महाशिवआघाडीचा इफेक्ट सांगली महापालिकेत नाही !

Sangli-BJP.
Sangli-BJP.

सांगली  : सांगलीत महापालिकेत प्रथमच स्वबळावर सत्ता आलेल्या भाजपला येथे सध्या तरी कोणताही धोका नसल्याचे दिसत आहे. राज्यातील महा शिव आघाडीचा कोणताही परिणाम सांगली महापालिकेत होईल अशी चिन्हे नाहीत . 

भाजपचे महापालिकेत 41 नगरसेवक आहेत. पक्षांतर बंदी कायद्यानुसार स्वतंत्रपणे 28 नगरसेवकांचा गट भाजपमधून बाहेर पडला तर त्यांना पदावर राहता येऊ शकते. या गटाने कॉंग्रेस आघाडीस पाठिंबा दिला तरच महापालिकेत सत्तांतर होऊ शकते. ज्या गटांची फुटण्याची शक्‍यता आहे त्या गटांचे प्रतिनिधी पदांवर आहेत. त्यामुळे सध्या तरी फुटीचे चिन्ह दिसत नाही.  

राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. भाजप आणि शिवसेनेच्या युतीचा काडीमोड झाल्याने राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील घडामोडींनीही वेग घेतला आहे. काही महापालिकेत शिवसेनेसोबत काठावरची सत्ता असलेल्या ठिकाणी भाजपला विरोधी बाकांवर बसण्याची वेळ येण्याची शक्‍यता आहे. 

सांगली मिरज आणि कुपवाड शहर महापालिकेची निवडणूक गेल्या वर्षी झाली. यामध्ये भाजपने स्वबळावर 41 जागा जिंकून प्रथमच सत्ता पटकावली. तर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या आघाडीला 35 जागा मिळाल्या आहेत. इतर दोन नगरसेवकांनी भाजपलाच पाठिंबा दिला आहे. येथे भाजप पुर्ण बहुमतात असल्याने सध्या तरी महापालिकेतील सत्तेला धोका दिसत नाही. त्यामुळे राज्यात इतर जिल्ह्यात भाजपकडून सत्ता हिसकावण्याचा प्रयत्न होण्याची शक्‍यता असली तरी सांगलीत तशी दिसत नाही.

गेल्या वर्षी महापालिका निवडणुकीपुर्वीच भाजपने कॉंग्रेस, राष्ट्रवादीतील अनेकांना भाजपमध्ये थेट प्रवेश देऊनच कमळ चिन्हावर निवडणूक लढण्यास भाग पाडले. कॉंग्रेसमधून मिरजेतील सुरेश आवटी गट तसेच सांगलीतील दिलीप सुर्यवंशी गट आदींनी अधिकृत भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवली होती. त्यामुळे भाजपचे संख्याबळ वाढले. शिवाय सांगलीवाडीतील माजी दिनकर पाटील गट आधीच भाजपसोबत गेला आहे.

कॉंग्रेस, राष्ट्रवादीतून गेलेल्या गटांच पुर्वेतिहास पाहता ते पुन्हा स्वगृही येणारच नाहीत असे नाही. पण, भाजपने यंदा झालेल्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महापौरांसह सर्व प्रमुख पदे या गटांना दिली होती. 

आजही ही पदे त्याच गटांच्या ताब्यात आहेत. स्वत: महापौर संगीता खोत, उपमहापौर धीरज सुर्यवंशी, स्थायी समिती सभापती संदीप आवटी, गटनेते युवराज बावडेकर हे सर्व इतर पक्षातून भाजपमध्ये आलेले आहेत. यातील महापौर सौ. खोत वगळता इतरांची पदे अजून राहणार आहेत. त्यामुळे ते भाजपमधून बाहेर पडण्याची शक्‍यता वाटत नाही.

महापौर संगीता खोत यांचा सव्वा वर्षाचा कालावधी पुर्ण झाला आहे. त्यामुळे पदाचा राजीनामा द्यावा आणि नवीन महापौर नेमण्यात यावा यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. या महापौर बदलावेळीच काही चमत्कार घडला तर भाजपच्या हातून सत्ता जाऊ शकते. पण, सध्या तरी तशी स्थिती दिसत नाही ही भाजपसाठी दिलासादायक बाब आहे.
 

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com