पक्ष आणि कुटुंबाच्या आग्रहामुळे राजकारणातील पहिलं पाऊल : आमदार मेधा कुलकर्णींची राजकीय वाटचाल

राजकारणाची फारशी आवड मला नव्हती. राजकारणात येईन असेदेखील कधी वाटले नव्हते. माझ्या शिक्षकी पेशात मी आनंदी होते. सोबत महिला अन्याय निवारण समितीच्या माध्यमातून काम सुरू होते. मात्र 2002 च्या पुणे महापालिका निवडणुकीत पक्ष आणि कुटुंबियांच्या आग्रहामुळे अचानकपणे उमेदवारी माझ्याकडे चालून आली आणि राजकारणातील माझे ते पहिले पाऊल ठरले.... कोथरूडच्या भाजपच्या आमदार मेधा कुलकर्णी सांगताहेत आपल्या राजकीय प्रवासाविषयी...
पक्ष आणि कुटुंबाच्या आग्रहामुळे राजकारणातील पहिलं पाऊल : आमदार मेधा कुलकर्णींची राजकीय वाटचाल

माझं माहेर आणि सासरची दोन्ही कुटुंब राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहेत. वडील मधुकर पाटणकर व्यवसायाने डॉक्‍टर आहेत. गोवा मुक्ती संग्रामातील सैनिक होते. आई महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत शिक्षिका होती.  मी मात्र प्रत्यक्ष राजकारणात कधीच नव्हते. "बीएस्सी' केल्यानंतर "बीएड'ला प्रवेश घेतला. बीएडला पुणे विद्यापीठात पहिला क्रमांक मिळवून सुवर्णपदकाची मानकरी ठरले. "एमएड'लादेखील विद्यापीठात दुसरा क्रमांक मिळविला. त्यानंतर सेवासदन अध्यापिका महाविद्यालयात प्राधापिका म्हणून कामाला सुरवात केली.

या काळात प्रत्यक्ष राजकारणात नव्हते. मात्र त्यावेळी भारतीय जनता पार्टीच्या महिला आघाडीच्यावतीने महिला अन्याय निवारण समितीचे काम चालायचे. या कामात मी सहभागी झाले. विविध ठिकाणी महिलांवर होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या समितीमार्फत केले. 2000 च्या सुमाराचा हा काळ होता. सेवासदनमधील प्राध्यापिकेची नोकरी करून हे काम मी करीत होते.

त्यात 2002 साली पुणे महापालिकेची निवडणूक जाहीर झाली. त्यावेळी तीन नगरसेवकांचा प्रभाग होता. भारतीय जनता पक्ष व शिवसेनेची युती होती. प्रभाग क्रमांक 29 मधून शाम सातपुते, मी आणि शिवसेनेकडून राजा बलकवडे यांना उमेदवारी देण्यात आली. मला राजकारणाचा अनुभव काहीच नव्हता. प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांना शिकविणे हेच माझ्या आवडीचे काम. उमेदवारी मला देण्याचे निश्‍चित झाले. मात्र मी त्यासाठी तयार नव्हते. मी उमेदवारी नाकारली. मुलं लहान होती. त्यांच्याकडे लक्ष देणे गरजेचे होते. माझे पती विश्राम तसेच माहेर आणि सासरच्या लोकांनी समजावून सांगितले. माझी स्वत:ची मानसिक तयारी अजिबात नव्हती. शेवटी संघाच्या आणि भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी माझी समजूत घातली.

या निवडणुकीत कॉंग्रेसच्यावतीने माझ्याविरोधात कर्नाटक हायस्कूलच्या त्यावेळच्या मुख्याध्यापिका देविका नाडीग यांना उमेदवारी देण्यात आली होती. माझ्याविरोधात म्हणण्यापेक्षा त्यांना कॉंग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यामुळे माझे शिक्षण क्षेत्राचे "बॅकग्राऊंड' पाहून मला त्यांच्याविरोधात उमेदवारी देण्याचे पक्षाने निश्‍चित केले होते. विद्यमान खासदार अनिल शिरोळे हे त्यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष होते. त्यांनीच माझे नाव पहिल्यांदा सुचविले होते.

साऱ्यांनी आग्रह केल्यानंतर माझा नाईलाज होता. अगदी शेवटच्या दिवशी धावपळ करून उमेदवारी अर्ज भरला. विश्रामला अनेक निवडणुकांचा अनुभव होता. उमेदवार कुणीही असला तरी त्या प्रभागाची प्रचाराची यंत्रणा तोच राबवते असे. त्यामुळे त्याचा फायदा मला झाला. ती निवडणूक मोठया फरकांच्या मतांनी मी निवडून आले. शिवसेनेचे राजा बलकवडे, कॉंग्रेसचे शिवा मंत्री व भाजपाकडून मी, असे तीन पक्षांचे तिघेजण आम्ही निवडून आलो. त्या निवडणुकीत मी नवीन होते. मात्र त्यानंतर 2007, 20012 च्या च्या निवडणुकीत मी सहजपणे निवडून येत गेले. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपा-शिवसेना युती तुटल्याने मला भाजपाकडून उमेदवारी मिळाली आणि पहिल्यांदा आमदार होण्याची संधी मिळाली. मात्र माझे राजकारणातील पहिले पाऊल 2002 च्या निवडणुकीच्या माध्यमातून पडले ते आजतागायत अखंडपणे सुरू आहे. 
 

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in