malkapur election | Sarkarnama

आता "मलकापूर पालिका' भाजपचे टार्गेट !

सरकारनामा ब्युरो
शनिवार, 29 एप्रिल 2017

"क' वर्ग पालिकेत मलकापूर नगरपंचायतीचे रूपांतर करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यासाठी कऱ्हाडचे भाजपचे नेते अतुल भोसले यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यानिमित्ताने निवडणूक होऊन मलकापूर पालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. 

सातारा : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपने जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत लक्ष घातले आहे. "क' वर्ग पालिकेत मलकापूर नगरपंचायतीचे रूपांतर करण्याच्या हालचालींनी वेग घेतला आहे. त्यासाठी कऱ्हाडचे भाजपचे नेते अतुल भोसले यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. यानिमित्ताने निवडणूक होऊन मलकापूर पालिकेची सत्ता मिळविण्यासाठी भाजपने तयारी केली आहे. 

मलकापूर नगरपंचायत सुरवातीपासून माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे समर्थक मनोहर शिंदे यांच्या ताब्यात आहे. मागील निवडणुकीत मनोहर शिंदे व अतुल
भोसले यांनी एकत्रपणे निवडणूक लढून 17 -0 अशी सत्ता मिळविली होती. पण मध्यंतरीच्या काळात झालेल्या राजकीय  घडामोडींनंतर अतुल भोसलेंनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यामुळे ते सध्या कऱ्हाड दक्षिण आणि उत्तरमध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या देशात व राज्यात भाजपची लाट आहे. या लाटेचा फायदा उठवत एक एक स्थानिक स्वराज्य संस्था ताब्यात घेण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील भाजपचे नेते प्रयत्नशील आहेत. शासकीय पातळीवरून मलकापूर नगरपंचायतीचे "क' वर्ग पालिकेत रूपांतर करण्याची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी अतुल भोसले यांनी जोर लावला आहे. सध्या 25 हजार लोकसंख्येचा निकष मलकापूरने पार केला आहे. त्यामुळे येथे "क' वर्ग पालिका होऊ शकते. त्यादृष्टीने प्रस्तावावर काम सुरू आहे.
यावर अतुल भोसलेंनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून ही प्रक्रिया वेगाने होण्यासाठी पाठपुरावा सुरू केला आहे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख