महाराष्ट्र राज्याच्या कॉंग्रेस कार्यकारिणीत सोलापूर मध्य विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्रणिती शिंदे यांची कार्याध्यक्षपदी निवड झाली. एका तरुण चेहऱ्याला पक्षाने मोठी संधी दिली आहे. प्रणिती यांनी आमदारकीची हॅटट्रीक केली. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत त्यांनी विधानसभेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे. त्यांना खरं तर कॉंग्रेसने मंत्रीपदाची संधी देण्याची गरज होती. सोलापूरची ती गरजही होती आणि कार्यकर्त्यांना तशी अपेक्षाही होती. त्यातही पालकमंत्री होण्याची त्यांची क्षमता असतानाही पक्षाने त्यांच्यावर अन्यायच केला आहे. प्रचंड ताकदीचे असलेले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी ताईंसाठी पक्षाकडे कोणताही आग्रह धरला नाही, हे विशेष ! मग पक्षानेच त्यांच्या गळ्यात कार्याध्यक्षपदाची माळ घातली. सोशीक सोलापूरकरांनी त्यांना मंत्रीपद मिळाले नसले तरी जे मिळेल ते शांतपणे स्वीकारण्याची मानसिकता ठेवली.
एकेकाळी कॉंग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या सोलापूर जिल्ह्यात आता फक्त शहर मध्य मतदारसंघापुरताच पक्ष मर्यादित राहिला आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर, मंगळवेढा-पंढरपूर मतदारसंघातही प्रबळ असलेली कॉंग्रेस खिळखिळी झाली आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादीबरोबरच भारतीय जनता पक्षाचे वाढते बळ याला कारणीभूत ठरले. त्यातच राज्यातील व देशातील नेतृत्त्वाचे सोलापूरकडे झालेले दुर्लक्षही दुर्लक्ष पक्षवाढ खुंटण्यास कारणीभूत ठरले आहे. श्री. शिंदे यांच्या स्वतःच्याच जिल्ह्यात कॉंग्रेसची झालेली स्थिती फारच चिंतनीय आहे.
काॅंग्रेससाठी कसोटीचा काळ
राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्राबल्य आहे. शहरात राष्ट्रवादीचा तसा वरचष्मा नव्हता आणि आताही फारसा प्रभाव नाही. परंतु बेरजेचे राजकारण करताना राष्ट्रवादीने शहरात एमआयएमच्या नगरसेवकांना पक्षात घेण्यासाठी केलेले प्रयत्न तसेच कॉंग्रेसमधून शिवसेनेत गेलेले महापालिकेतील माजी पक्षनेते महेश कोठे हे राष्ट्रवादीच्या उंबरठ्यावर आहेत. ही सारी गणितं पाहता प्रणिती शिंदे यांच्यासमोर जिल्ह्यातच काम करताना अनेक आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. सोलापूर महापालिकेवर भारतीय जनता पक्षाने गेल्या निवडणुकीत मिळविलेले यश पाहता आगामी निवडणुकीत कॉंग्रेससमोर कसोटीचा काळ आहे. आगामी पंचायत समिती, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुकीत जिल्ह्यातील सारीपाटावरील राजकीय गणितं बदलावी लागणार आहेत. नव्या सवंगड्यांना सोबत घेऊन काही बेरजेची समीकरणं जुळवावी लागणार आहेत. श्री. शिंदे यांचे पक्षकार्य वादातीत आहे. त्यांच्या अनुभवाचा फायदा घेऊन मार्गक्रमण करावे लागेल.
मरगळ झटकावी लागेल...
प्रणिती शिंदे यांच्यावर पक्षाकडून पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी सोपविली जाण्याची शक्यता व्यक्तविली जात आहे. राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस अक्षरशः नगण्यच आहे. पक्ष-संघटना वाढीसाठी झोकून देऊन काम करताना कार्यकर्त्यातील मरगळ दूर होण्यासाठी केलेले प्रयत्न वाया जाणार नाहीत, हे निश्चित ! राज्यातील नेतृत्त्वात बदल झाल्याने संघटनेत मोठे बदल संभवतात, त्यात गटा-तटापेक्षा काम करणाऱ्या कार्यकर्त्याला संधी देऊन बळ देण्याची किमया दाखवावी लागणार आहे. नाही म्हटले तरी शिंदे साहेबांची मुलगी अन् तीन टर्म आमदार होऊन मतदारसंघात केलेल्या कामातून कार्यकर्त्यांची बांधणी करण्याचा अनुभव यातून प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वाला झळाळी मिळाली असली तरी कर्तृत्वाचा कस मात्र लागणार आहे, हे निश्चित !
पश्चिम महाराष्ट्रातील कॉंग्रेसची स्थिती
पश्चिम महाराष्ट्रात कॉंग्रेस पक्षाचा विचार केला तर कोल्हापूर वगळता कोणत्याही जिल्ह्यात कॉंग्रेस प्रबळ नाही. कोल्हापूर जिल्ह्यात दहापैकी चार आमदार कॉंग्रेसचे आहेत. पुणे जिल्ह्यात दोन, तर सोलापूर व साताऱ्यात प्रत्येकी एक, सांगलीत दोन अशी स्थिती आहे. हे सर्व आमदार स्वबळावर निवडून आले आहेत. शिक्षक मतदारसंघातून यावेळी कॉंग्रेसला यश मिळाले आहे. सतेज पाटील यांनी कोल्हापुरात प्रचंड मेहनत घेऊन कॉंग्रेसचे प्राबल्य राखले आहे. पुणे महापालिकेत 160 पैकी 9 नगरसेवक, सोलापूर महापालिकेत 102 पैकी 14 नगरसेवक कॉंग्रेसचे आहेत. गेल्यावेळी सोलापूर महापालिकेवर कॉंग्रेसची सत्ता होती.

