गेहलोत - पायलट यांच्यातले नाटक पुन्हा सुरु होऊ शकते : मायावती - Mayawati not confident about Rajashthan Congress Governments Stability | Politics Marathi News - Sarkarnama

गेहलोत - पायलट यांच्यातले नाटक पुन्हा सुरु होऊ शकते : मायावती

वृत्तसंस्था
मंगळवार, 11 ऑगस्ट 2020

राजस्थानात अशोक गेहलोत व सचिन पायलट यांच्यात दीर्घकाळ सुरु असलेल्या वादामुळे राज्यातल्या लोककल्याणकारी योजनांना खीळ बसली, अशी टीका बहुजन समाजाच्या अध्यक्षा मायावती यांनी केली आहे

लखनौ : ''राजस्थानातील काँग्रेस सरकार सध्या तरी सुरक्षित झाल्यासारखे दिसते आहे. मात्र, मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातले नाटक पुन्हा कधी सुरु होईल, हे सांगता येत नाही,'' असे प्रतिपादन बहुजन समाज पक्षाच्या प्रमुख व उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी केले आहे. या नेत्यांमध्ये दीर्घकाळ सुरु असलेल्या वादामुळे राज्यातल्या लोककल्याणकारी योजनांना खीळ बसली, अशी टीकाही त्यांनी केली. 

पायलट यांनी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची काल भेट घेतली होती. यानंतर आज त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या भेटीची वेळ मागितली होती. त्यांना तातडीने भेटीची वेळ देण्यात आली. राहुल गांधी यांच्या निवासस्थानी झालेल्या या भेटीत राहुल यांच्यासोबत प्रियांका गांधी याही होत्या. या दोन्ही नेत्यांनी पायलट यांच्याशी चर्चा केली. याचबरोबर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल आणि के.सी.वेणुगोपाल यांच्या संपर्कात पायलट कायम होते. पायलट यांनी आता मवाळ भूमिका घेतली आहे. ते पक्षात परत येण्याच्या प्रयत्नात आहेत. याचवेळी त्यांच्यासोबत गेलेले बंडखोर आमदारही परत येण्यासाठी पक्ष नेतृत्वाच्या संपर्कात आहेत.

राहुल व प्रियंका यांच्याशी झालेल्या भेटीनंतर पक्षाने आता तीन सदस्यीय समिती नेमली आहे. ही समिती पायलट यांनी उपस्थित केलेल्या मुद्यांवर विचार विनिमय करणार आहे. स्वतः पायलट यांनीच ही माहिती पत्रकारांना दिली. राजकारणात व्यक्तीगत शत्रुत्वाला स्थान नसते, असेही विधान त्यांनी केले. राहुल व प्रियंका यांनी आमचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व आम्ही उपस्थित केलेले मुद्दे सोडवण्यासाठी निश्चित कार्यक्रम आखला जाईल, असे आश्वासनही दिल्याचे पायलट यांनी सांगितले. मात्र, हे बंड पूर्णपणे क्षमले आहे किंवा कसे याबाबत मायावती यांनी आता शंका उपस्थित केली आहे.

''ज्यावेळी देशात कोरोनाचे थैमान सुरु होते त्यावेळी सरकारने लोकांवर लक्ष केंद्रीय करायला हवे होते. माझ्या मते सरकार कोरोनाशी लढण्याबाबत गंभीर नव्हते व जनतेच्या हिताची अनेक कामे त्यामुळे खोळंबली. भविष्यातही असे होईल, ही शक्यता नाकारता येत नाही,'' असेही मायावती म्हणाल्या. 
Edited By - Amit Golwalkar
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख