#CoronaEffect एप्रिल फूल कराल तर जेलमध्ये जाल: तेजस्वी सातपुते - Making April Fool This Year May land you in Jail | Politics Marathi News - Sarkarnama

#CoronaEffect एप्रिल फूल कराल तर जेलमध्ये जाल: तेजस्वी सातपुते

सरकारनामा ब्युरो
सोमवार, 30 मार्च 2020

एक एप्रिल या दिवशी कोरोनाच्या अनुषंगाने चुकीचे मॅसेज पाठविले जाऊ शकतात. असे मॅसेज पाठविणाऱ्यांना थेट जेलमध्ये जावे लागेल, असा इशारा साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी  दिला आहे

सातारा : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर दोन दिवसांत एक एप्रिल येत आहे. प्रचलित प्रथेनुसार एप्रिल महिन्यात अनुषंगाने सर्वजण एकमेकांना ‘एप्रिल फूल’ करुन गंमतीने फसविण्याचा प्रयत्न करीत असतात. परंतू यावेळी कोरोनाचे संकट संपूर्ण जगभर पसरलेले आहे. त्यामुळे एक एप्रिल या दिवशी कोरोनाच्या अनुषंगाने चुकीचे मॅसेज पाठविले जाऊ शकतात. असे मॅसेज पाठविणाऱ्यांना थेट जेलमध्ये जावे लागेल, असा इशारा साताऱ्याच्या एसपी तेजस्वी सातपुते यांनी  दिला आहे.

सालाबादप्रमाणे एक एप्रिलला देशातील सर्वच नागरिक एप्रिल फूल म्हणून अनेकांना फसविण्यासाठी विनोदी मॅसेज टाकतात. यामुळे अनेकांचे मनोरंजन होत असले तरी या मॅसेजमुळे गंभीर परिस्थितीही उद्भवत असते. या महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्या अनुषंगाने एक एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल दिवशी अनेक लोक कोरोनाच्या अनुषंगाने विनोद तसेच खोटे मॅसेज प्रसारित करु शकतात, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच एखादा अनुचित प्रसंगही घडण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. 

त्यामुळे जिल्ह्यातील सोशल मीडिया वापरणारे नागरिक तसेच विविध व्हाटसऍप ग्रुपचे ऍडमिन यांनी ग्रुपमधील सदस्यांना अशाप्रकारचे मॅसेज प्रसारित करु नयेत. याबाबत कळवावे. अन्यथा एक एप्रिल दिवशी व्हाटसऍप ग्रुपचे सेटिंग बदलून केवळ अॅडमिनच मॅसेज पाठवू शकेल, असे सेटिंग करावे. अन्यथा एप्रिल फूल दिवशी कोरोनाशी संबंधित कोणतेही चुकीचे मॅसेज प्रसारित केले तर व्हाटसऍप अॅडमिनसह सदस्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख