
उत्तम कुटे
पिंपरीः शाळा,महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत ई सिगारेटचे गंभीर व घातक व्यसन आता सुरु झाले आहे. शैक्षणिक संस्थांच्या शंभर मीटर परिसरात ई सिगारेटसह इतर तंबाखूजन्य पदार्थ विक्रीस बंदी असूनही ते राज्यात सर्रास विकले जात आहेत. त्यामुळे हा गंभीर व घातक व्यसनाचा प्रश्न उद्योगनगरीतील चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह राज्यातील सर्वपक्षीय २४ आमदारांनी सोमवारी ( दि.26) विधानसभेत तारांकिंत प्रश्नाव्दारे उपस्थित केला.
आमदार लक्ष्मण जगताप हे सध्या आजारी आहेत. त्यामुळे ते नागपूर येथे सध्या सुरु असलेल्या राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित नाहीत. मात्र,तरीही त्यांनी अनेक लक्षवेधी आणि तारांकिंत प्रश्न दिले आहेत. त्यातील पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने खरेदी केलेल्या हाय सेक्शन खरेदी निविदेतील घोटाळ्याचा त्यांचा तारांकिंत प्रश्न पाच दिवसांपूर्वी (ता.२१) पटलावर आला होता.
त्याच्या उत्तरात हा गैरव्यवहार झाल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) यांनी मान्य बाजारभावापेक्षा दुप्पट दराने खरेदी केलेल्या या मशिनच्या ठेकेदाराचा आदेश रद्द करण्यात आल्याची माहिती सभागृहाला दिली होती.
त्यानंतर आमदार जगतापांची दुसरा तारांकित प्रश्न पाच दिवसांतच आज लागला. राज्यातील अनेक शाळा,कॉलेजमधील विद्यार्थ्यांत ई सिगारेटचे व्यसन सप्टेंबर महिन्यात वा त्यादरम्यान वाढल्याची बाब गृहखाते असलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमान्य केली.त्याचवेळी सप्टेंबर महिन्यात राज्यात ई सिगारेटबाबत १७ गुन्हे नोंद होऊन त्यात १४ आरोपींना अटक केल्याचे त्यांनी मान्य केले. त्यांच्याकडून दहा लाख ८८ हजार ३८५ रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली.
तसेच शाळा,कॉलेज परिसरातील पानटपरी,स्नॅक्स सेंटर आणि जनरल स्टोर्समध्ये ई सिगारेट पेन ड्राईव्ह आणि पेन लायटरच्या आकारात मिळत असल्याचा आमदारांनी विचारलेल्या प्रश्नावर त्यासंदर्भात पोलिसांकडून वेळोवेळी कारवाई होत असल्याचेही गृहमंत्र्यांनी सांगितले. त्यातून शाळा,महाविद्यालयांच्या शंभर मीटर परिसरात बंदी असूनही ई सिगारेटसह तंबाखूजन्य पदार्थांची विक्री होत असल्याला दुजोराच मिळाला आहे.
आमदार रोहित पवार,नाना पटोले,रईस शेख आदी सर्वपक्षीय २४ आमदारांनी हा प्रश्न विचारला होता.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.