उचलली जीभ लावली टाळ्याला : रेणुका शहाणेंचे कंगनाला खडे बोल - Renuka Shahave Hits at Kangana Ranaut over POK Statement | Politics Marathi News - Sarkarnama

उचलली जीभ लावली टाळ्याला : रेणुका शहाणेंचे कंगनाला खडे बोल

सरकारनामा ब्युरो
शुक्रवार, 4 सप्टेंबर 2020

प्रिय कंगना, सरकारवर जरुर टीका करावी. पण मुंबई शहराची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी करणे हे अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. मुंबईकर म्हणून मला हे अजिबात आवडलेले नाही. मात्र, तुझ्याकडून आणखी काही चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणे, हा कदाचित माझा भोळेपणा असू शकेल, असे ट्वीट रेणुका शहाणे यांनी केले आहे.

मुंबई : ''मुंबई शहराने तुझे बाॅलीवूड स्टार बनण्याचे स्वप्न पूर्ण केले. वास्तविक तू या शहराबाबत कृतज्ञता व्यक्त करायला हवी होतीस. मात्र, या सुंदर शहराची तुलना तू पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी करावी, हे भयानक आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला,'' अशा शब्दांत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी सध्या वादग्रस्त ठरलेली अभिनेत्री कंगना राणावतला ट्वीटच्या माध्यमातून सुनावले आहे. 

शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघडपणे धमकी देत, मुंबईला येऊ नये असे सांगितले आहे, असा आरोप अभिनेत्री कंगना राणावत हिने काल केला. 'मुंबई पाकव्याप्त काश्मीर प्रमाणे का वाटते? असा सवालही केला आहे. कंगनाने ट्वीट करुन राऊत यांच्यावर हा आरोप केला होता. कंगनाने आपल्या विविध ट्वीटमधून बाॅलीवूडमधील अंमली पदार्थांचा वापर व व्यापार यावर टीका करत अनेक अभिनेत्यांची नांवे घेत आरोप केले होते. त्यानंतर तिने मुंबई पोलिसांची सुरक्षा नाकारली होती. आपल्याला केंद्र सरकार किंवा हरियाणा सरकारने सुरक्षा द्यावी, अशी मागणी तिने केली होती. त्यावरुन कंगनावर विविध स्तरांतून टीका होत आहे. 

तिच्या या ट्वीटनंतर रेणुका शहाणे यांनी ट्वीट करुन कंगनाला खडे बोल सुनावले. त्याला कंगनाने त्यांना प्रत्त्युत्तर दिले होते. एखाद्या ठिकाणच्या सरकारच्या खराब प्रशासनावर टीका करणे म्हणजे त्या ठिकाणावर टीका हे ओघानेच आले हे समजण्याएवढ्या आपण भोळ्या असाव्यात असे वाटत नाही. तुम्ही गिधाडांनी माझ्या शरीराचे लचके तोडण्याची वाट पहात आहात का? आपणाकडून यापेक्षा चांगल्या गोष्टींची अपेक्षा होती,'' असे कंगनाने रेणुका शहाणे यांना टॅग करुन केलेल्या ट्वीटमध्ये म्हटले होते.

त्यावर रेणुका शहाणे यांनी पुन्हा एकदा कंगनाला शहाणपणाचे बोल सुनावले आहेत. ''प्रिय कंगना, सरकारवर जरुर टीका करावी. पण मुंबई शहराची तुलना पाकिस्तान व्याप्त काश्मीरशी करणे हे अत्यंत खालच्या दर्जाचे आहे. मुंबईकर म्हणून मला हे अजिबात आवडलेले नाही. मात्र, तुझ्याकडून आणखी काही चांगल्या गोष्टींची अपेक्षा करणे, हा कदाचित माझा भोळेपणा असू शकेल," असे ट्वीट रेणुका शहाणे यांनी केले आहे.
Edited By- Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख