उरणमध्ये विकासासाठी परिवर्तन हवंय :  महेश बालदी 

Mahesh-Baldi
Mahesh-Baldi

उरण : शहरांमध्ये नागरिक रहायला येण्याआधीच दळणवळणाच्या सुविधा विकसित होणे अपेक्षित आहे. त्याकरिता मोहोपाडा, चौक या खालापूर तालुक्‍यातील परिसरात पुढील पाच वर्षांत मेट्रोचे जाळे निर्माण करण्याचा संकल्प अपक्ष उमेदवार महेश बालदी यांनी सरकारनामाला दिलेल्या विशेष मुलाखतीत केला. 

उरण शहर आणि तालुका, कर्नाळा किल्ला, जेएनपीटी बंदरातील व आंतरराष्ट्रीय विमानतळातील नोकऱ्या, चौक आणि मोहोपाडा भागातील पाण्याची समस्या आदी प्रश्‍नांवर बालदी यांनी प्रकाश टाकला.

उरण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महेश बालदी यांच्या अपक्ष उमेदवारीमुळे शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर आणि शेकापचे माजी आमदार विवेक पाटील यांच्यापुढे आव्हान उभे ठाकले राहिले आहे. परंतु, उरणमधील मतदारांना आपल्या रूपाने हवा असलेला बदल मिळेल, असा विश्‍वास बालदी यांनी व्यक्त केला.

आधी विकास नंतर शहर वसावे 
गेल्या पाच वर्षात झालेला विकास हा फार कमी आहे, म्हणून मी निवडणुकीला उभा आहे. रेल्वे आली असली, तरी ती एका टोकाला आली आहे. त्यामुळे उलवेपर्यंत रेल्वे पोहचवण्यासोबतच उरण आणि द्रोणागिरीपर्यंतचा विकास व्हायचा आहे.

आधी नोड विकसित झाल्यानंतर रेल्वे आल्या. आता फक्त रेल्वेकडून तीन किलोमीटरचे भूसंपादन होणे बाकी आहे. आता केवळ रेल्वे मंत्री अथवा मुख्यमंत्र्यांच्या धर्तीवर बैठक घेतल्यास प्रश्‍न सुटेल व रेल्वे आल्यास या भागाचा कायापालट होईल.

उरणला सर्वाधिक मासेमारीचे  बंदर करणार
ससून डॉकला मासेमारी होत असली तरी सर्वात जास्त उरण तालुक्‍यातून मच्छीमारी होते. येथे अडीच हजार ट्रॉलर्स आहेत. त्यांच्यासोबत मी आधीपासून काम करतो. कॉंग्रेसच्या काळात एका जेट्टीचे दगड आणि रेतीमुळे काम रखडलेले होते. त्याला 30 कोटींचा खर्च अपेक्षित होता.

अखेर मच्छीमारांसोबत बैठक घेऊन कामाचा अंदाज काढला असता 150 कोटी रुपये खर्च आला. मात्र, अखेर नितीन गडकरी यांनी सागरमाला योजनेतून 75 कोटी आणि राज्य सरकारकडून 75 कोटी असा निधी उभारून बंदराचे काम सुरू झाले आहे. सध्या 40 टक्के काम पूर्ण झाले आहे.

पाणीप्रश्‍न सुटणार
माझ्या मतदारसंघात 10 वर्षांपासून देवळाली गावाजवळ आणि जांभिवली गावाजवळ अशी दोन जलसंपदा विभागाने तयार केलेली धरणे तयार आहेत. फक्त जलशुद्धीकरण केंद्र आणि जलवाहिन्या टाकल्या नसल्याने गावांचा पाणीपुरवठा थांबला आहे. चावणे जलयोजनेतून 50 गावांची तहान भागली जाईल. 

 जलवाहिनीवर वळली मते
शेकापवर विश्‍वास ठेवणारी अख्खी गावेच्या गावे होती. मात्र, त्यांच्याकडून सत्तेचा दुरुपयोग झाल्याने नंतर निवडणुकीत एकानेही मत दिले नाही. आता ही गावे भाजपकडे आली आहेत. एक इंच पाण्याची पाईपलाईन दिल्याने संपूर्ण गावकऱ्यांनी मतदान केल्याची उदाहरणे आहेत.

कर्नाळा किल्ल्याचा विकास


कर्नाळा किल्ल्याचा विकास रखडला आहे. साधे एखादे हॉटेल किंवा पर्यटकांना बसण्याची व्यवस्थाही येथील अभयारण्यात केलेली नाही. त्यामुळे पर्यटकांनी पाठ फिरवली आहे. मी आता येथील विकासाकरिता साडे अकरा कोटी रुपयांचा खर्च मंजूर केला असून येथे लवकरच कायापालट होणार आहे.

दीड लाख नोकऱ्या मिळणार
मतदारसंघातील लोकांकडून पाणी व रोजगार या दोन मागण्या प्रामुख्याने आमच्याकडे केल्या जातात. एसईझेड व बंदराशी संबंधित करारात स्थानिकांना रोजगार देण्याचे बंधनकारक केले असून त्यातून सुमारे दीड लाख नोकऱ्या उपलब्ध होणार आहेत. पहिले प्राधान्य प्रकल्पग्रस्तांना दिल्यानंतर स्थानिकांना नोकऱ्या मिळणार आहेत. पोर्ट आणि एअरपोर्टच्या माध्यमातून अगदी सेवा चतुर्थ श्रेणी ते पहिल्या श्रेणीतील नोकऱ्या स्थानिकांना उपलब्ध करून देणार आहोत.

 
आणखी एक ट्रॉमासेंटर  


उरणमधील इंदिरा गांधी रुग्णालयाचा कायापालट होईल. जेएनपीटीतर्फे एक ट्रॉमा सेंटर सुरू झाले आहे. हृदयविकाराचा झटका आल्यावर रुग्णांना हवी असलेली मदत मिळावी, असे एक रुग्णालय उभारण्याचा आमचा मानस आहे. उरण मार्गाजवळ रुग्णालय उभारले जाण्याची शक्‍यता आहे.

लवकरच टाऊन हॉल सेवेत
टाऊन हॉलच्या विकासासाठी 12 कोटी रुपयांचा खर्च मंजूर झाला आहे. नगरपरिषदेच्या बॅंक खात्यावर पैसे जमा झालेले आहेत. पर्यावरण परवानगीसाठी काही वेळेची प्रतीक्षा लागली. मात्र, विविध मंजुरी प्राप्त झाल्यामुळे टाऊन हॉलचा विकास लवकरच होणार आहे.  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com