इंधन दरवाढीचा भडका; मोदी सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिलांनी पेटवली चूल - Protests against fuel price hikes; NCP women light a fire in front of the Collector's office. | Politics Marathi News - Sarkarnama

इंधन दरवाढीचा भडका; मोदी सरकारच्या निषेधार्थ राष्ट्रवादीच्या महिलांनी पेटवली चूल

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 6 फेब्रुवारी 2021

गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी. गॅस सिलिंडरची दरवाढ होत राहिल्यास महिलांना पुन्हा एकदा चूल पेटवावी लागेल. तसेच शासनाने रॉकेलही बंद केल्याने सर्वसामान्यांची अडचण झाली आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी रॉकेल उपलब्ध करावे. तसेच इंधनासह गॅसची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे.

सातारा : केंद्र सरकारने इंधनासह घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात २५ रूपयांनी वाढ केली आहे. या निषेधार्थ राष्ट्रवादी महिला आघाडीच्यावतीने आज सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल पेटवून स्वयंपाक करत मोदी सरकारचा निषेध नोंदविला. तसेच मोदींच्या व भाजप सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. 

राष्ट्रवादी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा समिंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनास मोठ्यासंख्येने महिला सहभागी
झाल्या होत्या. यावेळी महिलांनी मोदी सरकार हाय हाय.., या केंद्र सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय.., राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो..., नहीं चाहिए तुम्हारे अच्छे दिन, लौटादो हमे हमारे बुरे दिन..., मोदी सरकार हाय हाय... अशी घोषणाबाजी महिलांनी केली.

यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले की, वाढलेले इंधनाचे दर व गॅसची दरवाढीमुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष पसरला आहे. घरगुती गॅसच्या दरात मोठी वाढ झाली असून प्रतिसिंलिंडर २५ रूपयांची वाढ झाली आहे. केंद्र सरकार सर्वसामान्यांच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाही. वारंवार इंधन व गॅसची दरवाढ करून सर्वसामान्यांना वेठीस धरण्याचे काम होत आहे.

त्यामुळे गॅस दरवाढ तातडीने मागे घ्यावी. गॅस सिलिंडरची दरवाढ होत राहिल्यास महिलांना पुन्हा एकदा चूल पेटवावी लागेल. तसेच शासनाने रॉकेलही बंद केल्याने सर्वसामान्यांची अडचण झाली आहे. ग्रामीण भागातील कुटुंबांसाठी रॉकेल उपलब्ध करावे. तसेच इंधनासह गॅसची दरवाढ तातडीने मागे घ्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा यावेळी महिलांनी दिला आहे.

आंदोलनात जिल्हाध्यक्षा समिंद्रा जाधव यांच्यासह पश्चिम महाराष्ट्र निरिक्षक भारती शेवाळे, जिल्हा उपाध्यक्ष कुसुमताई भोसले, उषाताई
जाधव, उषाताई पाटील, रशिदा शेख, रूपाली भिसे, निता शिंदे, सुजाता बावडेकर, शुभांगी निकम, डॉ. सुनिता शिंदे, प्रभावती बेंद्रे, पुजा काळे, यांच्यासह महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. 
 

 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख