Chitra Wagh : चित्रा वाघ को घुस्सा क्यों आता है? पुढील दिवसांत उत्तर मिळेल का?

पण तसे न करता त्या एकदम भडकल्या. त्यामुळे क्षणभरासाठी पत्रकारही अचंबित झाले. नंतर पत्रकार परिषद; गुंडाळली गेली. चित्रा वाघ (Chirta Wagh) पुढील काही दिवस विदर्भात आहेत. काही जिल्यांमध्ये त्या जाणार आहेत.
Chitra Wagh
Chitra WaghSarkarnama

नागपूर : भारतीय जनता पक्षाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chirta Wagh) या सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. प्रत्येक जिल्ह्यात नियोजित कार्यक्रमात त्या पत्रकार परिषद घेत आहेत. पण काल अमरावती आणि आज यवतमाळमध्ये पत्रकारांच्या प्रश्‍नावर त्या भडकल्या आणि तेथेच त्यांना दोन बोल सुनावले.

अमरावती (Amravti) आणि यवतमाळमध्ये (Yavatmal) अर्थातच प्रश्‍न होता, शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड (Sanjay Rathod) यांच्याबद्दल… संजय राठोड यांच्या संदर्भातील एका प्रश्‍नावर त्यांनी उत्तर दिले. त्यानंतर `संजय राठोड यांच्यावर आरोप करून तुम्ही त्यांची राजकीय कारकीर्द खराब केली...’, या प्रश्‍नावर त्या जाम भडकल्या. ‘न्यायव्यवस्था है क्या आप? गई हू ना मै न्यायालय में, आप मुझे मत सिखाव, चलिये… या अशा पत्रकारांना नका बोलावू तुम्ही, हे सुपारी घेऊन प्रश्‍न विचारायला येतात...’ असे म्हणत त्यांनी संबंधित पत्रकाराची चांगलीच खरडपट्टी काढली. यानंतर निषेध, निषेध म्हणत पत्रकार तेथून निघून गेले.

काल अमरावतीमध्येही पत्रकारांना असाच अनुभव आला. ‘तुम्ही संजय राठोडावर आरोप केले होते, पण आता तुमच्याच मंत्र्यांच्या मांडीला मांडी लावून ते बसतात...’, असा प्रश्‍न त्यांना विचारला होता. तेव्हाही त्या पत्रकारांवर एकदम भडकल्या. त्यानंतर पत्रकारांनी त्यांना शांत होऊन हळू आवाजात बोलण्याची सूचना केली. मग कुठे प्रकरण शांत झाले. पण चित्रा वाघ यांनी त्यांचा तेथील राग कदाचित यवतमाळात काढला असावा, अशी चर्चा नंतर पत्रकारांमध्ये रंगली.

का भडकतात चित्रा वाघ ?

आज यवतमाळात त्यांनी पहिल्या प्रश्‍नाचे उत्तर जसे शांततेत दिले, अगदी तसेच दुसऱ्या प्रश्‍नावरही त्या शांतपणे उत्तर देऊ शकत होत्या. कारण त्यांनी पुण्यात झालेल्या एका युवतीच्या मृत्यूचे प्रकरण चांगलेच उचलून धरले होते. त्यांच्या आक्रमकतेमुळे तत्कालीन महाविकास आघाडी सरकारला संजय राठोड यांच्या वनमंत्रिपदाचा राजीनामा घ्यावा लागला होता. मृत मुलीला न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यांनी सुरुवातीपासून घेतली. आता त्या न्यायालयीन लढाई लढत आहे, असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यांच्या या भूमिकेचे स्वागतच केले जाईल. पण नेमक्या या प्रश्‍नावर त्या का भडकतात, याचे कारण मात्र अद्याप तरी कुणाला कळले असेल, असे वाटत नाही.

Chitra Wagh
भाजपच्या चित्रा वाघ यांची स्वतंत्र तपास यंत्रणा?

`संजय राठोड यांच्यावर आरोप करून तुम्ही त्यांची राजकीय कारकीर्द खराब केली...’, या प्रश्‍नावर त्या ‘नाही’ म्हणून किंवा अजून काहीतरी उत्तर देऊन पुढे जाऊ शकल्या असत्या. पण तसे न करता त्या एकदम भडकल्या. त्यामुळे क्षणभरासाठी पत्रकारही अचंबित झाले. नंतर पत्रकार परिषद; गुंडाळली गेली. चित्रा वाघ पुढील काही दिवस विदर्भात आहेत. काही जिल्यांमध्ये त्या जाणार आहेत. तेथेही पत्रकार परिषदा होतील. त्यामुळे ‘चित्रा वाघ को घुस्सा क्यों आता है’, या प्रश्‍नाचे उत्तर पुढील काळात मिळेल, अशी आशा करायला हरकत नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in