मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेकडून दादा भुसेंची उमेदवारी निश्‍चित, अन्य पक्षांमध्येच अनिश्‍चितता

 मालेगाव बाह्य मतदारसंघात शिवसेनेकडून दादा भुसेंची उमेदवारी निश्‍चित, अन्य पक्षांमध्येच अनिश्‍चितता

मालेगाव : विधानसभा निवडणुकीसाठी मालेगाव बाह्य विधानसभा मतदारसंघात इच्छुकांची संख्या मोठी आहे. मतदारसंघातून हॅटट्रीक करणारे विद्यमान आमदार व ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांची शिवसेनेकडून उमेदवारी निश्‍चित आहे. भुसे वगळता इतर इच्छुकांची गणिते आघाडी व युतीच्या निर्णयावर अवलंबून आहेत. श्री. भुसे यांनी जोरदार तयारी केली असून ते निवडून आल्यास चौथ्यांदा या मतदारसंघातून विजयी होणारे ते पहिले उमेदवार ठरतील. 

भाजपकडून पक्षाचे महापालिकेतील गटनेते सुनील गायकवाड, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनिषा पवार यांच्यासह सात जण इच्छूक आहेत. कॉंग्रेस व राष्ट्रवादीकडून अनेक नावे चर्चेत असली तरी ठोस नावे अजूनही पुढे येत नाही. युवा नेते अद्वय हिरे यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून आहे. मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे आघाडीचे उमेदवार होतील का ? याविषयीही चर्चा होत आहे. लढतीचे समीकरण युती व आघाडीच्या निर्णयावरच अवलंबून आहे. 

शिवसेनेकडून उमेदवारी निश्‍चित असल्याने दादा भुसे यांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. मेळावे व बैठकांच्या माध्यमातून त्यांचा जनसंपर्क सुरु आहे. भाजपकडून इच्छुकांची संख्या सर्वाधिक आहे. ऐनवेळी गेल्या निवडणुकीसारखी युती तुटेल असा इच्छूक व त्यांच्या समर्थकांचा व्होरा आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापल्या परीने उमेदवारीची मोट बांधण्यास सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यात नाशिक येथे पक्ष निरीक्षकांना पक्षाचे महापालिकेतील गटनेते सुनील गायकवाड, ज्येष्ठ नेते सुुरेश निकम, पक्षाचे जिल्हाध्यक्ष दादा जाधव, जिल्हा परिषद सदस्य समाधान हिरे, तालुकाप्रमुख निलेश कचवे, जिल्हा सरचिटणीस दीपक पवार, जिल्हा परिषदेच्या बांधकाम सभापती मनिषा पवार यांनी मुलाखती दिल्या. पवार ह्या नांदगाव मधुनही इच्छूक आहेत. मालेगाव बाह्यमध्ये त्यांनी दिलेल्या मुलाखतीमुळे भाजपसह अनेक इच्छुकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 

राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून युवानेते अद्वय हिरे, मविप्रचे संचालक डॉ. जयंत पवार व मामको बॅंकेचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले यांची नावे घेतली जात आहेत. हिरे यांनी अद्याप भूमिका स्पष्ट केलेली नाही. अद्वय यांचे बंधू अपूर्व हिरे नाशिक पश्‍चिम मधून निवडणूक लढविणार आहेत. त्यामुळे अद्वय येथे निवडणूक लढविण्याबाबत काय निर्णय घेतात याबाबत त्यांच्या समर्थकांमध्ये उत्सुकता आहे. हिरेंची भूमिका गुलदस्त्यात असल्याने भविष्यातील राजकीय आखाडे मांडणे गुंतागुंतीचे ठरत आहे. 

कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत तशी शांतता आहे. अवघ्या काही दिवसांवर निवडणूक आली असतानाही कार्यकर्त्यांच्या बैठका, मेळावे होताना दिसत नाहीत. आघाडीतून जागा कॉंग्रेसला सुटते की राष्ट्रवादीला याबाबतही अजून निर्णय झालेला नाही. कॉंग्रेसकडून पक्षाचे जिल्हाध्यक्ष व मविप्रचे अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे तसेच बाजार समितीचे माजी सभापती प्रसाद हिरे यांच्या नावांची चर्चा आहे. अद्वय हिरेंनी भूमिका जाहीर केल्यानंतरच आघाडीचा उमेदवारीची गणिते सुटू शकतील. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष भारत म्हसदे इच्छूक आहेत. 

युती झाल्यास जागा शिवसेनेलाच सुटेल यामुळे भाजपचे इच्छूक बॅकफुटवर आहेत. युती हमखास होण्याच्या शक्‍यतेमुळे शिवसेना मात्र बिनधास्त आहे. आघाडी व युती झाल्यास इच्छूकांपैकी कोणी बंडाचे निशाण फडकावितो का या विषयीही उत्सुकता असेल. आघाडी व युतीच्या भिजत घोंगड्यामुळे चित्र स्पष्ट होत नाही. इच्छुक आपापल्यापरीने सावध पवित्रा घेत आहेत. ऐनवेळी आयात उमेदवाराच्या गळ्यातही उमेदवारी पडण्याची शक्‍यताही व्यक्त केली जात आहे. 
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com