मी स्वतःला सिद्ध केलयं! घराणेशाहीचा आरोप टिकूच शकत नाही : कुल

दौंडचे आमदार राहुल कुल हे पुणे जिल्ह्यात अभ्यासू आमदार म्हणून ओळखले जातात. कायद्याचे पदवीधर असलेलेकुल हे कृषी. सहकार आणि आरोग्य या क्षेत्रात प्रभावीपणे काम करत आहेत. रासपचे एकमेव आमदार असूनही त्यांनी मंत्रालयातही आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटविला आहे. त्यांची ही खास मुलाखत
मी स्वतःला सिद्ध केलयं! घराणेशाहीचा आरोप टिकूच शकत नाही : कुल

`सरकारनामा फेसबुक लाइव्ह`मध्ये दिलेल्या मुलाखतीत आमदार राहुल कुल यांनी अनेक प्रश्नांना दिलखुलास उत्तर दिली. `सकाळ`चे संपादक सम्राट फडणीस यांनी घेतलेल्या मुलाखतीत कुल यांनी स्वतःच्या राजकारणातील प्रवेशापासून ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या असलेल्या विश्वासापर्यंत बोलले.

प्रश्न : तुमच्या मतदारसंघाभोवती अनेक तगड्या विरोधकांचे मतदारसंघ आहेत. पक्षांतर्गत विरोधक नसले तरी वेगवेगळ्या ठिकाणी तगडे आव्हान आहे. घराणेशाहीचा आरोप होऊ शकतो. या परिस्थितीत राजकीय वाटचाल तुम्ही कशी करता?
 
उत्तर : घराणेशाहीचा आरोप सुरवातीला माझ्यावर होत होता. मात्र आता होत नाही. मी स्वत: काम उभे केले आहे. स्वत:ला सिद्ध केले आहे. त्यामुळे घराणेशाहीचा आरोप आता माझ्यावर होत नाही. अंतर्गत संघर्ष होतच राहतो. त्याकडे मी लक्ष देत नाही. सकाळपासून कामाला सुरवात करतो. नियोजनपूर्वक फोकस ठेऊन मी काम करतो. लोकांमध्ये सहभागी होणे. त्यांच्या अडचणी समजून घेऊन त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे. मतदासंघातील पाच वर्षाचेच नव्हे तर पुढच्या 25 वर्षातील कामांचे नियोजन करणे यावर मी लक्ष केंद्रीत करतो. त्यामुळे कोण काय म्हणतो याचा विचारही करता नाही. चिंताही करीत नाही. आपण आपले काम करीत राहावे, अशी माझी भूमिका आहे. 

प्रश्न : मुख्यमंत्र्यांच्या जवळचा आमदार ही तुमची ओळख आहे.ती कशी काय झाली?

उत्तर : मुख्यमंत्र्यासोबत माझी आधीची ओळख आहेत. मात्र गेल्या चार वर्षात अधिक संबंध आला. तेही कायद्याचे पदवीधर आहेत. मीदेखील कायद्याचा पदवीधर आहे. त्यांची कामाची पद्धत समजून घेतली. त्या अनुरूप कामे घेऊन गेलो. मी शक्‍यतो वैयक्तिक कामे घेऊन फार कमी वेळा जातो. गेलो तरी फारसा आग्रह धरत नाही. सार्वजनिक हिताचे विषय त्यांच्याकडे घेऊन जातो. त्यासाठी आग्रह धरतो. तेदेखील त्याची सोडवणूक चांगल्या पद्धतीने करतात. कदाचित त्यांच्या आणि माझ्या कामाची पद्धत एकच असल्याने आमचे संबध चांगले झाले. 

प्रश्न : सत्तेतला घटककक्ष म्हणून, एक आमदार म्हणून जनतेचा प्रतिनिधी म्हणून या सरकारबद्दल आपले काय मत आहे?

उत्तर : खरं तर चार वर्षाचा कालावधी फार मोठा नाही. मात्र या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मोठी कर्जमाफी या काळात दिली आहे. राज्य सरकारने दिलेली ही पहिली कर्जमाफी आहे. यापूर्वीच्या कर्जमाफी केंद्र सरकारने दिली आहे. दोन दुष्काळ पडले. या सर्व पार्श्वभूमीवर त्यांची चांगले काम करण्याचा प्रयत्न केला आहे. पाणंद रस्ते, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्‍न त्यांनी मार्गी लावले आहेत. रस्त्यांची कामे मोठ्या प्रमाणात हाती घेतले आहे. कायदा व सुव्यवस्था चांगल्या प्रकारे राखली आहे. लोकप्रतिनिधी म्हणून ग्रामीण भागातील ज्या अडचणी आम्ही त्यांच्यासमोर मांडल्या त्यांनी तातडीने त्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे. शेवटी लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही काय मागतो हे महत्वाचे आहे. त्यांनी केलेल्या कामाबाबत मी व्यक्तीश: समाधानी आहे. त्यांनी गेल्या चार वर्षात केलेल्या कामाबद्दल मी माझ्या मतदारसंघाच्यावतीने त्यांचे विशेष अभिनंदन करतो. 

प्रश्न : मतदासरंघांच्या बाहेर महाराष्ट्राकडे आपण कोणत्या दृष्टीने बघता?

उत्तर : माझा मतदारसंघ हा पुणे जिल्ह्यातील एक प्रगत मतदासरसंघ आहे. मतदारसंघात उद्योग क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहेत. माझ्या मतदासरंघातील कामाच्या व्यापामुळे राज्यातील इतर मतदारसंघात मी फारसे लक्ष घालत नाही. मतदारसंघातच मला अधिक वेळ द्याला लागतो. या मतदारसंघात 80 टक्के भाग बागाईत आहे. उद्योगही मोठ्याप्रमाणात आहे. "पीएमआरडीए'चा अर्धा भाग माझ्या मतदारसंघात येतो. मतदारसंघातच संघर्ष असल्याने राज्याबाबत फार विचार केलेला नाही. मात्र राज्याचा नागरीक म्हणून पुणे शहर-ग्रामीण असा भेद न करता पाण्याचा वापर काटकसरीने करणे हे यापुढील काळातील मोठे आव्हान आहे. 

प्रश्न : राज्याच्या विकासाबाबत आपले व्हीजन काय आहे ? 
उत्तर : राज्य उद्योगाच्या बाबतीत अग्रेसर आहे. उद्योगाच्या बाबतीत आणखी नियोजन करण्याची गरज आहे. उद्योग वाढवताना प्रदूषणाची काळजी घ्यायला हवी. उद्योग वाढवताना पाण्याचा काटकसीने वापर व वापरलेल्या पाण्याचा पुनर्वापर करणे ही गरज आहे. उद्योगासाठी पायाभूत सुविधा उभी करताना त्या भागाचा विचार करण्याची गरज आहे. जेणेकरून त्या भागालाही त्याचा त्रास होणार नाही. पर्यटनाच्या क्षेत्रात मोठे काम करण्याची व त्या माध्यमातून रोजगार निर्माण करण्याची संधी आहे. राज्याचे पर्यटन मंत्री जयप्रकाश रावळ यासाठी काम करीत आहेत. नदी व समुद्रातून वाहतुकीसाठी नितीन गडकरीसाहेब काम करीत आहेत. त्या माध्यमातूनही राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागेल. शेती व शेतीपूरक प्रक्रिया उद्योग हा महाराष्ट्राच्या विकासासाठी महत्वाचा घटक मानून काम करण्याची गरज आहे. मुळात राज्यात पाण्याची कमी आहे, असे मला वाटत नाही. मात्र असलेल्या पाण्याचा योग्य वापर व पूर्नवापर होण्याची गरज आहे. याकडे सर्वाधिक लक्ष देण्याची गरज आहे. 

प्रश्न : राज्यातील तरूणांना काय संदेश द्याल?
उत्तर : समाजकारण करण्यासाठी आधी स्वत:ला सिद्ध करा. त्यासाठी स्वत:चे अर्थकारण महत्वाचे असून अर्थिकदृष्टया सक्षम होण्याची गरज आहे. स्वत:ला सक्षम बनवल्यानंतर समाजकारण व राजकारण अधिक चांगल्याप्रकारे करता येते. अन्यथा संसाराची परवड होते हे ध्यानात घ्यायला हवे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com