rupali chakankar supporters depend on this tradition of NCP for mlc seat | Sarkarnama

विधान परिषदेवर जाण्यासाठी रुपाली चाकणकरांना या `परंपरे`चा आधार!

सरकारनामा ब्यूरो
मंगळवार, 2 जून 2020

विधान परिषदेवर जाण्यासाठी महाआघाडीतील इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. 

पुणे : राज्यपाल कोट्यातून विधान परिषदेवर जाण्यासाठी लवकरच नावांची घोषणा अपेक्षित असून त्यासाठी सत्ताधारी महाआघाडीतील तीनही पक्षांतील इच्छुक तयारीला लागले आहे. बारा जागांसाठी ही निवड होणार आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काॅंग्रेस अशा तीन पक्षांतीलच इच्छुकांना संधी मिळणार की घटक पक्षांनाही यात सामावून घेणार, याची उत्सुकता आहे.  

या तीन पक्षांच्या वाट्याला किती जागा येणार त्यानुसार तशी शिफारस केली जाणार आहे. राष्ट्रवादीने या आधीच शिवाजीराव गर्जे आणि आदिती नलावडे यांच्या नावाची शिफारस केली होती. ती राज्यपालांनी फेटाळली होती. आता त्यांना परत संधी मिळणार का, याची उत्सुकता आहे. दुसरीकडे इतर इच्छुकही आपापल्या परीने प्रयत्न करीत आहेत.  राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यापण या शर्य़तीत आहेत. त्यांच्या समर्थकांच्या म्हणण्यानुसार पक्षाने महिला प्रदेशाध्यक्षांना या आधी आमदार पदावर संधी दिली आहे. त्यामुळे चाकणकर यांनाही त्याच निकषानुसार संधी द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. 

राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर 1999 मध्ये पहिल्या महिला प्रदेशाध्यक्ष झालेल्या मंदा म्हात्रे यांनाही पक्षाने विधान परिषदेत प्रतिनिधीत्व करण्याची संधी दिली होती.  त्यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभेत आमदार झाल्या. म्हात्रे यांच्यानंतर म्हणजे, 2002 ते 2006 या कालावधीत प्रदेशाध्यक्षपदी उषा दराडे यांची नेमणूक करीत; पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी त्यांनाही विधान परिषदेत धाडले. दराडे यांच्या काळात राष्ट्रवादीची महिला आघाडीत विस्तारत राहिली. दराडेंचा प्रदेशाध्यक्षपदाचा कार्यकाळ संपला आणि 2006 ते 2010 पर्यंत सुरेखा ठाकरेंकडे या पदाची सूत्रे आली. तेव्हाच, ठाकरेंनाही आमदारकीची संधी मिळण्याची चर्चा होती; मात्र ठाकरेंनी शिवसेनेत प्रवेश केला.

त्यानंतर विद्या चव्हाणांकडे 2010 मध्ये प्रदेशाध्यक्षपद आले. त्यानंतरच्या काही महिन्यांत त्या आमदार झाल्या. आपल्याकडच्या आमदारकीचा चव्हाण यांनी भाजप सरकारविरोधात जोरदार वापर केला. चव्हाण यांच्यानंतर प्रदेशाध्यक्षपद चित्रा वाघ यांच्याकडे आले. पक्षाची सत्ता नसताना त्यांनी भाजप सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका बजावली. मात्र 2019 च्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळी त्या भाजपमध्ये गेल्या. वाघ यांच्यासोबत चाकणकर या पुणे शहराचे महिला राष्ट्रवादीच्या काम पाहत होत्या. त्यांची जोडी राज्यात गाजत होती. मात्र निवडणुकीच्या काही दिवस आधीच चाकणकर यांचे पद काढण्यात आले होते. मात्र ऐनवेळी वाघ या भाजपात गेल्याने त्यांची प्रदेशाध्यक्षपदी वर्णी लागली. ऐन विधानसभा निवडणुकीच्या काळात मिळालेल्या या संधीचा वापर चाकणकर यांनी योग्य पद्धतीने करून घेतला आणि विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने राज्यभर प्रचारासाठी हिंडल्या.

विधानसभा सदस्यांमधून विधान परिषदेवर सदस्य निवडून द्यायच्या  निवडणुकीत चाकणकरांना संधी मिळेल आणि त्या आमदार होतील, अशा आशयाचे पोस्टरबाजी त्यांच्या समर्थकांनी केली. परंतु, चाकणकरांची संधी हकली; मात्र या महिन्यांत रिक्त होणाऱ्या जागेवर प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळण्याचा विश्वास चाकणकर समर्थकांना आहे. त्यासाठी महिला प्रदेशाध्यक्षांना विधान परिषदेत घेण्याच्या `परंपरे`चा आधार त्यांचे समर्थक देत आहेत. त्यामुळे चाकणकरांना या वेळी तरी संधी मिळणार की नाही, हे थोड्याच दिवसांत कळेल. 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख