Winter Session : ...अन् ‘राज्यपाल हटाओ’नंतर वाजले अधिवेशनाचे सूप !

Jayant Patil : राहुल नार्वेकर यांना अपशब्द बोलल्याबद्दल जयंत पाटील यांचे निलंबन करण्यात आले
Winter Session
Winter SessionSarkarnama

Maharashtra Assembly Winter Session : नागपूर (Nagpur) हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी २६ डिसेंबरला विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar) यांना अपशब्द बोलल्याबद्दल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांचे अधिवेशन काळापुरते निलंबन करण्यात आले. त्यानंतर सभात्याग करत विरोधकांनी पायऱ्यांवर येऊन सरकारच्या विरोधात घोषणाबाजी केली. `राज्यपाल हटाओ'च्या घोषणा देत हाही दिवस विरोधकांनी गाजवला.

पहिल्या आठवड्याच्या उत्तरार्धात विरोधकांनी आदित्य ठाकरेंना (Aditya Thackeray) अडचणीत आणण्यासाठी दिशा सालियन प्रकरण उकरून काढले. त्यामुळे आदित्य ठाकरे यांच्या दिमतीला स्वतः उद्धव ठाकरे, (Uddhav Thackeray) संजय राऊत, मिलिंद नार्वेकर, वरूण सरदेसाई हे विशेष विमानाने नागपुरात रविवारी रात्रीच (आदित्य ठाकरेंसह) दाखल झाले. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी उद्धव ठाकरेंनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्‍नी सीमेवरील काही गावे केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली.

भूखंड घ्या, कुणी श्रीखंड घ्या..

याच दिवशी वाशीम जिल्ह्यातील गायरान जमीन घोटाळा प्रकरणात कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांच्या राजीनाम्याची मागणी करीत विरोधकांनी वेलमध्ये येऊन आंदोलन केले. यानंतर सभागृह मंगळवार सकाळी ९ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. त्यानंतर अब्दुल सत्तार शासकीय बंगल्यावर न जाता कृषी विभागाच्या विश्रामगृहावर गेले होते. दुसऱ्या दिवशी मंगळवारी भाजपचे सर्व नेते, आमदार रेशीमबाग येथे अभ्यास वर्गासाठी गेले. भूखंड घ्या, कुणी श्रीखंड घ्या..’, असे भजन गात, टाळ वाजवून अब्दुल सत्तार आणि एकनाथ शिंदे यांच्या विरोधात आंदोलन केले. बॉम्ब फोडू म्हणणारे फुसके लवंगी फटाके निघाले, असा टोला देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांना लगावला. बॉम्ब आमच्याकडे आहेत, ते यापुढे आम्ही फोडणार आहोत, असेही फडणवीसांनी सांगितले होते.

कर्नाटक सीमाप्रश्नाचा ठराव एकमताने मंजूर..

नियम ११० अन्वये कर्नाटक सीमा प्रश्‍नी सीमावर्ती भागातील मराठी लोकांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा ठराव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. तो एकमताने मंजूर झाला. याच दिवशी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना स्थगिती देणाऱ्या अर्जाला न्यायालयाने नामंजूर केले आणि त्यांच्या कारागृहाबाहेर येण्याचा मार्ग मोकळा झाला. बुधवारी उदय सामंत यांच्या बोगस डिग्रीचे प्रकरण, संजय राठोड यांचे गायरान जमीन प्रकरण, शंभुराज देसाई यांचे महाबळेश्‍वर येथील अवैध बांधकाम प्रकरण, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी पोलिसांना धक्काबुक्की केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला. याच दिवशी अण्णा हजारे यांनी सुचविलेला लोकायुक्त ठराव मंजूर झाला. याच दिवशी अजित पवार, छगन भुजबळ शासकीय विमानाने मुंबईला गेले. तेथे त्यांनी अनिल देशमुख यांचे स्वागत केले. तेथून फक्त अजित पवार परत आले, तर भुजबळ अखेरच्या दिवसापर्यंत अधिवेशनाला आलेच नाहीत.

Winter Session
Winter Session News: शिक्षण क्षेत्रातील चुकीच्या धोरणावर दरेकरांचा घणाघात; चंद्रकांत पाटलांनी घेतला 'हा' महत्वपूर्ण निर्णय

संजय राऊत म्हणाले, टाचण्या लावलेले लिंबू सापडतील..

काल गुरूवारी एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यालय स्मृती स्थळाला भेट दिली. यावर संजय राऊतांनी टिका केली की, ते काही दिवसांत खाकी पॅन्ट घालून दिसतील. तर विधिमंडळ शिवसेनेच्या कार्यालयावर त्यांनी ताबा केला आता ते संघ मुख्यालयाच्या कार्यालयावरदेखील ताबा करू शकतात. त्यामुळे मोहन भागवतांनी सांभाळून रहावे. आरएसएसच्या कार्यालयात त्यांनी शोध घ्यावा, तेथे त्यांना टाचण्या लावलेले लिंबू सापडतील.

काल उशिरा रात्री ४७ आमदारांच्या सहीचे राहुल नार्वेकरांवर अविश्‍वास प्रस्ताव देण्यासंदर्भातील पत्र विधिमंडळ सचिवांना देण्यात आले. पण त्यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांची सही नव्हती आणि याबाबत मला काहीही माहिती नाही, असे त्यांनी रात्री उशिरा माध्यमांना सांगितले. आज अखेरच्या दिवशीही विरोधक पायऱ्यांवर आले आणि ‘राज्यपाल हटाओ’च्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. शिंदे-फडणवीस हे महाराष्ट्राचे दोन बुजगावणे आहेत, असे म्हणत प्रतीकात्मक बुजगावणे लात मारून खाली पाडले. विधानभवनाच्या परिसरात विरोधकांना जेरीस आणण्याची एकही संधी विरोधकांनी सोडली नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com