महिला अधिकाऱ्याची छळाची तक्रार : तुकाराम मुंढे यांना राष्ट्रीय महिला आयोगाची नोटीस

भाजप विरुद्ध तुकाराम मुंढे हा संघर्ष आता वेगळ्या वळणावर गेला आहे...
tukaram mundhe
tukaram mundhe

नागपूर : नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याविरोधात राष्ट्रीय महिला आयोगाने नोटीस बजावली आहे. ‘नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॅर्पोरेशन लिमिटेड’ (एनएसएससीडीसीएल) मध्ये कंपनी सेक्रेटरी असलेल्या महिला अधिकाऱ्याचा मानसिक छळ केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.“सात दिवसांच्या आत सविस्तर अहवाल द्या,”असे त्या नोटिशीमध्ये बजावण्यात आले आहे.

स्मार्ट सिटिचे सीईओपद मुंढे यांनी घेतल्यावरून नागपूर महापालिकेतील सत्तारूढ भाजपबरोबर त्यांचे चांगलेच बिनसले आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी थेट पंतप्रधान कार्यालय व शहरी विकास खात्याचे मंत्री हरदीप पुरी यांच्याकडे मुंढेंची तक्रार केली आहे. महापौर संदीप जोशी यांनीही मुंढेविरुद्ध पोलिसांत तक्रार केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर कंपनी सेक्रेटरी असलेल्या महिला अधिकारयाच्या तक्रारीची दखल घेऊन राष्ट्रीय महिला आयोगानेच नोटिस बजावल्याने प्रकरणाला वेगळे वळण लागले आहे.

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी ६ जुलै रोजी सायंकाळी ही नोटीस मुंडे यांना बजावली आहे. एनएसएससीडीसीएलमध्ये कंपनी सेक्रेटरी असलेल्या महिला अधिकारयाची तक्रार आलेली आहे. “मातृत्व रजा नाकारण्याबरोबरच बळजबरीने काही कागदपत्रांवर सह्या घेण्याचा आणि त्या न केल्याने मानसिक छळ करण्याची तक्रार त्यांनी केलेली आहे. हा प्रकार गंभीर आहे. तुमच्या खात्याच्या या कृतीचा राष्ट्रीय महिला आयोग निषेध करतो. या संदर्भात सविस्तर अहवाल आणि केलेल्या कारवाईचा तपशील सात दिवसांच्या आत सादर करावा,” असे मुंढे यांना बजावलेल्या नोटिशीमध्ये नमूद करण्यात आलेले आहे. सोबत त्या महिला अधिकारयाच्या तक्रारीची प्रतही जोडण्यात आलेली आहे.

तीन महिन्यांचे बाळ असल्याने कोव्हीडच्या काळात घरून काम करण्याची परवानगी मागितली असता आयुक्तांनी दिली नाही. स्तनपान माता असल्यामुळे घरी राहणे आवश्‍यक आहे'', असेही महिला अधिकाऱ्याने नमूद केले आहे. आयुक्त मानसिक त्रास देत असल्याचीही तक्रार त्यांनी केली. प्रत्येकवेळी आपल्याला लज्जास्पद वाटेल, अशा पद्दतीने अपमान करीत असल्याची तक्रार त्यात आहे.  या तक्रारीची केवळ दखलच घेतली नाही तर राष्ट्रीय महिला आयोगाने याप्रकरणी निषेधही व्यक्त केला.  दुसऱ्या एका महिला अधिकाऱ्यानेही आयुक्तांविरुद्ध अपमानजनक वागणुकीची तक्रार पोलिसांत केली आहे.

आयुक्तांच्या उत्तराबाबत उत्सुकता 
राष्ट्रीय महिला आयोगाच्या नोटीसनंतर आयुक्तांच्या अडचणींत वाढ झाली असून ते काय उत्तर देतात, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com