विलगीकरणातील व्यक्तींचा कचरा विल्हेवाटीसाठी शीतल देसाई यांचा पुढाकार - Mahim Corporator Shital Desai Initiated Isolation Garbage Collection | Politics Marathi News - Sarkarnama

विलगीकरणातील व्यक्तींचा कचरा विल्हेवाटीसाठी शीतल देसाई यांचा पुढाकार

सरकारनामा ब्युरो
रविवार, 30 ऑगस्ट 2020

कोरोनाच्या वाढत्या फैलावात घरीच विलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी निर्माण केलेल्या कचऱ्याची महापालिकेने व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी यासाठी माहीमच्या नगरसेविका शीतल देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे कार्यकर्ते हा कचरा गोळा करून महापालिकेकडे सोपवीत आहेत

मुंबई : कोरोनाच्या वाढत्या फैलावात घरीच विलगीकरणात असलेल्या व्यक्तींनी निर्माण केलेल्या कचऱ्याची महापालिकेने व्यवस्थित शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी यासाठी माहीमच्या नगरसेविका शीतल देसाई यांनी पुढाकार घेतला आहे. त्यांचे कार्यकर्ते हा कचरा गोळा करून महापालिकेकडे सोपवीत आहेत. 

कोरोना रुग्ण असलेल्या रुग्णालयात किंवा विलगीकरण केंद्रात जमा होणाऱ्या कचऱ्याची नियमानुसार विल्हेवाट लावली जातेच. पण घरीच विलगीकरणात असलेल्या रुग्णांच्या कचऱ्याची विल्हेवाटीचा प्रश्न होता. 

कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली व रुग्णालये अपुरी पडू लागली तसे लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यास सुरुवात झाली. तब्येत व्यवस्थित असलेल्या या रुग्णांना महापालिकेने विलगीकरणात ठेवले खरे पण त्यांच्या कचऱ्याचे काय करावे, हा मुख्य प्रश्न होता. हा कचरा नेहमीच्याच कचऱ्यात मिसळला तर त्याच्यापासून इतरांना संसर्ग होण्याचा धोका होताच. त्यामुळे महापालिकेने हा कचरा वेगळा गोळा करून त्याची शास्त्रीय पद्धतीनेच विल्हेवाट लावावी अशी मागणी श्रीमती देसाई यांनी महापालिकेकडे फार पूर्वीच केली होती. मात्र त्यांच्या अपुऱ्या संख्येने असलेल्या कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण असल्याने श्रीमती देसाई यांनी आता हा तोडगा काढला आहे. 

विलगीकरणातील रुग्णांचा कचरा, उदा. त्यांनी वापरलेले मास्क, रुमाल वा त्यांनी वापरलेले कागदी पेले-ताटे व त्यांनी वापरलेल्या अन्य नष्ट करतायेण्याजोग्या वस्तू इ. गोष्टी जमा करण्यासाठी श्रीमती देसाई यांचे कार्यकर्ते घरोघरी जातील. विलगीकरणातील रुग्णांना हे कार्यकर्ते सकाळी काळ्या पिशव्या देतील व संध्याकाळी त्यातील कचऱ्यासह त्या पिशव्या घेऊन जातील. या पिशव्या महापालिकेला देण्यात येतील व पालिकेकडून त्यांची नियमानुसार विल्हेवाट लावली जाईल. 

अशी व्यवस्था केल्याचे श्रीमती देसाई यांनी समाजमाध्यमांवर जाहीर केल्यावर त्यांना त्यासाठी एका दिवसात सुमारे शंभर दूरध्वनी आले. अर्थात त्यातील बरेचसे दूरध्वनी दादर, वांद्रे अशा त्यांच्या कार्यक्षेत्राबाहेरील व्यक्तींनी केले होते. त्यामुळे त्यांना मदत करणे श्रीमती देसाई यांच्या कार्यकर्त्यांना शक्य नव्हते. मात्र या रुग्णांसाठी तेथील लोकप्रतिनिधींनी अशी व्यवस्था करावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या देसाई यांच्या प्रभागातील 27 रुग्णांना त्यांचे तीन कार्यकर्ते मदत करीत आहेत. रुग्णांची संख्या वाढली तर कार्यकर्त्यांची संख्याही वाढवली जाईल, असेही श्रीमती देसाई यांनी सकाळ ला सांगितले. या कामात त्यांना राऊंड टेबल इंडिया ही स्वयंसेवी संस्था मदत करीत असून श्रीमती देसाई यांनी कोरोनाकाळात आतापर्यंत गरीब कुटुंबांना शिधावाटप, अडकलेल्या व्यक्तींना जेवण, त्यांना गावी पोहोचविण्याची व्यवस्था, सील केलेल्या इमारतींना जीवनावश्यक वस्तू पुरवणे, औषधवाटप आदी कामे केली आहेत.

Edited By - Amit Golwalkar

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख