प्रशांत किशोर यांना मिळेल ममता बॅनर्जी यांच्या वागणुकीतल्या बदलाचे श्रेय ?

 प्रशांत किशोर यांना मिळेल ममता बॅनर्जी यांच्या वागणुकीतल्या बदलाचे श्रेय ?

कोलकता : पश्‍चिम बंगालमध्ये आता दोन वर्षांनी विधानसभेच्या निवडणुकी होणार असून, त्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखालील तृणमूल कॉंग्रेसने विधानसभेसाठी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या संस्थेची सेवा घेतली आहे. इलेक्‍शन मोड मधून बाहेर येऊन, सरकारच्या कामकाजावर अधिक भर देण्याची सूचना किशोर यांनी ममतांना केली आहे. 

किशोर यांच्या सल्ल्याचा परिणाम सध्या दिसत असून, कुठल्याही विषयावर तावातावाने आपली मते मांडणाऱ्या ममता दिदी शांतपणे आपली कामे करताना दिसत आहेत. ममता या मुख्यमंत्री आहेत, त्यामुळे त्या राज्यातील सर्वाधिक महत्त्वाच्या व्यक्ती आहेत, हे त्यांनी आपल्या वर्तनातून दाखवून द्यावे असे किशोर यांनी सुचविले आहे. 
"दिदीकेबोलो डॉट कॉम' या संकेतस्थळाच्या उद्‌घाटनाच्या कार्यक्रमात व्यासपीठावर एकट्या ममताच होत्या. या वेळी त्यांच्या निकटवर्तीयांपैकी कोणीही नेता व्यासपीठावर नव्हता. 

किशोर यांच्या सल्ल्यानुसारच हा बदल झाल्याचे पक्षातील सूत्रांकडून सांगण्यात आले. या पूर्वी कुठल्याही कार्यक्रमावेळी ममता यांच्या मागे पक्षाचे ज्येष्ठ नेते उपस्थित असत. लोकांना त्यांच्या अडचणी सरकारपर्यंत पोहचविणे सोपे व्हावे म्हणून ममता यांनी एक फोन क्रमांक सुरू केला आहे. त्याला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला असल्याचे सांगण्यात आले. अवघ्या चोवीस तासांमध्ये एक लाख फोन कॉल आणि सुमारे 50 हजार संदेश या क्रमांकावर प्राप्त झाले. किशोर यांनी सुचविलेल्या या प्रयोगाला चांगले यश मिळत आहे, असे पक्षाच्या नेत्यांचे मत आहे. 

पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील दहा हजार गावांना तृणमूलचे एक हजार नेते भेट देणार आहेत. किशोर यांच्या सल्ल्यानुसारच हा उपक्रम आयोजित करण्यात आला आहे. आंध्र प्रदेशमध्ये किशोर यांची रणनीती यशस्वी ठरली असून, तेथे वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांच्या पक्ष सत्तेवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर पश्‍चिम बंगालमध्ये किशोर हे ममतांसाठी किती फायदेशीर ठरतात या कडे सर्वांचे लक्ष्य लागले आहे. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com