"गोकूळ' कार्ड महाडीकांच्या पथ्यावर  - major role of gokul in kolhapur politics | Politics Marathi News - Sarkarnama

"गोकूळ' कार्ड महाडीकांच्या पथ्यावर 

सरकारनामा ब्युरो 
बुधवार, 22 मार्च 2017

श्री. महाडीक यांच्यासह कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील यांची जिल्ह्याचे प्रमुख आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या "गोकूळ' वर सत्ता आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निमित्ताने निमित्ताने पी. एन. -महाडीक यांच्यातच वाद लावण्याचा प्रयत्न झाला. या मागेही "गोकूळ' ची भविष्यातील निवडणूक या दोघांत वाद लावून जिंकण्याचेच मनसुबे होते. पण हे मनसुबेही श्री. महाडीक यांनी ऐनवेळी काढलेल्या "कार्ड' मुळे धुळीस मिळाले. 

कोल्हापूर : चुरशीने झालेल्या जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत माजी आमदार महादेवराव महाडीक यांनी शेवटच्या क्षणी काढलेले "गोकूळ' कार्ड महत्त्वाचे ठरले. पडद्यामागे श्री. महाडीक यांनी खेळलेली चाल यशस्वी झाली. 

कॉंग्रेसचे जमतयं अशी कुणकूण लागताच श्री. महाडीक यांनी पहिला दणका दिला तो माजी आमदार बजरंग देसाई यांना. त्यांच्या स्नुषा सौ. रेश्‍मा देसाई ह्या कॉंग्रेसच्या चिन्हावर निवडून आल्या आहेत, पण त्यांचे दीर धैर्यशील हे "गोकूळ' चे संचालक आहेत. सौ. रेश्‍माला गैरहजर ठेवा एवढाच आदेश श्री. महाडीक यांनी दिला, श्री. देसाई यांनीही तो पाळला आणि सौ. देसाई सभागृहात आल्याच नाहीत. 
रात्री अकरा वाजेपर्यंत शिवसेनेचे आमदार सत्यजित पाटील हे दोन सदस्यांसह कॉंग्रेसच्या गोटातच होते. श्री. सरूडकर यांच्या मातोश्री "गोकूळ' च्या संचालिका आहेत. त्यांच्या बाबतीतही हीच खेळी खेळल्यानंतर रात्री दोन वाजता ते दोन सदस्यांसह कराडला भाजपच्या गोटात सहभागी झाले. 

चंदगडच्या राष्ट्रवादीच्या आमदार संध्यादेवी कुपेकर यांचे दोन सदस्य आहेत. शेवटपर्यंत हे सदस्य कॉंग्रेससोबत येतील यासाठी प्रयत्न सुरू होते. राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष तटकरे यांच्याकरवी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्न झाला. पण श्रीमती कुपेकर यांचेही एक पुतणे रामराजे हे "गोकूळ' चे संचालक तर आहेतच पण महाडीकांचे ते जावई आहेत. हे नातेसंबंधांचे कार्ड या दोन सदस्यांसाठी महाडीकांनी काढले. श्रीमती रेखा हत्तरकी ह्या "गोकूळ' चे माजी संचालक राजकुमार हत्तरकी यांच्या पत्नी. त्यांचे पुत्र सदानंद यांचा "गोकूळ' च्या निवडणुकीत पराभव झाला. त्यांना सद्य असलेल्या एका रिक्त जागेवर संधी देण्याचे आश्‍वासन देऊन महाडीकांनी श्रीमती हत्तरकी यांना आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवले. 

शिंगणापूर गटातून अपक्ष म्हणून विजयी झालेल्या रसिका पाटील ह्या सत्तेसोबतच असतील असे त्यांचे सासरे व्ही. बी. पाटील यांनी सांगितले होते. अपेक्षेप्रमाणे भाजपची सत्ता येणार म्हटल्यावर त्याही रात्री भाजपला जाऊन मिळाल्या. अध्यक्ष निवडीत त्यांनी त्यांच्याच बाजूने हात वर करून भाजपच्या पारड्यात आपले मत टाकले. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख