पवार आडनावाच्या वलयाचा फायदाच पण मनावर जनतेच्या प्रेमाचा दबावही : रोहीत पवार

राष्ट्रावादी काॅंग्रेसचे पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य रोहीत पवार यांनी अल्पावधीत राजकारणात आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. सृजन महोत्सव, आरोग्य सेवेतील विविध उपक्रम, उद्योजकता विकास, पाणी चळवळ अशा अनेक बाबींवर ते काम करत आहेत. पवार कुटुंबातील नव्या कुटुंबातीलराजकीय शिलेदार असलेल्या रोहीत यांच्याकडून अनेकांच्या अपेक्षा आहेत. याबाबत सरकारनामा फेसबुकवर त्यांनी संवाद साधला. `सकाळ`चे संपादक सम्राट फडणीस यांनी त्यांची विविध मुद्यांना हात घालणारी मुलाखत घेतली.
पवार आडनावाच्या वलयाचा फायदाच पण मनावर जनतेच्या प्रेमाचा दबावही : रोहीत पवार

प्रश्न : पवार आडनावाचा तुम्हाला फायदा होतो कि तोटा ? 

उत्तर : पवार हे आडनाव असण्याचा तोटा नाही तर फायदाच होतो. तोटा एवढाच पवार हे आडनाव असल्यामुळं खूप जबाबदारीनं वागावं लागत. तेवढं या नावाला वलय आहे. पवार असण्याचं मनावर एक प्रेशर असत. पण फायदा  असा की अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यात गेलो तरी लोक प्रेम करतात. आपुलकी दाखवतात. माझ्या कुटुंबातील शरद पवार साहेब, अजित दादा, सुप्रियाताई यांच्याकडून मला खूप काही शिकायला मिळत. अशा मान्यवर लोकांकडून शिकायला मिळणं, त्यांच मार्गदर्शन मिळणं हा पवार असण्याचा एक फायदाच आहे.

प्रश्न : हे शिकण म्हणजे काय असतं?

उत्तर : मोठ्या साहेबांकडून दूरदृष्टी शिकायला मिळते.  त्यांच्याकडे विकासाचं एक व्हिजन आहे. अजितदादा यांची प्रशासनावर वचक आहे. त्यामुळे समाजाचे अनेक प्रश्न मार्गी लागतात. त्यांच्याकडून धडाडी कशी असावी हे शिकायला मिळते या धडाडीतून लोकांची कामे मार्गी लागली आहेत. सुप्रियाताई यांच्याकडून अभ्यासपूर्ण मुद्दा कसा मांडायचा,एखाद्या मुद्द्याचा अभ्यास कसा करायचा, अभ्यास करून ताई संसदेत भाषणे करतात. त्यांची भाषणे संसदेतील सदस्यांना भावतात. ताईंकडून मला  अभ्यास करण्याची प्रेरणा मिळते.

प्रश्न : दोन वर्षांपूर्वी तुम्ही राजकारणात नव्हता. आता राजकरणात आहात ,तुम्हाला तुमच्यात काही बदल झालेले जाणवतात का?

उत्तर : होय. दोन वर्षांपूर्वीचा मी वेगळा होतो. आता माझ्यात बरेच बदल झाले आहेत. हे बदल मला अनेक नव्या गोष्टी समजल्यामुळे झाले आहेत. मी पूर्वी व्यवसायात होतो. त्यावेळी माझ्याकडे जे शिस्तीचे संस्कार झाले आहेत ते राजकारणात आल्यावरही कायम राहिले आहेत. मला माझा व्यवसाय करताना असं वाटत होत की आपण समाजासाठी काहीतरी करावंय आपल्या कुटुंबाचा समाजकारणाचा वारसा आहे. त्याचा भाग बनत लोकांच्यासोबत राहावं, प्रश्न सोडवावेत. मला जिल्हा परिषदेत सदस्य म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तेथे काम करताना लोकांचा संपर्क आला. प्रश्न समजले. ते सोडवण्यासाठी माझ्या पद्धतीने मी प्रयत्न करतोय.

प्रश्न : तुम्हाला राजकारणात आल्यावर काही गोष्टींची तडजोड करावी लागली काय? 

उत्तर : माझ्यासाठी सगळंच नवीन होतं. या नव्या गोष्टी मला समजून घेता आल्या. नवं बरेच काही शिकायला मिळतंय. या शिकण्यातून मलाही नवीन समृद्ध अनुभव येत आहेत.

प्रश्न : बारामतीत जिल्हा परिषदेची निवडणूक लढवताना विरोधकांशी कसा सामना केला?

उत्तर : आमचे राज्यभरातील विरोधकही म्हणतात,"पवारांना विरोध केल्याशिवाय ते मोठं होत नाही." मुळात आम्ही विरोधकांशी सामना करताना आपण लोकांची काम केली पाहिजेत, लोकांच्या हाकेला धावून गेलं पाहिजे, ही भूमिका घेऊन काम करत आहोत. आपण सतत लोकांसोबत राहायचं. लोकाभिमुख कारभार करायचा मग लोक आपल्यासोबत राहतात. या लोकांच्या बळावर आपण यशस्वी होतो

प्रश्न :` सृजन` बद्दल सांगा

उत्तर : सृजन हा एक विचार आहे. सृजनच्या माध्यमातून तरुणांच्या अभिव्यक्तीला पुढं आणण्याचा प्रयत्न आहे. यातून खेळाबरोबरच तरुणांच्या करियरबाबतही मार्गदर्शन केले जाते. ग्रामीण भागातील मुलं-मुली शिकतात. पण त्यांना करियरबाबत मार्गदर्शन नसल्यामुळे त्याच्या क्षमतेचे चीज होत नाही म्हणून आम्ही सृजनचं व्यासपीठ उभा केले आहे. हे व्यासपीठ तरुणाईला दिशा देणार आहे. यात मी एक कार्यकर्ता आहे. माझे सहकारी हे सगळं कष्टाने घडवून आणतात. काही कालावधीतच सृजन ही एक शक्ती बनली आहे.


प्रश्न : काही कालावधीतच आपण राज्यभर संघटन उभं केलं आहे. हे संघटन नेमकं कसे उभे केलं?

उत्तर : पवार कुटुंबाची राजकारणाची पद्धत पूर्ण वेगळी आहे. आम्ही केवळ निवडणुकांपुरते कार्यकर्त्यांकडे बघत नाही. कार्यकर्ता आमचा सोबती असतो. आम्ही त्याच्याकडे सोबती म्हणून बघतो. हा विचार पवार साहेबांचा आहे. आम्ही तो विचार राबवण्याचा प्रयत्न करतोय. निवडणुका आले की कार्यकर्ते वापरायचे आणि पुन्हा त्यांच्याकडं दुर्लक्ष करायचं, असं सध्याचं चित्र आहे मात्र आम्ही कार्यकर्ता उभा करतो. त्याला ताकद देतो. तो सक्षम झाला पाहिजे, ही आमची भूमिका आहे. आम्ही तोच विश्वास आमच्यासोबत असलेल्या कार्यकर्त्यांच्या मनात पेरला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com