malegaon sugar mill election panel signs declered | Sarkarnama

अजितदादांची `कपबशी`; तावरेंची `किटली`: कोण? कोणाला? चहा पाजणार?

कल्याण पाचंगणे
मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020

...

माळेगाव : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मंगळवारी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून राष्ट्रवादीपुरस्कृत नीलकंठेश्‍वर पॅनेलला कप-बशी, तर सत्ताधारी सहकार बचाव शेतकरी पॅनेलला किटली हे चिन्ह देण्यात आले. 14 अपक्षांना छत्री, विमान, कुकर, तुतारी, ढाल-तलवार, तुळशीवृंदावन, नारळ या चिन्हांच्या आधारे नशीब आजमावे लागणार आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी शहाजीराज हिरे व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शंकरराव कुंभार यांनी उमेदवारांना चिन्हवाटप केले. या वेळी नीलकंठेश्‍वर पॅनेलचे प्रमुख व उमेदवार बाळासाहेब तावरे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर, तानाजी कोकरे, नितीन जगताप यांच्या मागणीनुसार या पॅनेलला कप-बशी हे चिन्ह देण्यात आले, तर शेतकरी पॅनेलचे प्रमुख रंजन तावरे यांनी किटली हे चिन्ह घेतले. संगीता विलास सस्ते, चंद्रसेन चुडामण आटोळे, अरविंद भीमदेव बनसोडे, राजाभाऊ मानसिंग कोकरे, अनिल ज्ञानदेव तुपे, भरत मानसिंग वाघ, पोपट जिजाबा निगडे या अपक्ष उमेदवारांनी स्वतंत्र गट स्थापन करीत छत्री हे चिन्ह घेतले. शशिकांत रामभाऊ देवकाते यांना विमान, रवींद्र प्रल्हादराव धुमाळ यांना तुळशीवृंदावन, शिवाजी जयसिंग कोकरे यांना नारळ, मिथुन सोपानराव आटोळे यांना ढाल-तलवार, नीलेश कल्याण गावडे यांना कुकर, प्रशांत पांडुरंग सातव यांना तुतारी चिन्ह मिळाले.

दरम्यान, राष्ट्रवादीचेच; परंतु परस्परविरोधी नेते म्हणून ओळखले जाणारे उमेदवार ऍड. केशवराव जगताप, उमेदवार व माजी नगराध्यक्ष योगेश जगताप यांच्यात मंगळवारी मनोमिलन झाल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली. त्यांचे गळाभेटीचे छायात्रितही सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हायरल झाले. सहाजिकच, आता पणदरे गटात वरील दोन नेत्यांसह तानाजी कोकरे, एस. एन. जगताप, मंगेश जगताप, स्वप्नील जगताप, संगीता कोकरे आदींमध्ये निर्माण झालेला गोडवा येत्या निवडणुकीत कितपत यशस्वी होतो, ते पाहणे उत्सुकतेचे ठरते.

निवडणुकीआधी राष्ट्रवादीचा "शपथ'विधी

राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पॅनेल जाहीर झाले आणि पणदरे गटातील अधिकृत उमेदवारांमध्येच सोमवारी (ता. 10) किरकोळ कारणावरून काहीसा वाद झाला. त्याचे पर्यवसान थेट भैरवनाथ मंदिरात गुलाल उचलण्यापर्यंत झाले. शेवटी संबंधित नेतेमंडळींनी एकमेकांमधील वाद संपवून पॅनेल टू पॅनेल मतदान राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना करण्याची शपथ घेतली.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख