रोज शेतात राबतात अन शिकतात ही मुलं ! 

गरिबांच्या मुलांना शिक्षण मिळावे, यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी साताऱ्यातील छत्रपती शिवाजी कॉलेजमध्ये सुरू केलेली "कमवा आणि शिका' योजना आजही तितक्‍याच कर्तव्यनिष्ठेने सुरू आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातील मुले, मुली येथे कष्ट करत शिक्षण घेत आहेत. गरिबीची कारणे सांगत पळणाऱ्यांना संघर्षाचा संदेश देत आहेत.
रोज शेतात राबतात अन शिकतात ही मुलं ! 
रोज शेतात राबतात अन शिकतात ही मुलं !

कर्मवीरअण्णांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षण बहुजनांपर्यंत, खेडोपाड्यार्पंत पोचवले. त्याकाळात शिक्षण न मिळण्यामागे आर्थिक परिस्थितीचे कारण दिले होते. ती परिस्थिती आजही पूर्णपणे नाहीशी झालेली नाही; मात्र, कर्मवीरअण्णांनी त्या काळात या प्रश्‍नावर "कमवा व शिका' योजनेचा मार्ग शोधला होता. देशात स्वातंत्र्याची पहाट उजाडत असताना अण्णांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज सुरू केले. तिथे "कमवा आणि शिका' योजना सुरू केली. ती योजना आजही सुरू आहे. 

या योजनेतील मुले कॉलेजच्या सुमारे अकरा एकर शेतीत कष्ट करतात. त्यातून मिळणारे उत्पन्न आणि समाजातून मिळणाऱ्या देणग्यांवर या मुलांचा खर्च केला जातो. दिवसांतील पाच तास ही मुले शेतात कष्ट करतात. शेती बरोबरच बैल आणि म्हशीही विद्यार्थी सांभाळतात. म्हशींच्या दुधापासून त्यांना चांगले उत्पन्न मिळते. 

सध्या या योजनेतील मुलांना शेतीतील कामाबरोबरच ग्रंथालय, बीपीओ सेंटर, संगणक कक्ष अशा ठिकाणी कामे दिली जातात. तसेच शेतीचेही आधुनिक ज्ञान मिळावे, त्यातून प्रत्यक्ष आधुनिक तंत्रज्ञान राबविता यावे, यासाठी कमवा आणि शिका योजना आधुनिक करण्याचा निर्णय संस्थेने घेतला आहे. त्यासाठी रयतचे कार्यकारिणी सदस्य डॉ. पतंगराव कदम यांनी पुढाकार घेतला आहे.

जैन इरिगेशनच्या माध्यमातूनही मुलांना शेतीसाठी आधुनिक सुविधा दिल्या जात आहेत. आता येथे माती व पाण्याशिवाय शेती असे उपक्रम राबविण्याबरोबरच हरितगृहातील शेती फुलविली जाणार आहे. या शेतीतून मुले ऊस, ज्वारी, विविध प्रकारची फुले, भाजीपाल्याचे उत्पादन घेतात. कमवा आणि शिका योजनेतून विद्यार्थी स्वावलंबी व्हावीत, यासाठी त्यांना विविध व्यावसायिक शिक्षणाचेही प्रशिक्षण दिले जात आहे. 

Related Stories

No stories found.