योगींसमोर उभे राहण्याची हिंमत दाखवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मीरा बोरवणकरांसह आठ अधिकारी - eight ex officers from maharashtra question up cm yogi adityanath | Politics Marathi News - Sarkarnama

योगींसमोर उभे राहण्याची हिंमत दाखवणाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मीरा बोरवणकरांसह आठ अधिकारी

वृत्तसंस्था
बुधवार, 30 डिसेंबर 2020

उत्तर प्रदेशातील लव्ह जिहाद कायद्यावरुन गदारोळ सुरू आहे. या प्रकरणी माजी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथांना पत्र लिहून थेट विचारणा केली आहे. 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने नवा धर्मांतरविरोधी कायदा लागू केला आहे. या कायद्यावरुन मोठा गदारोळ सुरू आहे. आता या कायद्याच्या विरोधात १०४ माजी आयएएस,  आयपीएस आणि आयएफएस अधिकाऱ्यांनी योगी आदित्यनाथ यांना पत्र लिहिले आहे. नव्या वादग्रस्त धर्मांतरविरोधी कायद्यामुळे उत्तर प्रदेश हे द्वेषाच्या राजकारणाचे केंद्र बनले आहे, अशी टीका पत्रात करण्यात आली आहे. हे पत्र लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये महाराष्ट्रातील मीरा बोरवणकर यांच्यासह आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. 

या पत्रात म्हटले आहे की, धर्मांतरबंदीबाबतचा अध्यादेश हा बेकायदा आहे. तो तातडीने मागे घेण्यात यावा. तुम्ही घटनेनुसार राज्य चालविण्याची शपथ घेतली आहे. गंगा-यमुना सभ्यतेबद्दल एकेकाळी उत्तर प्रदेशाची ख्याती होती. आता हे राज्य द्वेषाच्या केंद्रस्थानी आले आहे. सरकारी संस्थाच यासाठी खतपाणी घालत आहेत. 

मुक्तपणे जगण्याची इच्छा असलेल्या युवकांवर संपूर्ण उत्तर प्रदेशात आपल्या प्रशासनानेच अन्याय केला आहे. एका निष्पाप दांपत्याचा चौकशीच्या नावाखाली छळ केला जातो आणि कदाचित त्यामुळे त्या महिलेचा गर्भपात होतो आणि सर्व यंत्रणा नुसती बघ्याची भूमिका घेते, हे असमर्थनीय आहे, असेही पत्रात म्हटले आहे. 

हे पत्र लिहिणाऱ्या अधिकाऱ्यांमध्ये केंद्रातील माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, माजी परराष्ट्र सचिव निरुपमा राव, पंतप्रधानांचे माजी सल्लागार टी.के.ए. नायर यांचा पत्र लिहिणाऱ्यांत समावेश आहे. याचबरोबर महाराष्ट्रातील आठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यात माजी पोलीस महासंचालिका मीरा बोरवणकर, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टचे माजी अध्यक्ष रवी बुद्धिराजा, राज्याचे माजी सचिव सुंदर बुरा, माजी अतिरिक्त मुख्य सचिव अॅना दानी, माजी मुख्य सचिव आर.एम.प्रेमकुमार,  महाराष्ट्र वीज नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. राजा, मुंबईचे माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो आणि `यशदा`चे माजी महासंचालक व्ही. रमणी यांचा समावेश आहे. 

पत्रात मोरादाबाद येथे याच महिन्यात घडलेल्या घटनेचाही उल्लेख करण्यात आला आहे. मोरादाबादमध्ये बजरंग दलाने दोन व्यक्तींना ओढत पोलीस ठाण्यात आणले होते. त्यांनी हिंदू मुलीशी लग्न केल्याचा आरोप करीत त्यांना अटक करण्यास भाग पाडले होते. उत्तर प्रदेशमध्ये अशा प्रकारच्या अनेक घटना घडू लागल्या आहेत. गेल्या आठवड्यात बिजनोरमध्ये दोन अल्पवयीनांना मारहाण करीत पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. पोलिसांनी त्यांच्यावर लव्ह जिहादचा गुन्हा दाखल केला होता. 
 

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख