
Maharashtra Assembly Winter Session News : महाराष्ट्र (Maharashtra) राज्याच्या राजकारणाच्या इतिहासात कधी नव्हे येवढी मोठी उलथापालथ यावर्षी झाली आणि मूळ शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) शिवसेनेचे ४० आणि अपक्ष १० आमदारांना घेऊन बाहेर पडले आणि भाजपसोबत (BJP) मिळून सत्ता स्थापन केली. अभूतपूर्व नाट्यमय घडामोडींनंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. पण ही बाब काही भाजप नेत्यांना रुचली नाही, हे वेळोवेळी निदर्शनास आले आहे.
एवढे मोठे नाट्य राज्यात झाले आणि त्यामध्ये भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी ‘मुरब्बी' पहिलवानाची भूमिका पार पाडली. त्यानंतर फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे चित्र सर्वत्र असताना अचानक मुख्यमंत्रिपदासाठी एकनाथ शिंदे यांचे नाव पुढे आले. तेव्हाही ‘मी सत्तेच्या बाहेर राहीन, पण सरकारच्या सोबतच असेन’, असे म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीसांना दिल्लीश्वरांकडून आदेश आला आणि त्याच सायंकाळी त्यांना उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घ्यावी लागली. यानंतर राज्यभर त्याचे पडसाद उमटलेले बघायला मिळाले. फडणवीसांचे राज्यभरातील समर्थक नाराज झाले. खासकरून नागपुरातील…
फडणवीसांच्या विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी असलेले आणि त्यांचे खास मित्र नागपूरचे माजी महापौर संदीप जोशी यांनी नागपूरपासून ते मुंबईपर्यंत ‘देवेंद्र तुला सलाम...’ असे बॅनर, पोस्टर झळकावले. अर्थातच मुख्यमंत्री पदाचे दावेदार अगदी शेवटच्या क्षणी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतात, हे त्यांच्या समर्थकांना रुचणारे नव्हते. पण येथेही फडणवीसांना मानलेच पाहिजे की, त्यांना पक्षाचा आदेश शिरसावंद्य मानून हु की चू... न करता गपगुमान उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि आपण एका शिस्तप्रिय पक्षाचे कार्यकर्ते आहोत, याचे उदाहरण महाराष्ट्रासमोर ठेवले.
‘आम्ही छातीवर दगड ठेऊन हा निर्णय मान्य केला’, असे तेव्हा भाजपचे तत्कालिन प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते. तेव्हाच दिल्लीश्वरांच्या या निर्णयाने महाराष्ट्रातील भाजप नेते समाधानी नाहीत, हे लक्षात आले होते. त्यानंतर वेळोवेळी भाजप नेत्यांची वक्तव्ये याबाबतीत येत राहिली. दरम्यान माजी ऊर्जा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पुनर्वसन करीत भाजपने त्यांना विधान परिषदेवर संधी दिली, ते आमदार झाले. या काळात एकनाथ शिंदे यांच्यासोबत भाजप सत्तेत बसली. चंद्रकांत दादा मंत्री झाले आणि प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळेंची वर्णी लागली. त्यानंतर बावनकुळेंनीही मनातील खदखद व्यक्त करीत चंद्रकांतदादांची री ओढत ‘मी प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत देवेंद्रजी मुख्यमंत्री व्हावे’, असे विधान केले. त्यानंतर देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील, अशा चर्चांना पुन्हा वेग पकडला.
गेल्या आठवड्यापासून नागपुरात सुरू असलेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे मंत्री अडचणीत येताना दिसत आहेत. आधी एकनाथ शिंदे यांचे नागपुरातील एनआयटीच्या भूखंडाचे प्रकरण आणि त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी अब्दुल सत्तार यांचा वाशीम जिल्ह्यातील गायरान जमिनीचे प्रकरण सभागृहात गाजले. याशिवाय कृषी मेळाव्यासाठी वसुलीचे प्रकरणही चांगलेच तापत आहे. या दोघांच्याही राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधकांनी सभागृह डोक्यावर घेतले आहे. हे घोटाळे बाहेर काढण्याच्या मागे भाजप नेत्यांचा हात असल्याचा आरोपही विरोधक करत आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या या आरोपात तथ्य असेल आणि नैतिकतेच्या आधारावर एकनाथ शिंदे यांचा राजीनामा जर का झालाच, तर मग मुख्यमंत्रिपदी कोण, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. त्यामुळेच विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा शब्द खरा ठरेल का आणि आधीपासून भाजपची ही खेळी तर नव्हती ना, असा प्रश्न सध्या विधान भवन इमारतीच्या परिसरासह सर्वत्र चर्चिला जात आहे.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.