malegaon Karkhana issue over development | Sarkarnama

माळेगाव'च्या सभेत बाचाबाची; अंतिम भावाच्या विषयावरून वाद 

कल्याण पाचंगणे
शुक्रवार, 29 सप्टेंबर 2017

 

माळेगाव, ता. 29 ः माळेगाव साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत कारखाना मिल व डिस्टिलरी प्रकल्पाचे विस्तारीकरण, अंतिम भावाचा विषय वादग्रस्त ठरला.

 

माळेगाव, ता. 29 ः माळेगाव साखर कारखान्याच्या वार्षिक सभेत कारखाना मिल व डिस्टिलरी प्रकल्पाचे विस्तारीकरण, अंतिम भावाचा विषय वादग्रस्त ठरला.

"अध्यक्ष रंजनकाका प्रश्‍नाला उत्तर दिलेच पाहिजे, तुम्ही पेरले तसेच उगवत आहे. सवाल-जबाब झालाच पाहिजे,' अशी मागणी करीत अनिल जगताप यांच्यासह सभासदांनी सभेचे कामकाज दोनदा रोखले. याप्रसंगी गोंधळ होऊन सत्ताधारी आणि विरोधी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली, माईक हिसकाविले, एकमेकांना धक्काबुक्की झाल्याने सभेत काही वेळ तणाव निर्माण झाला. पोलिस अधिकारी व प्रकाश देवकाते यांच्यासह ज्येष्ठ मंडळींच्या हस्तक्षेपाने सभा पुढे सुरू झाली.

 
माळेगाव कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा कारखान्याचे अध्यक्ष रंजन तावरे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. कारखान्याचा वादग्रस्त कारभार सभासदांसाठी अलीकडे चिंतेचा विषय झाला आहे. अध्यक्ष तावरे आदी सत्ताधारी मंडळी सध्या विस्तारीकरणासह अनेक मनमानी निर्णय घेत असल्याची टीका वारंवार होत आहे. त्याचे पडसाद या सभेत पडले.

विस्तारीकरणाची माहिती व त्यासंबंधाने विचारलेल्या प्रश्‍नाला उत्तरे या वार्षिक सभेत तरी देणार आहे की नाही, असा प्रश्‍न करीत अनिल जगताप म्हणाले, ""माळेगाव कारखान्याची मिल, डिस्टलरीसह वीज प्रकल्पाच्या विस्तारीकरणासाठी सत्ताधाऱ्यांनी शंभर कोटींपेक्षा अधिक रकमेचे अंदाज पत्रक बनविले आहे. त्या अनुषंगाने वेगवेगळी चार हेल्थ सर्टिफिकेट साखर आयुक्तांकडून मिळविली आहेत. त्यापैकी सुमारे 60 कोटी रुपयांचे मिल व डिस्टिलरी प्रकल्पाचे आधुनिकीकरण असा शब्दप्रयोग करून विस्तारीकरण सुरू केले आहे. मुळातच या प्रकल्पाचे 70 कोटींचे अंदाजपत्रक चुकीचे व वाढीव आहे आणि नंतर यंत्रसामग्रीची खरेदी 52 ते 53 कोटीत बसविल्याचे सांगणे सयुक्तिक आहे का? डिस्टिलरी प्रकल्पाचे सुमारे तीस कोटी रुपयांचे आधुनिकीकरण तुम्हा करायचे होते, तर अगोदर तीन कोटी रुपये खर्चून इथेनॉल प्रकल्प नव्याने उभारण्याची आवश्‍यकता काय होती?'' 

त्यावर आक्षेप घेत इंद्रसेन आटोळे यांनी माईक हिसकावित, ""एवढा वेळ तुम्हीच बोलायचे का?'' असे म्हणून अरेरावी केली. त्यावर मदनराव देवकाते, विलास देवकाते, राजेंद्र ढवाण, विलास सस्ते, सतीश तावरे, रामभाऊ देवकाते आदींसह खाली बसलेल्या सभासदांनी सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही चालू देणार नसल्याचे सांगितले. या वेळी प्रकाश देवकाते, शिवाजी ढवाण यांनी हस्तक्षेप करीत वातावरण शांत केले.

या वेळी अशोक तावरे यांनी पाणी व उसाच्या क्षेत्राची टंचाई असताना विस्तारवाढ धोक्‍याची असल्याचे सांगितले. सभासद न करून घेणे व कामगारांचा बोनस कमी देणे, अंतिम भाव तीनशे रुपये कमी दिला, आदी मुद्द्यांवर शिवाजी ढवाण यांनी सभेचे लक्ष वेढले. 

"आधुनिकीकरण फायद्याचेच' 

अध्यक्ष रंजन तावरे म्हणाले, "माळेगाव कारखान्याचे सध्या होत असलेले आधुनिकीकरण फायद्याचे व नियमाला धरून आहे. या प्रकल्पाची मान्यता व्हीएसआय, साखर आयुक्त व सहकार न्यायालयाकडून घेतली आहेत. या पुढील काळात दर्जेदार साखर निर्मिती, उत्पादन खर्चात मोठी बचत होणार आहे. त्याचा परिणाम आगामी काळात ऊस दरामध्ये दिसून येईल. कारखान्याने साखर निर्मितीबरोबर वीज, इथेनॉल, डिस्टिलरी प्रकल्प उभारणीच्या बाबतीत योग्यवेळी निर्णय घेतला. त्यामुळे कारखाना ऊस दराच्याबाबतीत राज्यात अग्रेसर ठरला आहे.'' 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख