शारदाबाईंच्या संस्कारामुळेच पवार कुटुंबिय खंबीर : सुप्रिया सुळे - NCP MP Supriya Sule Pays Tribute to Grandmother Shardabai Pawar | Politics Marathi News - Sarkarnama

शारदाबाईंच्या संस्कारामुळेच पवार कुटुंबिय खंबीर : सुप्रिया सुळे

मिलिंद संगई
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

शारदाबाई या अतिशय वेगळ्या होत्या. माझे वडील (शरद पवार) हे राजकीय दौ-यांच्या निमित्ताने बाहेर फिरत असत. मात्र ते रात्री कितीही वाजता घरी आले तरी त्यांना त्या गरमच जेवायला वाढत असत. रात्री दोन वाजताही शारदाबाईंनी पवारसाहेबांना गरम भाकरी करुन दिल्याचे मी स्वतः पाहिले आहे, अशी आपल्या आजींची आठवण खासदार सुप्रिया सुळे यांनी आज जागवली

बारामती : आपल्या कुटुंबाने नेहमी आपल्याप्रमाणेच कणखर असायला हवे, असा शारदाबाईंचा कमालीचा आग्रह असे, लहानपणी आमच्या आजीला आम्ही जे पाहिले त्याचे संस्कार आमच्यावरही झाले आहेत, आपल्या मुलांसह संपूर्ण कुटुंबावर त्यांनी कायमच जीव लावला.... त्यांचा खंबीरपणा सर्वच पवार कुटुंबियांमध्ये आज दिसतो, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी शारदाबाई पवार यांच्या आठवणी आज जागविल्या. 

शारदाबाई पवार यांच्या ४५ व्या स्मृतीदिनानिमित्त आज सुप्रिया सुळे यांनी ट्विटरवरुन त्यांच्या आठवणींना उजाळा दिला आहे. या ट्विटमध्ये त्यांनी नमूद केल आहे की माझी आजी शारदाबाई पवार आम्हा सर्वांना सोडून गेली त्याला आज ४५ वर्षे झाली. मला ती आजही आठवते. मी सहा तर अभिजीत चार वर्षांचे असताना विजू अक्का आम्हा दोघांना तिच्या भेटीसाठी घेऊन गेल्या होत्या. आम्हाला पाहून तिच्या चेह-यावर खुललेल हसू आजही आठवतं. ती आमची शेवटची भेट. 

या संदर्भात बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, ''शारदाबाई या अतिशय वेगळ्या होत्या. माझे वडील (शरद पवार) हे राजकीय दौ-यांच्या निमित्ताने बाहेर फिरत असत. मात्र ते रात्री कितीही वाजता घरी आले तरी त्यांना त्या गरमच जेवायला वाढत असत. रात्री दोन वाजताही शारदाबाईंनी पवारसाहेबांना गरम भाकरी करुन दिल्याचे मी स्वतः पाहिले आहे. आम्ही त्या वेळेस बारामतीतील आमराईतील घरात राहायचो. साहेब रात्री येईपर्यंत बाई त्यांची वाट पाहत घराच्या पायरीवर बसून असायच्या. त्या काळात मोबाईल किंवा काहीही संपर्काचे साधन नसायचे, पण साहेबांना कितीही उशीर झाला तरी त्या जागून त्यांची वाट पाहत असत. साहेब जेव्हा घरी यायचे तेव्हा लगेच त्यांना गरम गरम जेवण त्या वाढत. 

त्यांच्या आजारपणाच्या काळात त्या मुंबईला होत्या पण त्या काळातही त्या कमालीच्या खंबीर होत्या. अनेकदा त्या लंगडत चालायच्या पण चेह-यावर त्यांचा शारिरीक त्रास कधीच त्यांनी दाखवला नाही,''

अजितदादा फेव्हरेट नातू.....

सगळ्या नातवंडांमध्ये अजित पवार हेच त्यांचे सर्वाधिक लाडके नातू होते. बाईंकडून सर्वात जास्त लाड अजितदादांचे व्हायचे. बाईंकडे जे काही शेलकं या प्रकारात मोडणारे खाद्यपदार्थ असायचं त्या ते अजितदादांसाठी  राखून ठेवायच्या. बाकीच्या सर्व नातवांनी शेअर करायचं पण दादांसाठी वेगळं बाई राखून ठेवायच्या, इतका त्यांचा जीव दादावर होता. अजितदादा हे शारदाबाईंचे सर्वात फेव्हरेट नातू म्हणून कुटुंबिय ओळखायचे. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख