महसूलमंत्र्यांच्या दोन स्वीय सचिवांनाच गंडविण्याचा प्रयत्न

`आयएएस`मध्ये बढती झाल्याचा बनावट आदेश व्हायरल झाल्याने पोलिसांत तक्रार
Balasaheb Thorat
Balasaheb Thorat Sarkarnama

मुंबई : महाराष्ट्रातील प्रशासनाला गेले काही दिवस `स्पेशल २६` या चित्रपटाची आठवण येत आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्याचा बनावट आदेश व्हायरल झाला. त्याची सायबर पोलिस चौकशी करत आहेत. दुसरीकडे महसूल मंत्र्यांच्या दोन स्वीय सचिवांनाच गंडविण्याचा प्रयत्न झाला. राज्यातील अपर जिल्हाधिकारी संवर्गातील ५ अधिकार्‍यांना भारतीय प्रशासकीय सेवेत (आयएएस) समायोजित करुन पदोन्नती कोट्यातील रिक्त पदांवर पदोन्नती व पदस्थापना देण्याचा चक्क बनावट शासन आदेश काढण्यात आला आहे. त्यात या दोन सचिवांची नावे होती. शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांच्या नावाने हा बनावट आदेश काढण्यात आला. आहे.

याप्रकरणी राज्य सरकारचे अवर सचिव अ. ज. शेट्ये यांनी मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात (Marine Drive Police Station Mumbai) फिर्याद दिली आहे. महसूलमंत्र्यांचे खासगी सचिव (महसूल) असलेल्या रामदास खेडकर यांना प्रधान खासजी सचिव (महसूल) पदी पदोन्नती दिल्याचे या आदेशात म्हटले होते. तसेच दुसरे सचिव धनंजय निकम यांनाही आयएएसमध्ये बढती मिळाल्याचे त्यात म्हटले होते.

Balasaheb Thorat
अजितदादा बोट दाखवतील तो जिल्हा बँकेचा अध्यक्ष; ५ नाव चर्चेत

भारतीय प्रशासकीय सेवेत पदोन्नतीने नियुक्त देण्याचा आदेश सामान्य प्रशासन विभागाकडून काढला जातो. परंतु बनावट आदेश हा महसूल व वनविभागाने ६ जानेवारीला काढल्याचे दर्शवण्यात आले आहे. त्यामुळे या आदेशाबाबत संशय निर्माण झाला. खुद्द खेडकर यांनाच हा आदेश व्हाॅटस अप मिळाला आणि त्यांना `अभिनंदन`ही मित्रांच्या वर्तुळातून स्वीकारावे लागले. त्या आदेशातील फोलपणा लक्षात आल्यानंतर त्यांनीच ही बाब महसूल विभागातील वरिष्ठांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली. या बनावट आदेशात शासनाचे सहसचिव डॉ. माधव वीर यांची बनावट सही होती.

Balasaheb Thorat
संजय राऊत बड्या नेत्याच्या भेटीला; UP निवडणुकीत शिवसेना करणार जिवाचं रान

या बनावट आदेशानुसार महसूलमंत्र्यांचे खासगी सचिव (महसूल) रामदास खेडकर यांना प्रधान खासगी सचिव (महसूल), गडचिरोलीचे अपर जिल्हाधिकारी उन्मेश महाजन यांची गोंदियाच्या जिल्हाधिकारीपदी, ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संकेत चव्हाण यांची ठाणे अतिरिक्त आयुक्त (अ श्रेणी) पदी, अमरावतीच्या अपर जिल्हाधिकारी मनीषा वाजे यांची अमरावती महानगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त (अ श्रेणी) पदी, तर भंडाराचे अपर जिल्हाधिकारी धनंजय निकम यांची भंडारा जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले होते. प्रत्यक्षात वाजे आणि संकेत चव्हाण ही नावे तर उपजिल्हाधिकारी किंवा अतिरिक्त जिल्हाधिकारी संवर्गात नाहीत. तरीही ती या आदेशात दाखविण्यात आली. हा बनावट आदेश कोणी केला आणि त्याचा उद्देश काय होता, याचा शोध आता पोलिस घेत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in