Mahesh Landge Yoga With Special Children | Sarkarnama

भोसरीचे आमदार लांडगेंनी योगदिनी दिव्यांगांबरोबर केली योगासने (व्हिडिओ)

उत्तम कुटे
शनिवार, 22 जून 2019

पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे हे त्यांच्या हटके 'ईव्हेंट'साठी ओळखले जातात. मग ते भोसरी व्हिजन 2020 असो की इंद्रायणी थडी जत्रा. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे निमित्त साधून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनानिमित्त मुंबईत असलेल्या महेशदादांनी मुंबईतच हटके योगा केला.

पिंपरी : पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे आमदार महेश लांडगे हे त्यांच्या हटके 'ईव्हेंट'साठी ओळखले जातात. मग ते भोसरी व्हिजन 2020 असो की इंद्रायणी थडी जत्रा. आंतरराष्ट्रीय योगदिनाचे निमित्त साधून राज्य विधीमंडळाच्या अर्थसंकल्पी अधिवेशनानिमित्त मुंबईत असलेल्या महेशदादांनी मुंबईतच हटके योगा केला. पिंपरी चिंचवडच्या  एक हजार दिव्यांगांना त्यांनी मुंबई दर्शन,तर घडविलेच; शिवाय सामाजिक कार्याची जाण असलेला हिंदी अभिनेता सुनील शेट्टी व दिव्यांगांसाठी काम करणाऱ्या मिसेस मुख्यमंत्री अमृता फडणवीस यांच्या दिव्याज संस्थेच्या मदतीने दिव्यांगांबरोबर योगदिनी योगाचा विशेष कार्यक्रम केला.

लांडगे हे भोसरीतून अपक्ष निवडून आले आहेत. नंतर, ते भाजपचे सहयोगी सदस्य होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता यांच्या निकटच्या वर्तुळात गेले. पहिल्याच इंद्रयणी जत्रेला त्यांनी मिसेस मुख्यमंत्र्यांना बोलावून बैलगाडीतून त्यांची भोसरीत मिरवणूक काढली होती. तर भोसरी व्हीजनला स्वत मुख्यमंत्रीच आले होते. त्यानंतर आगामी विधानसभा ते भाजपकडून लढणार असल्याचे जवळपास नक्की झालेल्या लांगडे यांनी काल हा हटके योगा केला.

आमदार महेशदादा लांडगे स्पोर्टस् क्लब, दिव्याज फाउंडेशन आणि इंद्रायणी थडीचे आयोजन करणाऱ्या मिसेस लांडगेंची शिवांजली महिला प्रतिष्ठान यांनी एकत्रित येत या कार्यक्रमाची आखणी केली होती. दोन दिवसीय उपक्रमात एक हजार दिव्यांगांना पहिल्या दिवशी मुंबईचे दर्शन घडविण्यात आले. तर,दुसऱ्या दिवशी काल योगदिनी विशेष सोहळा आयोजित केला. यामध्ये योगाचे सादरीकरण, मार्गदर्शन तसेच उल्लेखनीय कामगिरी करणार्या दिव्यांगांचा गौरव असा हा भव्य-दिव्य सोहळा होता. दिव्यांगांना 'मोटिवेशनल' प्रशिक्षण देण्यात आले.  या आगळ्या-वेगळ्या उपक्रमामुळे दिव्यांग भारावले होते. 

या सोहळ्याचा एक भाग मला बनता आले, याचे खूप समाधान व्यक्त करताना अभिनेता शेट्टीने भविष्यात या उपक्रमाला सहकार्य करायला मला नक्की आवडेल, असा शब्दही दिला. तर, ''महेशदादा हे नेहमीच अभिनव उपक्रम राबवितात. दिव्यांग मुलांच्या आयुष्यात आनंदाचे क्षण पेरण्याचे काम त्यांनी यानिमित्ताने केले आहे. हा सोहळा कायमच स्मरणात राहील. दिव्यांगांना आयुष्यात उभे राहण्यासाठी मदतीचा हात देणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे," असे सौ.फडणवीस म्हणाल्या. तर, पिंपरी चिंचवड शहरातील दिव्यांग मुलांना मुंबई दर्शन घडवायचे, हे खूप दिवसांपासून मनात होते, असे लांडगे म्हणाले.

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख