Akola : पाच पंचायत समितींवर महिला राज; इच्छुकांची फिल्डींग सुरू...

या आरक्षण सोडतीमुळे काही नवीन राजकीय (Political) समीकरणे तयार होतात का, याकडे अकोला (Akola) जिल्ह्याचे लक्ष लागले आहे
Panchayat Samiti Election Akola
Panchayat Samiti Election AkolaSarkarnama

अकोला ः जिल्हा परिषदेअंतर्गत येणाऱ्या सात पंचायत समितींच्या सभापती पदाची आरक्षण सोडत आज जिल्हाधिकारी कार्यालयातील (Collector Office) नियोजन भवनात काढण्यात आली. यावेळी पाच पंचायत समितींच्या सभापती पदासाठी महिला आरक्षण निघाल्याने तेल्हारा, अकोला, पातूर, बार्शीटाकळी व अकोट पंचायत समितीवर महिला राज राहणार आहे.

पंचायत समितींमध्ये सत्ता स्थापनेसाठी सर्वच प्रमुख पक्षांच्या नेत्यांनी ‘फिल्डींग’ लावण्यास सुरूवात केली आहे. या आरक्षण सोडतीमुळे काही नवीन राजकीय (Political) समीकरणे तयार होतात का, याकडे अकोला (Akola) जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषदेअंतर्गत (ZP) येणाऱ्या सात पंचायत समितीच्या सभापदी व उपसभापतींचा अडीच वर्षाचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे सभापती पदासाठी आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी सर्वात आधी पंचायत समिती सभापतीपदी ज्या प्रवर्गाचे आरक्षण होते ते वगळण्यात आले.

अकोट व पातूर पंचायत समिती वगळता इतर पंचायत समितींचे आरक्षण निश्चित झाले. त्यानंतर अकोट व पातूर तालुक्यात नामाप्र प्रवर्गाचे आरक्षण निश्‍चित करण्यासाठी सोडत काढण्यात आली. सोडतीत पातूर पंचायत समितीचे सभापती पद नामाप्र महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले, तर अकोट पंचायत समितीमधील सभापतीचे पद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सदाशिव शेलार, ग्रामपंचायत निवडणूक विभागाचे प्रमोद शिरसाट यांच्यासह सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

असे आहे सभापतींचे आरक्षण..

पंचायत समिती आरक्षण

मूर्तिजापूर अनुसूचित जाती

तेल्हारा अनुसूचित जाती (महिला)

अकोला अनुसूचित जमाती (महिला)

पातूर नामाप्र (महिला)

बाळापूर सर्वसाधारण

बार्शीटाकळी सर्वसाधारण (महिला)

अकोट सर्वसाधारण (महिला)

भाजपच्या सुलभा सोळंके यांना लॉटरी..

Panchayat Samiti Election Akola
अकोला जिल्ह्यातून मंत्रिपदाची लॉटरी कुणाला? सावरकर, बच्चू कडू यांना संधी मिळणार?

अकोला पंचायत समितीचे सभापती पद अनुसूचित जमाती (महिला) प्रवर्गासाठी राखीव झाले आहे. पंचायत समितीमध्ये भाजपकडून निवडून आलेल्या सुलभा सोळंके या एकमात्र अनुसूचित जमातीच्या महिला सदस्या आहेत. त्यामुळे त्यांना आरक्षणामुळे सभापतीपदाची लॉटरी लागली. अकोला पंचायतमध्ये वंचितकडे स्पष्ट बहुमत असल्यानंतरही केवळ अनुसूचित जमाती महिला प्रवर्गातून उमेदवार निवडून न आल्याने वंचितला सभापती पदापासून दूर रहावे लागणार आहे. दुसरीकडे उपसभापती पदासाठी वंचितकडे स्पष्ट बहुमत असल्याने वंचितला फारसे प्रयत्न करावे लागणार नाहीत, असे राजकीय जाणकारांचे मत आहे. अकोला पंचायत समितीमध्ये सर्वाधित ११ सदस्य वंचितचे असून शिवसेनेचे पाच, भाजपचे तीन तर कॉंग्रेसचा एक सदस्य आहे.

सभापती पदासाठी रविवारी निवडणूक..

जिल्ह्यातील अकोला, अकोट, बाळापूर, बार्शीटाकळी, पातूर, तेल्हारा व मूर्तिजापूर या सातही पंचायत समितींच्या सभापती व उपसभापतींची पुढील अडीच वर्षांच्या कालावधीसाठी निवड करण्यासाठी १६ ऑक्टोबर रोजी निवडणूक घेण्यात येणार आहे. त्यासाठी पंचायत समितींमध्ये विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. पीठासीन अधिकाऱ्यांची नेमणूकही करण्यात आली आहे. सभापती व उपसभापती पदांच्या निवडणुकीमुळे दिवळीपूर्वीच पंचायत समितींमध्ये फटाके फुटणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in