'कोरोना रोखण्यासाठी खानदेशी संदेश...'जो घरमा थांबई त्यानंच आयुष्य लांबई...' - Malegaon Youth Message to be at home in Khandeshi Language | Politics Marathi News - Sarkarnama

'कोरोना रोखण्यासाठी खानदेशी संदेश...'जो घरमा थांबई त्यानंच आयुष्य लांबई...'

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 27 मार्च 2020

मालेगाव येथील डिझायनर भूषण आढावे यांची अहिराणी भाषेतील जो घरमा थांबई, त्यानंच आयुष्य लांबई अशा आशयाचा संदेश असलेली पोस्ट हातोहात व्हायरल झाल्याने चर्चेत आहे. लोकांना घरीच थांबवण्याचे, स्वतःला स्वच्छ ठेवण्याचे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आवाहन या पोस्टमधून करण्यात आले आहे

मालेगाव : सध्या कोरोना विषाणूची दहशत जगभरात पाहायला मिळते आहे. अनेक नेटिझन्स कोरोनाची जनजागृती करण्यासाठी सोशल मीडियावर पोस्ट आणि व्हिडिओ शेअर करत पुढे येत आहेत. यातच आता सोशल मीडियावर अहिराणी भाषेतील संदेश प्रभावीपणे जनजागृती करताना दिसत आहे. मालेगाव येथील डिझायनर भूषण आढावे यांची अहिराणी भाषेतील "जो घरमा थांबई, त्यानंच आयुष्य लांबई" अशा आशयाचा संदेश असलेली पोस्ट हातोहात व्हायरल झाल्याने चर्चेत आहे.

लोकांना घरीच थांबवण्याचे, स्वतःला स्वच्छ ठेवण्याचे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचे आवाहन या पोस्टमधून करण्यात आले आहे. #GoCorona आणि टिकटॉकच्या व्हिडिओनंतर आता सध्या नवनवीन पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहेत आणि नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या जनजागृतीबाबतच्या पोस्टमधून कोरोना विषाणूपासून वाचण्यासाठी कशाप्रकारची काळजी घेतली पाहिजे याचे संदेशही सोशल मिडियावर दिले जात आहे. भूषण आढावे यांनी बनवलेली अहिराणी पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदारपणे व्हायरल झाली आहे.

'कोरोना'च्या पार्श्वभूमीवर सोशल मीडियावर विविध हास्यविनोदाच्या काही पोस्ट बघून कोरोनाबाबतचा तणावही कमी होताना दिसत आहे. तसेच 'कोरोना गो गो करोना' हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात 'व्हायरल' झाला. त्यामुळे सोशल मीडियावर आज काय नवीन पोस्ट आली काय? यावर लोकांचे लक्ष लागून आहे. 'कोरोना विषाणू'ची नागरिकांच्या मनात भीती असली, तरी मात्र सोशल मीडियाच्या माध्यमातून चांगलीच करमणूक होऊन भीती दूर केली जात आहे. 'कोरोना व्हायरस'च्या घडामोडींबाबत व्हॉट्‌सऍप, फेसबुक, ट्‌विटर, इन्स्टाग्राम या सोशल मीडियावर रोज विविध हास्यविनोद पोस्ट, गाणी, टिकटॉकचे व्हिडिओ, कविता, गाणीसुद्धा 'व्हायरल' होत आहेत.

'कोरोना' हा जागतिक स्तरावर वेगाने वाढतोय, की ज्याची कल्पना काही दिवसांपूर्वी जगात कोणालाही नव्हती, सर्वांनीच याबर मात करण्यासाठी सरकारला एक मदत करा जिथे असाल तिथेचं रहावे. कोरोना संसर्गाची साखळी मोडीत काढावी. यासाठी समाजात जनजागृतीसाठी आवाहन करावे म्हणून मी ही पोस्ट तयार केली आहे - भूषण आढावे, मालेगाव.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख