिरडल्या जाणाऱ्या लोकांना वेळेवर औषधोपचार मिळत नाही, ही परिस्थितीही भयानक आहे. श्‍वानप्रेमींनी श्‍वानांप्रमाणेच मानवांसाठीही असे प्रयत्न करावेत. काही गोष्टींमध्ये तारतम्य बाळगायला हवे. कोणतेही प्रेम अती झाले की, ते विकृती होते.
- सुधाकर पाटील, सामाजिक कार्यकर्ते, उरण 

नवी मुंबई  : केंद्री मंत्री मनेका गांधी यांच्या लहरी स्वभावाचा आणि मनमानी कारभाराचा झटका लक्ष्मीपूजनाच्या दिवशी नवी मुंबईतील सरकारी यात्रेला बसला . रस्त्यावर ट्रकखाली सापडून मरण पावलेल्या कुत्र्याच्या मृत्यूस जबाबदार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करावा म्हणून मनेका गांधी यांनी आकाश पाताळ  एक केले . 

त्याचे झाले असे की लक्ष्मी पूजाच्या रात्री सीवूड्‌स येथील रस्त्याच्या कडेला विसावलेल्या एका कुत्र्याचा ट्रकखाली चिरडून मृत्यू झाला.या घटनेनंतर काही व्यक्तींनी जागरूकता दाखवत त्याचा मृतदेह पुरला. पण, एका कुत्र्याचा अशा प्रकारे मृत्यू होतो आणि त्याची दखल कोणीही घेत नाही, हे समजल्यावर काही श्‍वानप्रेमींना त्याचा उमाळा आला. त्यांनी संताप व्यक्त केला. 

एवढ्यावरच हे प्रकरण थांबले नाही. घटनेची दखल चक्क केंद्रीय मंत्री मनेका गांधी आणि खासदार वरूण गांधी यांनी घेत पोलिसांना दूरध्वनी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले. त्यानंतर कुत्र्याचा मृतदेह बाहेर काढून विच्छेदनासाठी पाठवण्यात आला. एरवी एखाद्या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाल्यानंतर अनेक जण त्याकडे ढुंकूनही पाहत नाहीत. कुत्र्यासाठी मात्र थेट केंद्रीय मंत्र्यांनी धाव घेतल्याचे हे नाट्य नुकतेच नवी मुंबईतील सीवूड्‌समध्ये घडले.

सीवूड्‌स ग्रॅण्ड मॉलच्या समोरील रस्त्याच्या कडेला विसावलेल्या एका कुत्र्याच्या अंगावरून एक भरधाव ट्रक गेला. काही जागरूक नागरिकांनी त्याच्या उपचारासाठी पशुवैद्याची मदत घेतली; पण त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले आणि त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी श्‍वानप्रेमी आरती चौहान यांच्या मदतीने काही व्यक्तींनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याची तक्रार नेरूळ पोलिस ठाण्यात दिली. परंतु, ट्रकचालकाचे वय आणि अन्य प्रश्‍न उपस्थित करण्यात आले. त्यांनी गुन्हाही दाखल केला नाही. त्यामुळे श्‍वानप्रेमी संतप्त झाले. 

त्यांनी आरती चौहान यांच्या मदतीने मनेका गांधी यांच्याकडे तक्रार केली. विशेष म्हणजे, नवी मुंबईतील या कुत्र्याच्या मृत्यूची दखल घेत त्यांनी दिल्लीतून पोलिसांना दूरध्वनी करून जाब विचारला. अखेर पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल करण्याच्या हालचाली सुरू केल्या; परंतु त्यासाठी त्या श्‍वानाच्या मृत्यूचा कायदेशीर पुरावा पोलिसांकडे नसल्याने त्यांनी मृत श्‍वानाचे विच्छेदन करायचे ठरवले. त्यानुसार त्याचा मृतदेह जमिनीतून बाहेर काढला. पालिकेचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. वैभव झुंझारे यांनी त्याचे शवविच्छेदन केले. 

पोलिसांना शवविच्छेदनाचा अहवाल अजून मिळाला नाही; मात्र प्रत्यक्षदर्शींच्या जबाबावरून पोलिसांनी ट्रकचालकावर गुन्हा दाखल केला आहे. एवढी सर्व यंत्रणा एका श्‍वानासाठी कामाला लागल्यामुळे मानवाधिकार संघटनेच्या प्रतिनिधींनी नाराजी व्यक्त केली आहे.

दुर्घटना किंवा अपघातात जखमी झालेल्या माणसांकडे अनेक जण ढुंकूनही पाहत नाही. सरकारी यंत्रणाही अनेक वेळा उत्सुकता दाखवत नाही; मात्र एका श्‍वानासाठी एवढी धावपळ झालेली पाहिल्यानंतर अनेकांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. काहींनी तर आश्‍चर्य व्यक्त केले आहे, तर काही जणांकडून "आता आदमी झाला सस्ता, बकरा झाला म्हाग', असा नाराजीचा सूर उमटत आहे. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख