नवनीत राणांच्या वडिलांचेही जात प्रमाणपत्र अवैध ठरविले होते....

राणा यांची खासदार की राहणार की जाणार, हा प्रश्न
navneet rana
navneet rana

पुणे : खासदार नवनीत राणा (MP Navneet Rana) यांचे जात प्रमाणपत्र हायकोर्टाने रद्द केल्याने त्यांच्या खासदारकीविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राणा यांनी या निकालाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याचा निर्णय घेतला आहे.  तरी राणा यांचे प्रमाणपत्र न्यायालयाने का अवैध ठरवले,याबाबत निकालात भाष्य करण्यात आले आहे. (Mumbai High Court cancels caste certificate of MP Navneet Rana)

आधीच्या नवनीत कौर यांचा विवाह रवी राणा यांच्याशी २०१३ मध्ये झाला. त्यानंतर त्यांनी अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र मिळवले होते. त्याची पडताळणी करण्यात आली होती. या प्रमाणपत्राविरोधात २०१७ मध्ये शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांनी याचिका दाखल केली होती. त्यानंतर न्यायालयाने जात प्रमाणपत्र पुन्हा पडताळणीसाठी पाठवले होते. याच जात प्रमाणपत्राच्या आधारे राणा यांनी २०१९ मध्ये लोकसभा निवडणूक लढवली. त्यात त्यांनी अडसूळ यांचा पराभव केला होता. २०१९ मध्ये ज्या प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढवली, तेच प्रमाणपत्र आता रद्द झाले.

या आधी नवनीत राणा यांनी २०१४ ची लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी सादर केलेले जात वैधता प्रमाणपत्र बनावट कागदपत्रांच्या आधारे तयार केले असल्याचे सिद्ध झाल्याने ते मुंबई उच्च न्यायालयाने 4 वर्षांपूर्वी सुनावणीत रद्द  केले होते, अशी माहिती `प्राब`चे संचालक चंद्रकांत भुजबळ यांनी दिली.  याचिकाकर्त्यांनी दाखल केलेल्या पंजाबच्या रहिवासाबाबत सादर केलेले पुरावे तसेच इतर आक्षेपार्ह कागदपत्रांची योग्य चौकशी करून तीन महिन्यांच्या आत सदर प्रकरणात निर्णय घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिले होते. सदर याचिकेवर त्यावेळी न्या. बी. आर. गवई व न्या. रियाज छागला यांच्या खंडपीठापुढे सुनावणी झाली होती. न्यायमूर्तींनी सदर प्रकरणात उपरोक्त निकाल दिला होता. जी शाळा अस्तित्वातच नाही, ती शाळा सोडल्याचा दाखला कसा दिला जातो आणि या आधारावर तयार झालेले जात प्रमाणपत्र ग्राह्य धरता येणार नाही, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने आपल्या निकालात केले होते.

याबाबत पाॅलिटिकल अॅंड रिसर्च ब्युरोचे (प्राब) संचालक चंद्रकांत भुजबळ यांनी सांगितले की वडिलांच्या शाळा सोडल्याच्या ३ वेगवेगळ्या  दाखल्यांच्या आधारावर नवनीत कौर हरभजनसिंग कुंडलेस (राणा) यांनी जात प्रमाणपत्र तसेच जात वैधता प्रमाणपत्र मिळवले होते, असे पुराव्यांसह सिद्ध झाले होते. नवनीत कौर-राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध तर त्यांचे वडिलांचे अवैध ठरवण्याच्या जातपडताळणी समितीच्या निर्णयावरून संशयकल्लोळ झाल्याने या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते.

नवनीत कौर-राणा यांचे जात प्रमाणपत्र वैध असल्याचा निर्णय मुंबई उपनगर जिल्हा जातपडताळणी समितीने दिला, पण त्यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांचे जात प्रमाणपत्र रद्द करून ते जप्त करण्याचा निर्णयदेखील याच समितीने दिला होता. दरम्यान नवनीत कौर यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघात बनावट कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र मिळवून निवडणूक लढवली होती, अशी तक्रार या समितीपुढे जयंत वंजारी आणि राजू मानकर यांनी जातपडताळणी समितीकडे केली होती. त्यानंतर खासदार आनंदराव अडसूळ यांनीही अशाच प्रकारची तक्रार दिली होती. या तक्रारींवर संयुक्तपणे तीन सदस्यीय समितीने सुनावणी घेतली होती. समितीने नवनीत कौर यांचे वडील हरभजनसिंग कुंडलेस यांना मुंबई उपनगर जिल्ह्य़ाच्या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेले मोची या अनुसूचित जातीचे प्रमाणपत्र रद्द करून जप्त करण्याचा निर्णय घेतला होता तर हे दोन्ही निर्णय परस्परविरोधी असल्याने त्याविरुद्ध उच्च न्यायालयात दाद मागण्यात येईल, असे तक्रारकर्त्यांचे म्हणणे होते. त्याप्रमाणे आव्हान दिले होते, असे भुजबळ यांनी नमूद केले. 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in