आमदार दिलीप मोहितेंनी जंग जंग पछाडल्यानंतर खेडच्या तहसीलदारांची अखेर बदली - tehsildar of Khed finally transferred after intense follow up by MLA dilip mohite | Politics Marathi News - Sarkarnama

आमदार दिलीप मोहितेंनी जंग जंग पछाडल्यानंतर खेडच्या तहसीलदारांची अखेर बदली

राजेंद्र सांडभोर
शनिवार, 19 डिसेंबर 2020

तहसीलदारांच्या पतीने धमकावल्याची तक्रार करण्याची वेळ आमदार मोहितेंवर आली होती...

राजगुरूनगर :  खेडच्या तहसीलदार सुचित्रा आमले पाटील यांची बहुचर्चित बदली अखेर झाली आहे. खेडचे आमदार दिलीप मोहिते व तहसीलदार आमले यांच्यातील संघर्ष हा गेले वर्षभर राजकीय  वर्तुळात चर्चेचा विषय ठरला होता. त्यांच्या जागेवर पंढरपूर येथील तहसीलदार वैशाली वाघमारे यांची बदली झाली असून,  खेडच्या तहसीलदार म्हणून त्या आता कार्यभार सांभाळतील.

 महसूल विभागाचे उपसचिव डॉ. माधव वीर यांनी आमले यांच्या बदलीचे आदेश निर्गमित केले आहेत. त्यांची आता पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात अन्नधान्य वितरण अधिकारी या पदावर बदली झाली आहे. शासनाकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनुसार, पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी शासनास ४ फेब्रुवारी २०२० रोजी आणि पुण्याच्या विभागीय आयुक्तांनी ५ फेब्रुवारी २०२० रोजी सादर केलेल्या अहवालात, आमले यांच्याबद्दलच्या तक्रारीत तथ्य असल्याने त्यांची बदली केल्याचे आदेशात म्हटले आहे.

गेल्यावर्षी विधानसभेच्या निवडणुकीत, दिलीप मोहिते हे आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर एक-दोन महिन्यातच त्यांचे आणि आणि तहसीलदार आमले यांचे बिनसले. मी तालुक्याच्या आणि लोकांच्या हिताची कामे सांगतो, ती झाली पाहिजेत, असे मोहिते यांचे म्हणणे होते. तर शासनाचे नियम सोडून मला कुठलेही काम करता येणार नाही, अशी आमले यांची भूमिका होती. मात्र खरा संघर्ष वेगळाच होता.

 

सांगितलेली कामे नियमांमध्ये बसवून करावित, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची कामे करावित, आमदार म्हणतील त्या सर्व गोष्टी करण्यात याव्यात, असा त्यांचा आग्रह होता. कार्यकर्त्यांच्या हिताच्या गोष्टी कराव्यात,असे आमदारांकडून सांगितले जाई. तर आपल्या कामाच्या आड कोणी येऊ नये आणि कामकाजात ढवळाढवळ करू नये, असा आमले यांचा पवित्रा होता. आमले यांना राजकीय वरदहस्त असल्याने, त्यांनी आमदारांचे वर्चस्व जुमानले नाही.  स्वतःच्या मतानुसार त्या काम करत राहिल्या. यातूनच दोघांमध्ये अहंकार उफाळले आणि त्यातून हा संघर्ष सुरू झाला.

या संघर्षामुळे आमदारांनी आमले यांची बदली करण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचेच सरकार असताना आमदारांच्या मागणीला मंत्रालय पातळीवर मंत्री व अधिकारी दाद देईनासे झाले. त्यामुळे आमदार चिडले आणि त्यांनी गौण खनिजामध्ये  भ्रष्टाचार करीत असल्याचे आरोप करीत, तहसीलदारांच्या बदलीची उघड मागणी सुरू केली. तरीही त्यांचे दबावतंत्र अपुरे पडल्याने ते अधिकच खवळले आणि त्यांनी स्वतःच्या पक्षाच्या आणि सरकारच्या विरोधातच उघडपणे भूमिका घेतली. मंत्री हे फक्त त्यांच्या त्यांच्या मतदारसंघ पुरते मर्यादित असल्याची टीका त्यांनी केली. खेड तालुक्याला न्याय न मिळाल्यास वेगळी भूमिका घेण्याचा इशाराही त्यांनी दिला. एवढेच काय, आमले यांच्या कथित गुंड असलेल्या पतीकडून आपल्याला अप्रत्यक्षपणे धमकावले जात असून आपल्या जीवाला धोका आहे, अशी तक्रारही त्यांनी खेड पोलिस ठाण्यात दिली.

दरम्यानच्या काळात स्वर्गीय माजी आमदार सुरेश गोरे यांनी या संघर्षामध्ये तहसीलदारांची बाजू घेतली. त्यामुळे आमदार मोहिते यांची बंडखोर भूमिका, तहसीलदारांच्या बदलीचा आग्रह आणि तरीही तहसीलदारांची बदली न होणे, हा राजकीय वर्तुळात गेले वर्षभर चर्चिला जात असलेला विषय होता. तहसीलदार आमले यांच्यामागे कोणती राजकीय ताकद आहे, याचे आडाखे आणि चर्चा राजकीय वर्तुळात होत होत्या. भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे ते खुद्द अजित पवार, यांचे त्यांना राजकीय पाठबळ असल्याच्या चर्चा होत्या. बदली होण्यापूर्वी काही दिवस आधी आमले यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. त्या भेटीचा फोटो सुळे यांनी फेसबुकवर शेअर केला होता. त्यामुळे त्यांची बदली होणार नसल्याची चर्चा होती. पण बदलीचा आदेश निघाल्याने या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख