maheshdada-landge-shivajirao-adhalrao | Sarkarnama

शिरूरची लोकसभेची जागा मागणार : महेशदादा लांडगे 

उत्तम कुटे
मंगळवार, 19 फेब्रुवारी 2019

शिरूर लोकसभा भाजपने लढवावा, अशी मागणी करणार असल्याचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आज `सरकारनामा'ला सांगितले. 

पिंपरी: शिरूर लोकसभा भाजपने लढवावा, अशी मागणी करणार असल्याचे भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे यांनी आज `सरकारनामा'ला सांगितले. 

युती झाल्याने शिवसेनेचे शिवाजीराव आढळरावदादा पाटील यांचा प्रचार करणार का अशी विचारणा केली असता महेशदादांनी ही गुगली टाकली.

दरम्यान, शिरूरसारखीच अस्वस्थता मावळविषयी पिंपरी चिंचवड भाजपमध्ये पाहायला मिळाली. त्यातूनच हे दोन्ही लोकसभा मतदारसंघ भाजपकडे घेण्याची मागणी शहर भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. त्यासाठी ते पुण्यात गेले आहेत. भाजपचे शहराध्यक्ष व चिंचवडचे आमदार लक्ष्मणभाऊ जगताप आणि काही नगरसेवकांचा त्यात समावेश आहे. भोसरीतील भाजप नगरसेवक आणि पदाधिकारीही पुण्यात गेले आहेत. ते ही शिरूरवर दावा करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना करणार आहेत. मुख्यमंत्री शिवजयंतीचा शिवनेरीवरील सोहळा करून पुण्यात अटल बांधकाम कामगार आवास योजना आणि महाशिबीर कार्यक्रमासाठी आलेले आहेत. 

शहर भाजपच्या वरील मागणीतून युतीनंतरही पिंपरी चिंचवड भाजपमध्ये युतीविषयी व त्यातही शिवसेनेच्या उमेदवारांविषयी आलबेल नसल्याचे स्पष्ट झाले आहे. शहर भाजपमध्ये प्रचंड अस्वस्थता असल्याचे दिसून येत आहे. त्याला कारण या दोन पक्षांत टोकाला गेलेले मतभेद व मनभेदही.त्यातही जगताप आणि शिवसेनेचे मावळचे खासदार व पुन्हा उमेदवारी निश्चित असलेले श्रीरंग बारणे यांच्यातील वितुष्ट. हेच विळ्याभोपळ्याचे सख्य शिरूरमध्येही तेथील शिवसेना खासदार आणि चौथ्यांदा लोकसभेला तयारीत असलेले आढळरावदादा व महेशदादा यांच्यातही आहे. 

हे दोन्ही मतदारसंघ भाजपने लढण्याचे ठरविले, तर पक्षाकडून महेशदादा आणि लक्ष्मणभाऊ हे प्रबळ दावेदार आहेत.त्यातही शिवसेनेपेक्षा जास्त ताकद असल्याने किमान मावळवर पक्षाने क्लेम करावा, असा शहर भाजपचा आग्रह आहे. त्यातून त्यांनी नुकताच बारणे यांच्या उमेदवारीला जाहीर विरोध केलेला आहे. त्यांना उमेदवारी दिली, तर,त्यांचे काम न करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख