राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचा विवाह डाॅ. प्रवीण वाघांशी - MLA Saroj Ahire tie up with Dr Pravin Wagh, NCP Politics | Politics Marathi News - Sarkarnama

राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांचा विवाह डाॅ. प्रवीण वाघांशी

सरकारनामा ब्यूरो
शनिवार, 20 फेब्रुवारी 2021

देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे आणि डॅा प्रविण वाघ यांचा उद्या विवाह आहे. आजपासून अतिशय मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत या सामरंभास सुरवात झाली.

नाशिक : देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या राष्ट्रवादी कॅांग्रेसच्या आमदार सरोज बाबुलाल अहिरे आणि डॅा. प्रवीण वाघ यांचा उद्या विवाह आहे. आजपासून अतिशय मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत या सामरंभास सुरवात झाली. मात्र अतिशय मोजक्या उपस्थितीत विवाह असल्याने त्यांच्या निकटवर्तीय कार्यकर्त्यांनाही त्याची कल्पना नव्हती. 

सरोज अहिरे या 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत देवळाली मतदारसंघातून विजयी झाल्या आहेत. त्या श्रीमती इंदुमती आणि माजी आमदार (कै) बाबुलाल सोमाजी अहिरे यांची कन्या आहेत. चोरडीया चोपडा नगर येथे दाताचे डॅाक्टर असलेल्या आणि कल्पना व रामदास हरि वाघ यांचे चिरंजीव असलेल्या डॅा. प्रवीण यांचा उद्या (रविवारी ता. 21) विवाह होत आहे. शहराबाहेरील एका लॅान्समध्ये हा विवाह समारंभ आज सुरु झाला. साखरपुडा व हळदीचा कार्यक्रम आज झाला. उद्या (ता. 21) विवाह आहे. 

विवाहाच्या पत्रिका छापण्यात आल्या आहेत. मात्र या विवाहाचे निमंत्रण अतिशय मोजक्या मंडळीनांच देण्यात आले आहे. निमंत्रण पत्रिकेत प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी कॅांग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी कॅांग्रेसचे प्रेदशाध्यक्ष जयंत पाटील, पालकमंत्री छगन भुजबळ प्रमुख अतिथी असल्याचे नमूद केले आहे. या विवाहाचे निमंत्रक म्हणून सुरेश दयाराम गोखले, संजय देविदास पवार आणि राजू जतन जाधव आहेत. दुस-या टप्प्यातील कोरोनाचे सावट तसेच अन्य शासकीय निर्देश यामुळे हा विवाह मोजक्या मंडळींच्या उपस्थितीत होत असल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले.

जिल्ह्यात अलिकडच्या काळात पहिल्यांदाच पदावर असताना आमदाराचा विवाह होत आहे. मात्र त्याबाबत निकटवर्तीयांनाही कल्पना नसल्याने त्याची फारशी चर्चा मात्र झाली नाही. ज्येष्ठ नेते शरद पवार उद्या या विवाह समारंभास उपस्थित राहणार आहेत. पुणे येथून ते येणार आहेत. विवाहाला उपस्थिती दर्शविल्यानंतर ते नियोजीत कार्यक्रमासाठी रायगडला रवाना होतील.
 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख