'स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही'

भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे, असं विक्रम गोखले यांनी म्हटलं आहे.
'स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा तुम्हाला अधिकार नाही'

मुंबई : 1947 साली देशाला मिळालेले स्वातंत्र भिक म्हणून मिळालं होतं, 2014 साली देश खऱ्या अर्थाने स्वतंत्र झाला," असे वादग्रस्त वक्तव्य अभिनेत्री कंगना राणावतने (Kangana Ranout) केलं होतं. त्यानंतर ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले (Vikram Gokhale) यांनीदेखील तिच्या वक्तव्याचं समर्थन केलं. त्यामुळे राज्यभरातून त्यांचा निषेध केला जात आहे. राज्याच्या महिला आणि बालविकास मंंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी विक्रम गोखलेंना सुनावलं आहे.

''विक्रम जी, आपल्या वयाचा आदर आहे, मात्र स्वातंत्र्य सैनिकांचा अपमान करण्याचा अधिकार आपल्याला नाही. आपली भक्ती एखाद्या नेत्यावर-पक्षावर असू शकते, पण हा देश, स्वातंत्र्य संग्राम, स्वातंत्र्य सैनिकांचं बलिदान त्यापेक्षा कैकपटीनं मोठं आहे. आपल्या वक्तव्याचा निषेध करावा तितका कमीच आहे.'' असे म्हणत यशोमती ठाकूरांनी विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे.

यशोमती ठाकूर यांच्यासह शिवसेनेच्या चित्रपट सेनेनेही विक्रम गोखले यांच्या वक्तव्याचा निषेध केला आहे. कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन, स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी, अशी मागणी चित्रपट सेनेच्या वतीने करण्यात आली आहे. '“शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि विक्रम गोखले यांचे कोणतेही नातेसंबंध नाहीत. गोखलेंनी ठाकरेंशी कोणताही संबंध जोडू नये. त्यांनी कंगनाच्या वक्तव्याचे समर्थन मागे घेऊन स्वातंत्र्यवीरांची माफी मागावी,” अशी मागणी शिवसेना चित्रपट सेनेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या चिटणीस कीर्ती पाठक यांनी केली आहे.

- काय म्हणाले विक्रम गोखले?

विक्रम गोखले काल (14 नोव्हेंबर) पुण्यात एका कार्यक्रमात बोलताना कंगनाच्या वादग्रस्त वक्तव्यावर आपली भूमिका मांडली. “भीक मागून स्वातंत्र्य मिळालं असं कंगना म्हणालीय. तिच्या या म्हणण्याशी मी सहमत आहे. स्वातंत्र्य भिकेत मिळालं आहे. योद्ध्यांनी स्वातंत्र्य मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळचे मोठमोठे लोक त्या योद्ध्यांना फाशी जाताना बघत राहिले. पण त्यांनी या लढ्यातील योद्ध्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. आपल्या देशातील हे लोक ब्रिटिशांविरोधात उभं राहत आहेत हे माहीत असूनही त्यांना वाचवलं नाही. असेही लोक त्याकाळी आपल्या राजकारणात होते. भरपूर वाचलं आहे मी,”असे विक्रम गोखले म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com