मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्याविरुद्ध रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडीने आक्रमक आंदोलन करत मुंबईतील आझाद मैदान येथे आंदोलन केले.
शेतकरी आंदोलनाला प्रसिद्धीस्टंट असे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले म्हणाले नसताना त्यांच्याविरुद्ध अपप्रचार केल्याचा ठपका चाकणकर यांच्यावर ठेवण्यात आलाा आहे. गेले काही दिवस चाकणकर यांच्याविरोधात हा पक्ष आंदोलन करत आहे. आज झालेल्या आंदोलनाला रिपाइं महिला आघाडीच्या महाराष्ट्र अध्यक्षा ऍड. आशाताई लांडगे, मुंबई अध्यक्षा ऍड. अभयाताई सोनवणे व इतर पदाधिकारी या वेळी उपस्थित होते.
रामदास आठवले संघर्षनायक नेते असून दलित महिलांवर अत्याचार झाल्यावर रुपाली चाकणकर लाली लिपस्टीक लावलेले तोंड घेऊन कुठे लपून बसलेल्या असतात, असा सवाल रिपाइं महिला आघाडीने विचारला आहे.
दरम्यान पुण्यात रुपाली चाकणकर यांच्या निवासस्थानी रिपाइं महिला आघाडीच्या चंद्रकांता सोनकांबळे, संगिता आठवले, संघमित्रा गायकवाड, शशिकला वाघमारे आदींच्या नेतृत्वात महिला कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन केले. गल्लीतीस कार्यकर्त्यांनी दिल्लीतील नेत्यांवर खोटे आरोप करून टीका करू नये. टीका करण्याचा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार असला तरी त्या अधिकारासोबत जबाबदारीही असते. ज्यांच्यावर टीका करायची त्यांच्या विधानाची सत्यता तपासून टीका करावी, असे मत रिपाईंच्या पश्चिम महाराष्ट्र महिला आघाडी अध्यक्षा संगीता आठवले यांनी व्यक्त केले. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याबाबत रिपाईंने कधीही टीका केली नाही. अपरिपक्व आणि प्रसिद्धीलोलुप रुपाली चाकणकरांना राष्ट्रवादीच्या शीर्ष नेतृत्वाने आवर घालावा, असे आवाहन चंद्रकांता सोनकांबळे यांनी केले.
आठवले यांनी शेतकरी आंदोलनाला प्रसिद्धीस्टंट म्हणल्याचा दावा करत र ला र आणि ट ला ट म्हणणाऱ्यांना हे आंदोलन प्रसिद्धी स्टंटच वाटणार, अशी टीका चाकणकर यांनी केली होती. अशी टीका करण्याचा आपल्याला संवैधानिक अधिकार असल्याचेही त्यांनी आरपीआयच्या आंदोलनानंतर स्पष्ट केले होते. केंद्र सरकारच्या चुकीच्या निर्णयांचे समर्थन आठवले यांनी करू नये, अशी भूमिका त्यांनी मांडली होती.

