
Atish Umre protested in ZP General Body Meeting : नागपूर जिल्हा परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांमधील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. सभापतींच्या शासकीय निवासस्थानांतील फर्निचर गायब झाल्याचा मुद्दा अजूनही तापत आहे. त्यातच काल झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांना मिळणाऱ्या निधीवरून गदारोळ झाला.
१७ सामूहिक विकास अंतर्गत सदस्यांना विकास कामे करण्यासाठी हक्काचा निधी मिळतो. वित्त समितीत प्रत्येक सदस्यांना २० लाख देण्याचा ठराव करण्यात आला होता. परंतु प्रत्यक्षात १० लाख ५० हजार रुपयांचीच तरतूद करण्यात आली. यावर विरोधी पक्ष नेते आतिश उमरे यांनी विरोध दर्शवला. नाना कंभाले यांनीही या मुद्यावर विरोधकांना साथ दिली. सत्ताधाऱ्यांकडून निधीचे समर्थन करण्यात आले. त्यामुळे यावरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये चांगलीच खडाजंगी उडाली.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत अर्थसंकल्प सादर करण्यात आला. त्यात बांधकाम विभागाला मिळालेल्या निधीवरून सदस्य नाना कंभाले यांनी नाराजी व्यक्त केली. इमारतींच्या डागडुजी व दुरुस्तीसाठी दरवर्षी मोठी तरतूद करण्यात येते. गत पाच वर्षात केलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली.
वित्त समितीच्या बैठकीत प्रती सदस्य २० लाख देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परंतु तो बदलवल्याने संतप्त भावना त्यांनी व्यक्त केल्या. त्यावर सदस्य प्रकाश खापरे यांनी प्रकरण सावरण्याचा प्रयत्न केला असता दोघांमध्येही शाब्दिक चकमक झाली. सर्व सोंग करता येतात, परंतु, पैशाचे सोंग करता येत नाही. शासनाकडून (Government) मुद्रांक शुल्क व इतर प्रलंबित निधी मिळाल्यानंतर सदस्यांच्या निधीत वाढ देता येईल, असे खापरे म्हणाले.
त्यावर विरोधकांनी चांगलाच गदारोळ घातला. सदस्य संजय झाडे व नाना कंभाले यांनी बांधकाम विभागाच्या निधीत १५ टक्के कपात करण्याच्या सूचना केल्या. त्यावर उपाध्यक्षा कुंदा राऊत यांनी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण माहिती सादर करण्याच्या सूचना केल्या. त्यानंतरही विरोधकांचे समाधान झाले नाही.
विरोधी पक्षातील सदस्य शांत..
विरोधी पक्षाकडून आतिश उमरे यांनी एकट्यानेच खिंड लढविली. त्यांना संजय झाडे व काँग्रेसचे (Congress) बंडखोर नेते नाना कंभाले यांनी साथ दिले. व्यंकट कारेमोरे, सुभाष गुजरकर व राधा अग्रवाल यांनी एका प्रकरणात त्यांची साथ दिली. इतर सदस्य मात्र शांत बसले होते.
खापरे, ढाले, बर्वे यांनी घेतली बाजू..
विरोधकांचे हल्ले परतून लावण्यासाठी मोजकेच सदस्य होते. यात प्रकाश खापरे, दिनेश ढोले, रश्मी बर्वे आघाडीवर होत्या. राष्ट्रवादीकडून (NCP) दिनेश बंग, सलील देशमुख यांनी साथ दिली.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.