भाजपच्या नाकर्तेपणामुळे स्मार्ट पुण्याचे रॅंकिंग घसरले - खासदार वंदना चव्हाण

स्मार्ट सिटीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांच्या नोंदीही केंद्र सरकारकडे गेल्या काही महिन्यांत महापालिकेला पोचविता आलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित असलेला निधीही केंद्र सरकारकडून मिळालेला नाही. परिणामी पुणे स्मार्ट सिटीची हेळसांड झाली, असा आरोप खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे
MP Vandana Chavan Held BJP Responsible for Smart City Ranking
MP Vandana Chavan Held BJP Responsible for Smart City Ranking

पुणे : स्मार्ट सिटी प्रकल्पात पुण्याचा क्रमांक आता २८ व्या क्रमांकावर गेला आहे, असे प्रसारमाध्यमांतून वाचल्यावर आश्‍चर्याचा धक्का बसला. केंद्रात, महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे. महापालिकेत स्पष्ट बहुमत असतानाही भाजपच्या कारभारामुळे पुण्याचा लौकीक घसरल्याचे स्मार्ट सिटीच्या रॅंकिंगमधून उघड झाले आहे. या वस्तुस्थितीला केवळ प्रशासनच नव्हे तर, सत्ताधारी म्हणून भाजपचे सपशेल अपयश आहे, असा आरोप खासदार वंदना चव्हाण यांनी केला आहे. 

आपल्या फेसबूक पोस्टमध्ये त्या म्हणतात....'पुणे शहर हे मुळातच स्मार्ट शहर आहे. गेल्या १५-२० वर्षांत शहराचा कायापालट झाला असून पुरेसा प्रमाणात पायाभूत सुविधाही निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे शहराची वाढ झपाट्याने झाली. म्हणूनच स्मार्ट सिटी प्रकल्पात जून २०१६ मध्ये देशात पुण्याची दुसऱ्या क्रमांकाने निवड झाली. त्यावेळी पुणे महापालिकेत राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता होती. तेव्हा शहरातील १४ प्रकल्पांचे भूमिपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले होते. महापालिकेतील राष्ट्रवादीच्या उत्तम कामामुळे लाईट हाऊस, स्मार्ट क्‍लिनिक, प्लेस मेकिंग, स्मार्ट स्कूल, स्मार्ट स्ट्रीट, हॅपी स्ट्रिट, ई- बसची खरेदी आदी अनेक प्रकल्पांना सुरुवात झाली. मात्र, महापालिकेत भाजपची सत्ता आल्यावर स्मार्ट सिटीचे काम एकदम ठप्प झाले. गेल्या दहा महिन्यांत एकाही नव्या प्रकल्पाला सुरुवात झाली नाही आणि काम सुरू असलेला एकही प्रकल्प वेळेत पूर्ण झाला नाही,''

''स्मार्ट सिटीमध्ये महापालिकेच्या माध्यमातून होत असलेल्या कामांच्या नोंदीही केंद्र सरकारकडे गेल्या काही महिन्यांत महापालिकेला पोचविता आलेल्या नाहीत. त्यामुळे महापालिकेला अपेक्षित असलेला निधीही केंद्र सरकारकडून मिळालेला नाही. परिणामी पुणे स्मार्ट सिटीची हेळसांड झाली. महापालिकेतील सत्ताधारी फक्त निविदां आणि त्यातील टक्केवारीमध्ये मग्न असल्यामुळे दैनंदिन कारभाराकडे त्यांचे दुर्लक्ष होत आहे, हे स्मार्ट सिटीच्या या उदाहरणातून अधोरेखित झाले आहे,'' असेही खासदार चव्हाण यांनी म्हटले आहे. 

''केंद्रात भाजपची सत्ता आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारही महापालिकेला सहकार्य करीत आहे. तरीही शहरासाठी नव्या विकास प्रकल्पांची मांडणी आणि अंमलबजावणी भाजपला गेल्या दीड वर्षांत करता आलेली नाही. भाजपचे महापालिकेतील पदाधिकारी, आमदार आणि खासदार यांचेही स्मार्ट सिटीकडे लक्ष नाही. तसेच पुण्यातून आमदार झालेल्या भाजपच्या प्रदेशाध्यक्षांचेही स्मार्ट सिटी आणि महापालिकेतील कारभाराकडे दुर्लक्ष झाले आहे, असे आता स्पष्ट झाले आहे. त्यामुळे भाजपच्या नाकर्तेपणामुळेच पुण्याचे रॅंकिंग घसरले आहे. त्यामुळे आपल्या अपयशाचे खापर अन्य कोणावर फोडण्यापेक्षा भाजपने आपल्या कारभारात सुधारणा करावी आणि पुणेकरांचा विश्‍वासघात न करता, त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करावी,'' असा सल्ला त्यांनी दिला आहे.
Edited By - Amit Golwalkar

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com