नागपुरात राहूनही तुम्हाला सुबुद्धी आली नाही, म्हणून तुमचं मुख्यमंत्रिपद गेलं…

काल रात्री नागपूरला (Nagpur) येताच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. हल्ली बरेच नागपूरकर मुंबईला असतात. म्हणून आम्ही आमचा मुक्काम नागपूरला हलवला आहे, असे ते म्हणाले.
नागपुरात राहूनही तुम्हाला सुबुद्धी आली नाही, म्हणून तुमचं मुख्यमंत्रिपद गेलं…
Sanjay RautSarkarnama

नागपूर : नागपूर आमची उपराजधानी आहे, त्यामुळे नागपूरला महत्व आहेच. हल्ली बरेच नागपूरकर मुंबईला असतात. म्हणून आम्ही आमचा मुक्काम नागपूरला हलवला आहे, असे सांगत शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.

काल रात्री नागपूरला (Nagpur) येताच संजय राऊत (Sanjay Raut) यांनी विमानतळावर पत्रकारांशी संवाद साधला. देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले की, नागपूरकरांचे प्रेम आमच्यावर वाढत आहे. नागपूरची माती आणि इथल्या वातावरणात वेगळेपण आहे. येथे येऊन त्यांना सुबुद्धी मिळेल, असे फडणवीस काल सकाळी बोलले होते. त्याचा संजय राऊत यांनी खरपूस समाचार घेतला. त्यांना सुबुद्धीचे अजीर्ण झाले आहे. थोडी सुबुद्धी महाराष्ट्रातील त्यांच्या लोकांना मिळाली तर महाराष्ट्र शांत राहील. आम्ही या गोष्टी त्यांनी त्यांना सांगू, असे ते म्हणाले.

दिल्लीची दंगल कोणी घडवली, कोणी भडकवली? संपूर्ण देशात काय होत आहे, हे सर्व जगाला माहीत आहे. वातावरण बिघडवण्याचे काम देशात सुरू आहे. मात्र, हे देशाचे ऐक्यासाठी योग्य नाही, असे ते दिल्ली दंगलीबाबत म्हणाले. आम्ही सरकारच्या विरोधात बोलल्यावर आमच्या घरावरही ईडीच्या धाडी पडल्या. अशाप्रकारे राज्य चालत नाही. समोरून लढायला पाहिजे, असे आव्हान राऊत यांनी केंद्र सरकारला दिले.

शतकातील सर्वात मोठा विनोद..

महाराष्ट्रात हिंदूंना टारगेट केले जात आहे, या फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेताना ते म्हणाले, या महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आहे. जे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र आहेत. ज्या शिवसेनेने हिंदुत्वासाठी सर्वोच्च बलिदान केले आहे, त्या शिवसेनेचे पक्षप्रमुखही आहेत. त्या शिवसेनेच्या राज्यामध्ये हिंदूंना टार्गेट केले जात आहे, असं कोणी म्हणत असेल, तर तो या शतकातील सर्वात मोठा विनोद आहे.

आता महापालिकेत शिवसेनेचे वाघ येतील..

खासदार संजय राऊत विमानतळावरून थेट बेसा येथे आयोजित शिवसैनिकांच्या मेळाव्याला गेले. शिवसेनेसोबत असेपर्यंत त्यांचं सर्वकाही सुरळीत सुरू होतं. पण आम्ही त्यांना सोडल्याबरोबर त्यांची उलटगिनती सुरू झाली. वीट यावा अशा काही गोष्टी नागपुरातून घडतात. पण आजही नागपुरात ‘कोण आला रे कोण आला’ ही गर्जना घुमते. आता नागपूर महापालिकेत शिवसेनेचे वाघ येणार आहेत. कारण नागपुरातील लोकांचं लक्ष मुंबई महापालिकेवर आहे. नागपूर महापालिकेत भ्रष्टाचार फोफावत आहे. स्टेशनरी घोटाळा हे त्याचेच उदाहरण आहे, असे राऊत म्हणाले.

Sanjay Raut
संजय राऊत 'त्या' विधानावर ठाम; न्यायालयाच्या भूमिकेकडे लक्ष

२५ वाघ नरडा दाबतील..

वाघ फक्त शिवसेनेचा असतो भाजपचा नाही. नागपूर महापालिकेत फक्त २५ वाघ पाठवा तेच यांचा नरडा दाबतील. ते दंगली घडवितात आणि कसे पळून जातात, हे आम्ही बघितलं आहे. अयोध्येत मस्जिद पाडण्यात शिवसेनेचे वाघ होते हे बाळासाहेबांनी सांगितलं. सध्या भोंगे राजकारण चालू आहे. स्वतःची माणसं नाहीत म्हणून ते भाड्याचे लोक घेतात. आता भोंगे लावणार आणि महागाईवर ते बोलणार आहेत का, असा सवाल राऊत यांनी केला.

रणरागीनी उतरणार मैदानात..

महिला आघाडी ला रणरागिणी म्हणतात. त्या आता नागपूर महापालिकेच्या भ्रष्टाचाराविरोधात उतरणार आहेत. मग त्यांना कळेल शिवसेना काय आहे. जे स्वतःला नागपूरकर म्हणवतात, ते आता मुंबईकर झाले आहेत. त्यांच्या प्रॉपर्टी मुंबईत आहेत आणि नागपूरला त्यांनी वाऱ्यावर सोडलं आहे. आता यांच्यावर इडी लागायला पाहिजे. महापालिकेच्या घोटाळ्यात अनेक जण जेलमध्ये जातील. शिवसेना बेडर संगठन आहे. कोणाच्या बापाला घाबरत नाही आणि कोणाच्या पाठीमागून वार करत नाही.

नागपूर महापालिकेवर भगवा फडकेल, तेव्हा बाळासाहेब वरून पुष्पवृष्टी करतील, असे खासदार राऊत म्हणाले. नागपुरात अनडेव्हलप लेआऊटमध्ये फसवणूक झाली. त्यावर आपण तोडगा काढू. मी मुख्यमंत्र्यांबरोबर याबाबत बैठक घेणार आहे. इथल्या थापा खूप झाल्या आता फसवणूक होऊ देणार नाही. शिवसेनेला संपविण्याची ताकद कोणातही नाही. तो अजून जन्माला यायचा आहे. नागपुरातले कितीही मोठे नेते येऊ द्या. त्यांना आता पुढील २५ वर्ष विरोधी पक्षातच राहायचं आहे. आत्तापासून महापालिकेची तयारी सुरू करा. घराघरांत पोहोचा आणि सांगा की, यापुढचा नागपूरचा महापौर शिवसेनेचाच असेल, असे आवाहन संजय राऊत यांनी शिवसैनिकांना केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in