बाळासाहेब थोरातांच्या आशीर्वादाने होतेय वाळू तस्करी, नाना पटोलेंचाही सहभाग !

आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही कारण राजाच चोर आहे, तर चौकीदार काय करणार, असा सवाल आमदार परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी उपस्थित केला.
Parinay Fuke, Balasaheb Thorat and Nana patole
Parinay Fuke, Balasaheb Thorat and Nana patoleSarkarnama

नागपूर : भंडाऱ्याच्या एसडीओंवर वाळू माफियांनी केलेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे वाळू तस्करी पुन्हा चर्चेत आली. स्वतः महसूलमंत्री सहभागी असल्याशिवाय हजारो कोटी रुपयांची तस्करी होऊ शकत नाही आणि यामध्ये कॉंग्रेसचे जिल्ह्यातील वजनदार नेतेही सहभागी आहेत, असा घणाघाती आरोप भंडारा-गोंदियाचे आमदार डॉ. परिणय फुके (MLC Dr. Parinay Fuke) यांनी केला.

वाळू चोरीचे सर्व पुरावे देऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटला, पण संबंधित यंत्रणेकडून अद्याप बोलावणे आले नाही की साधा संपर्क साधण्यात आला नाही. मी दिलेल्या रेकॉर्डिंग त्या लोकांनी बघितल्या की नाही, याबद्दलही शंकाच आहे. वाळू चोरी ही पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, नागपूरसह संपुर्ण महाराष्ट्रात होते आहे. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) स्वतः यात सहभागी असल्याशिवाय ही तस्करी होणे शक्य नाही आणि यामध्ये जिल्ह्यातले कॉंग्रेस पक्षाचे वजनदार नेते सहभागी असल्याचे नाना पटोले (Nana Patole) यांचे नाव न घेता आमदार फुके यांनी सांगितले. भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाहेरचे आहेत, त्यामुळे त्यांच्या या वाळू तस्करीत (Sand Mafiya) सहभाग असण्याची शक्यता कमीच आहे. पण कॉंग्रेसचे स्थानिक नेते यात गुंतले आहेत, हे मात्र नक्की, असेही ते म्हणाले.

वाळू घाट बंद, तर बांधकामे सुरू का?

पवनी घाटावरून काढलेली सर्व वाळू नागपुरात जाते आणि प्रशासनाच्या सांगण्याप्रमाणे घाट जर बंद आहेत, तर मग वाळूअभावी बांधकामेही ठप्प व्हायला पाहिजेत. पण तसे दिसत नाही. वाळू नसल्याने बांधकाम थांबल्याचे एकही उदाहरण आपल्यासमोर आलेले नाही. याचा अर्थ घाटांवरून वाळुची तस्करी सुरू आहे. उमरेड मार्गे नागपुरात रेतीचे ट्रक, टिप्पर दाखल होतात आणि चेकपोस्टवर प्रति ट्रक प्रति फेरी पैसे घेतले जातात, असाही आरोप आमदार डॉ. फुके यांनी केला आहे.

'ते' म्हणतात, दोन-चार ट्रक होत असतील..

मोहाडीवरून येणारी वाळू मोहदा मार्गे नागपुरात येते. टोल नाक्यांवर जरी तपासणी केली, तरी ही तस्करी उघडकीस येऊ शकते. पण प्रशासनाला तसे करायचेच नाहीये. कारण तहसील कार्यालयाच्या चपराश्‍यापासून ते महसूल खात्याच्या मंत्र्यांपर्यंत सर्वांचे हात या तस्करीत गुंतलेले आहेत. भंडारा जिल्ह्यात मोहाडी, तुमसर, पवनी, लाखांदूर या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात रेती तस्करी सुरू आहे. यासंदर्भात मी मंत्र्यी, सचिव, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्याशी पत्रव्यवहार केला. सभागृहातही विषय मांडला. वाळू माफियांचा परदाफाश करीत असताना संबंधित मंत्र्यांकडून उत्तर आले की, कुठेही अशा प्रकारची वाळू चोरी सुरू नाहीये आणि असेलही तर दोन चार ट्रक होत असतील, हाच त्यांच्या सहभागाचा पुराव आहे, असेही आमदार फुके म्हणाले.

Parinay Fuke, Balasaheb Thorat and Nana patole
नाना पटोलेंची मानसिक स्थिती ढासळलेली आहे : भाजप आमदार परिणय फुके,पाहा व्हिडिओ

राजाच चोर आहे, तर चौकीदार काय करणार?

गेल्या अधिवेशनात विधान परिषदेच्या सभागृहात जेव्हा या विषयावरची चर्चा आली, तेव्हा पेन ड्राईव्हसहीत मी पुरावे सभागृहाला सादर केले. भंडारा जिल्ह्याच्या चार-पाच तालुक्यांमध्ये प्रत्येकी सात ते आठ घाट शासनाची बंदी असतानाही सुरू आहेत. नियमबाह्य सुरू असलेल्या वाळू घाटांचीही माहिती मी पुराव्यांसह दिलेली आहे. सादर केलेल्या व्हिडिओ रेकॉर्डींगमध्ये पोकलेन, जेसीबी, टिप्पर सर्व स्पष्ट दिसत आहे आणि घाटांमधून वाळू काढून नेतानाचे पुरावे आहेत. चेकपोस्टवर पोलिस असतानाही न तपासता सर्व ट्रक, टिप्पर सोडले जात असल्याचेही पुरावे त्या पेन ड्राईव्हमध्ये दिलेले आहेत. तरीही कारवाई होत नाही, याचे आश्‍चर्य वाटण्याचे कारण नाही कारण राजाच चोर आहे, तर चौकीदार काय करणार, असा सवाल आमदार परिणय फुके यांनी उपस्थित केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com